Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

आईवडिलांसह दोन मित्रांना न्यायालयीन कोठडी; अल्पवयीन मुलीला पळवल्याचे प्रकरण
कारंजा (घाडगे), २ मे / वार्ताहर

ठाणेगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या

 

मुख्य आरोपीच्या आईवडिलांसह दोन मित्रांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मुख्य आरोपी व मुलगी मात्र सापडू शकले नाही. आरोपीचे ठाणेगावात पंक्चरचे दुकान आहे.
ठाणेगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा तिचा प्रियकर असल्याची चर्चा आहे. २५ एप्रिलला मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने कारंजा पोलिसात केली. ईशाद रफीक अन्सारी असे मुख्य आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २७ एप्रिललाच मुख्य आरोपी ईशादचे वडील रफीक अन्सारी, आई शबरा खातून अन्सारी, मित्र मोहन ठाकरे (सर्व ठाणेगाव) व मंगेश खवशी (सावळी खुर्द) या चौघांना पळून नेण्यासाठी मदत केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी त्यांना अटक केली. २८ एप्रिलला चौघांचीही पोलीस कोठडी संपल्यानंतर २९ एप्रिलला त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. इकडे पोलिसांनी ईशादचा शोध घेतला असता मूर्तीजापूर येथे त्याची एम.एच. ३१ सीडी ३४४७ क्रमांकाची मोटारसायकल मुलाच्या नातेवाईकाकडे मिळाली. ठाणेदार डहाके यांनी ती मोटारसायकल जप्त केली. पळून जाण्यासाठी वापरलेली मोटारसायकल मंगेश खवशी याची आहे.