Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राण्यांची भटकंती
खामगाव, २ मे / वार्ताहर

बुलढाणा जिल्ह्य़ातील ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

 

सुरू असून हे प्राणी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. १९९७ ला तयार झालेल्या ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्रफळ २०५.२२ चौरस कि.मी. आहे. बोथा, माटरगाव, मोताळा या मोठय़ा गावांसह २१ बीट आहेत. या अभयारण्यात ५० प्रकारचे वृक्ष, २३ प्रकारचे झुडपे, १८ प्रकारचे गवत, ८ प्रकारच्या वेली, २३ प्रकारचे सस्तनप्राणी, ३१ प्रकारचे सरपटणारे प्राणी, १५२ प्रकारचे पक्षी, वाघ, बिबटय़ा, कोल्हा, चितळ, भेटकी, नीलगाय, अस्वल, तडस, मोर, सांबर, चौसिंगा, रानडुक्कर हे प्राणी आहेत. सुमारे एक हजारांच्यावर हे प्राणी या अभयारण्यात आहेत. याशिवाय मोठय़ा प्रमाणावर हरणांचे कळप आढळून येतात. सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे तर दुसरीकडे पाण्याचे स्रोत आटले आहेत. जंगलात पाणी नसल्यामुळे ही श्वापदे पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. उन्हाळ्यात वन्यजीव विभागाच्यावतीने अभयारण्यात पाणवठे तयार करून त्यात टँकरद्वारे पाणी आणून टाकल्या जाते. मात्र, प्रशासनाच्या लालफितशाहीमुळे या वन्यजीवांना पाणी मिळेनासे झाले आहे. बिबटे, रानडुक्कर, हरिण आणि अस्वल या प्राण्यांना जंगलात पाणी मिळत नसल्यामुळे ते पाण्याच्या शोधात वस्त्यांकडे धाव घेत आहेत.