Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

रामाळा तलावातील ‘इकोर्निया’ साफसफाई अभियान महिनाभर
चंद्रपूर,२ मे / प्रतिनिधी

शहराच्या मध्यवर्ती भागातील रामाळा तलावातील ‘इकोर्निया’ साफसफाई अभियान

 

जिल्हा प्रशासन व सिंचन विभागाच्या पुढाकाराने सुरू असून तलावातील पाणी काढण्यासाठी तब्बल महिनाभराचा अवधी व ९० लाखाचे डिझेल लागणार आहे. या कामासाठी जलसंपदा विभागाने यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली असली तरी डिझेलचे पैसे आणायचे कुठून आणि तोपर्यंत पावसाळा सुरू होणार असल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले आहे.
रामाळा तलावाला ‘इकोर्निया’ वनस्पतीने व्यापल्याने तलावाचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. शहरातील एकमेव मोठा तलाव नाहीसा होत असताना खासदार हंसराज अहीर व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत केंद्राच्या एका चमूला पाचारण केले होते. या चमूनेही इकोर्नियाचा नायनाट करण्यासाठी अळ्या पाण्यात सोडण्याचा सल्ला दिला. मात्र, पाहता पाहता संपूर्ण रामाळा तलाव ‘इकोर्निया’ने झाकला गेला. या तलावाची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी रामाळा तलावातील ‘इकोर्निया’ साफ करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सिंचाई विभागाने २४ एप्रिलपासून मजूर लावून तलावातील पाणी बगडखिडकीच्या नहरातून बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी जलसंपदा विभागाने दोन मशीन लावल्या आहेत. या मशीन छोटय़ा असल्याने तलावातील पाणी काढण्यासाठी महिनाभराचा अवधी लागणार आहे. एकीकडे तलावातील पाणी बाहेर सोडणे आणि इकोर्निया साफ करणे अशी दुहेरी मोहीम येथे सुरू आहे. मात्र, तलावातील पाणी काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.
खासदार हंसराज अहीर व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याकडे तलाव साफ करण्यासाठी मदत मागितली असता या विभागाने यंत्रसामुग्री मोफत उपलब्ध करून दिली. मशीन उपलब्ध झाल्या असल्या तरी डिझेलचा प्रश्न कायम आहे. तलावातील पाणी बाहेर काढण्यास एक महिना लागणार आहे. या एक महिन्यात मशीनला तब्बल ९० लाखाचे डिझेल लागणार आहे. जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी ९० लाखाचे डिझल लागणार असल्याचे जलसंपदा विभागाला कळविले आहे. मात्र, हा पैसा आणायचा कुठून हा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्याकडे ५० लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असली तरी यासंदर्भात अजून कुठलेही पत्र मिळाले नसल्याने हा प्रश्न अधांतरी आहे. डिझेलसाठी लागणारा निधी मिळालेला नसल्याने हे काम अर्धवट अवस्थेत राहिल, अशी चर्चा आहे. अशातच महिनाभरानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. मे महिन्यात इकोर्निया साफ झाला नाही तर पावसाळ्यात पुन्हा ‘इकोर्निया’ वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तलाव साफसफाईचे कामाला गती देण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. तलावातील पाणी काढण्यासाठी दोन महिने कमी पडत असल्याने तिथे चार ते पाच मशीन लावण्यात याव्यात. जेणेकरून पंधरा दिवसांत पाणी साफ होईल आणि पंधरा दिवसांत संपूर्ण ‘इकोर्निया’ची सफाई करता येईल. जलसंपदा विभागाने इकोर्निया समुळ नष्ट करण्यासाठी जेसीबी मशीनही उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, तलावात पाणी व दलदल असल्याने सध्याच ‘जेसीबी’ मशीन लावता येणार नाही, असे सिंचन विभागाचे म्हणणे आहे. सध्यातरी कासवगतीने सुरू असलेले पाणी काढण्याच्या कामाला गती देण्याची गरज आहे. १५ दिवसांत पाणी काढण्यात यश आले तर येत्या पावसाळय़ात रामाळा तलावाला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त होण्याची आशा आहे.