Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

विदर्भ को-ऑप. पतसंस्थेच्या २२ संचालकांचा जामीन अर्ज फेटाळला
अकोला, २ मे / प्रतिनिधी

पावणेदोन कोटींच्या ठेवी बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या विदर्भ को-ऑप.

 

पतसंस्थेच्या २२ संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. म्हस्के यांच्या न्यायालयाने फेटाळला.
शहरात आकोट स्टँड परिसरात असलेल्या विदर्भ को-ऑप. पतसंस्थेने ठेवीदारांच्या एक कोटी ७३ लाख ५३ हजार ४१४ रुपयाच्या ठेवी बुडवल्या होत्या. विशेष लेखा परीक्षक चंद्रशेखर साखरपोहे यांच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलिसांनी ५ फेब्रुवारीला पतसंस्थेच्या २३ संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये माधवराव पटवी, राजबलीसिंह ठाकूर, महादेव तायडे, मारोती सावजी, समाधान डोंगरे, प्रल्हाद राकेश, दिनकर माहुलीकर, मोहनलाल लोहीया, प्रभाकर खारोटे, काशीराम चोपडे, सुरेश मानपुत्रे, रमेश मडीपाल, देविलाल चौधरी, महेंद्रसिग सलुजा, संध्या सावजी, नरेंद्र मुदीराज, रामलाल श्रीवास्तव, चंद्रकांत भगत, व्यवस्थापक बोराखडे यांचा समावेश आहे.
मुदती संपल्यानंतरही ठेवीदारांना ठेवी परत न मिळाल्यामुळे हा प्रकार उघड झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संचालकांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. अहमद यांच्या न्यायालयाने १० फेब्रुवारी २००९ ला अटकपूर्व अंतरिम जामीन दिला होता. हा जामीन कायम करण्याबाबतची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. म्हस्के यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने संचालक मंडळातील रश्मिकांत पटेल यांना वगळता उर्वरित २२ संचालकांचा जामीन अर्ज फेटाळला.