Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

चंद्रपूर जिल्ह्य़ात २५८.३७ कोटींचे पीक कर्जवाटप
चंद्रपूर, २ मे / प्रतिनिधी

चंद्रपर जिल्हय़ासाठी २००९-१० या वर्षांकरिता पीक कर्जाचे २५८.३७ कोटी रुपयांचे

 

उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून पात्र शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी दिले आहेत.
जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँका, वैनगंगा क्षेत्रीय ग्रामीण बँक, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नागरी बँकांमार्फत निकषानुसार केंद्र व राज्य शासनाच्या कृषी कर्जमाफी व कर्ज परतफेड योजनेचा जिल्हय़ातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला व याच अनुषंगाने खरीप २००९ हंगामात कृषी कर्ज वाटपासाठी जिल्हय़ातील सर्व बँक पदाधिकारी, बँक व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधकांची संयुक्त सभा नुकतीच जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात जास्तीत जास्त कृषी कर्ज वाटप करण्यात यावे व जिल्हय़ातील सर्व बँकांनी यामध्ये पुढाकार घेऊन विशेष धडक मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी दिले. जिल्हय़ामध्ये १ एप्रिल २००९ पासून खरीप हंगामाकरिता पीक कर्ज वाटप सुरू झाल्याचे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
चंद्रपूर जिल्हय़ाचा वार्षिक पतपुरवठा आराखडय़ानुसार कृषी पीक कर्जाचे उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १३३.३१ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेचे ९५.८५ कोटी व ग्रामीण बँकेचे २९.२१ कोटी असे एकूण २५८.३७ कोटी इतके उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. राज्य शासनाने स्वयंसहाय्यता बचत गटांना कर्जपुरवठा करण्याचे मान्य केले आहे. कर्ज मिळण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास सेवा सहकारी संस्थांचे सभासद, तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय किंवा बँकांच्या शाखा व्यवस्थापकांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सभेस सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर,नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक थिटे, व्यवस्थापक नांदूरकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सरव्यवस्थापक मुद्देशवार, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.