Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

विविध

संयुक्त जनता दलाला पंतप्रधानपदासाठी मोदी अमान्य
नवी दिल्ली, २ मे/पीटीआय

गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तर ते आपल्याला मान्य नाही, असे जनता दल युनायटेड या एनडीएच्या घटक पक्षाने आज जाहीर केले आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची जागा रिकामी नाही, असेही त्या पक्षाने स्पष्ट केले. जनता दल युनायटेड या पक्षाचे प्रमुख शरद यादव हे एनडीएचे निमंत्रक असून, त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाजपची पंतप्रधानपदाची उमेदवारी लालकृष्ण अडवाणी यांना दिल्यानंतर भाजपने मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याची भाषा योग्य नव्हते. मुळात पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवाराची जागा रिकामी नाही, कारण एनडीएने अडवाणी यांचे नाव जाहीर केले आहे.

लालू, शत्रुघ्न, नीतिशकुमार यांच्यामुळे रंगत
सुनील चावके

बिहारमध्ये ७ मे रोजी चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकीत पाटणासाहिब, पाटलीपुत्र आणि नालंदा अशा तीन जागांवर मतदान होत असले तरी या तिन्ही जागांवर जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल आणि भाजपची सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लागली आहे. छपरा लोकसभा मतदारसंघात पराभवाच्या वावडय़ा उठत असल्याने पाटलीपुत्रमधून रेल्वेमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना विजय मिळविण्यावाचून गत्यंतर नाही. पाटणासाहिबकडे तर साऱ्या बॉलीवूडचे लक्ष लागले आहे.

अमरिंदर सिंग यांच्यापुढे पत्नी व पुत्राच्या विजयाचे आव्हान
सुनील चावके

राज्यातील सत्ताधारी आघाडीला वा पक्षाला लोकसभा निवडणुकीत दणका बसतो हा पंजाबमध्ये गेल्या दहा वर्षांचा अनुभव आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील सत्ताधाऱ्यांना जनता वैतागलेली असते. त्याचा लाभ विरोधकांना आपसूकच मिळत असतो. यंदा अमिरदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला असा फायदा मिळू शकतो. ७ मे रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यात पंजाबमध्ये फिरोजपूर, बठिंडा, संगरुर आणि पतियाळा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

बाबरी प्रकरणात कल्याणसिंग हे गुन्हेगार -लालूप्रसाद
पाटणा, २ मे / पी.टी.आय.

उत्तर प्रदेशातील माजी भाजप नेते कल्याणसिंग हे बाबरी मशीद प्रकरणातील गुन्हेगार आहेत, अशी टीका राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी आज केली. सध्या कल्याणसिंग हे समाजवादी पक्षाच्या बरोबर आहेत हे आपल्याला आवडलेले नाही असे दाखवून देण्याचा प्रयत्न लालूप्रसाद यांनी या वक्तव्यातून केला आहे. उत्तर प्रदेश व बिहार या दोन महत्वाच्या राज्यांमध्ये समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल व लोकजनशक्ती पक्ष यांची चौथी आघाडी निवडणुकीत उतरली आहे.

साखर घोटाळ्यातून ‘यूपीए’ने ४०० कोटींचा फंड जमविला
प्रकाश जावडेकर यांचा आरोप

नवी दिल्ली, २ मे/खास प्रतिनिधी

केंद्रातील युपीए सरकारने २० लाख टन साखरेवर किलोमागे २ रुपये सवलत देऊन ४०० कोटी रुपयांचा निवडणूक फंड वसूल केल्याचा आरोप साखरक्षेत्रातील तज्ज्ञांचा हवाला देत आज भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

तालिबान्यांचे शिखांवरील अत्याचार:
भारताची नाराजी पाकने फेटाळली

इस्लामाबाद, २ मे / पीटीआय

पाकिस्तानच्या आदिवासी बहुल भागात तालिबानी शीख नागरिकांकडून जिझीया कर वसूल करत असल्याबद्दल व शिखांची घरे नष्ट करत असल्याबद्दल भारत सरकारने व्यक्त केलेली नाराजी पाकिस्तानने फेटाळली असून हा भारताच्या चिंतेचा विषय नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानने अण्वस्त्रांची माहिती पाश्चिमात्य देशांना दिली?
लंडन, २ मे/पीटीआय

पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा तालिबानी दहशतवाद्यांचा हाती लागण्याची भीती जागतिक पातळीवर व्यक्त केली जात असतानाच पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अण्वस्त्रांची गोपनीय माहिती काही प्रमाणात पाश्चिमात्य देशांना दिली आहे,असे समजते.

पाकिस्तानी लष्करावर हल्ल्याच्या प्रयत्नात १६ तालिबानी ठार
इस्लामाबाद, २ मे/पीटीआय

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाण सीमेवर पाकिस्तानच्या एका सुरक्षा चौकीवर हल्ला केला. या वेळी झालेल्या तुंबळ धुमश्चक्रीत १६ दहशतवादी ठार, तर पाकिस्तानी लष्कराचे दोन जवान मारले गेले. लष्कराच्या हेलिकॉप्टरने दहशतवाद्यांच्या बुनेर भागातील छावण्यांवर जोरदार हल्ले केले. बुनेरमधील कारवाईचा आजचा पाचवा दिवस होता. शस्त्रसज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी मोहंमद आदिवासी भागात एका सुरक्षा चौकीवर हल्ला केला. त्यात दोन जवान मारले गेले, तर पाचजण जखमी झाले. पाकिस्तानी सैन्याने तालिबानी दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी मोहीम राबवली आहे. सुरक्षा चौकीच्या प्रमुखासह तीन सुरक्षा जवान बेपत्ता आहेत. फ्रंटियर कॉर्पसने तोफगोळ्यांचा मारा करून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीत १६ दहशतवादी ठार झाले.

‘डाव्यांना धूळ चारा’
बेहरामपूर, २ मे/ पीटीआय
गरिबांसाठी काम करण्यात डावे पक्ष अपयशी ठरल्याने डाव्यांना पराभवाची धूळ चारून राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज केले. शुक्रवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी डाव्या पक्षांवर हल्ला चढविल्यानंतर टीकेचा सूर आणखी आक्रमक करताना राहुल गांधी प्रचारसभेत म्हणाले की, मोठय़ा-मोठय़ा बाता मारणारे डावे पक्ष दिल्लीत काँग्रेस सरकारला विरोध करतात. मात्र, हेच डावे पक्ष केंद्राने गरिबांच्या कल्याणासाठी दिलेल्या निधीचा वापर करण्यात अयशस्वी ठरले आहेत. राज्यात विकासाचे पर्व आणण्यासाठी मतदारांनी नव्याने विचार करावा व डाव्यांना पराभवाची धूळ चारावी. डावे पक्ष गरिबांचा विचार करतात असे मला वाटत होते. मात्र याच पक्षांच्या सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ८ लाखांपैकी केवळ ६० जणांना रोजगार दिला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

शिखांवरील अत्याचार : भारताची नाराजी पाकने फेटाळली
इस्लामाबाद, २ मे / पीटीआय

पाकिस्तानच्या आदिवासी बहुल भागात तालिबानी शीख नागरिकांकडून जिझीया कर वसूल करत असल्याबद्दल व शिखांची घरे नष्ट करत असल्याबद्दल भारत सरकारने व्यक्त केलेली नाराजी पाकिस्तानने फेटाळली असून हा भारताच्या चिंतेचा विषय नसल्याचे स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल बस्ती म्हणाले की, शीख पाकिस्तानचे नागरिक असून त्यांची चिंता करणे हा भारताचा विषय नाही. अल्पसंख्याक नागरिकांच्या कल्याणाविषयी सरकार जागरूक आहे. जिझीया नाकारणाऱ्या शीखांना औराकजाई भागातून तालिबानी हुसकावून लावत असल्याचा मुद्दा भारताच्या उच्चायुक्तांनी शुक्रवारी पाकिस्तानकडे उपस्थित करून नाराजी व्यक्त केली होती. शीखांच्या भवितव्याविषयी चिंता करू नये व यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप होत असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानने त्यावर दिली होती.