Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

अग्रलेख

ज्ञानोपासक

राम शेवाळकरांच्या निधनाने मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रातला एक अग्रणी दूत काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘वक्तादशसहस्रेषु’ आणि ‘साहित्यवाचस्पती’ हा नानासाहेब शेवाळकर यांचा होणारा उल्लेख येथे मुद्दाम टाळला आहे, कारण मराठी साहित्य क्षेत्राने आपल्या नेहमीच्या सवयीने तेवढा एक शिक्का मारून शेवाळकरांच्या अन्य कर्तृत्वाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. शेवाळकरांचे घराणे

 

मूळचे मराठवाडय़ातल्या परभणी जिल्हय़ातल्या कयाधू नदीतीरावरील शेवाळ या गावचे. नानासाहेबांचे पणजोबा विदर्भात येऊन स्थायिक झाले आणि शेवाळकर वैदर्भीय झाले. तरी ते सर्वार्थाने संपूर्ण महाराष्ट्राचेच होते. शेवाळकरांचे घराणे कीर्तनकाराचे. कीर्तनकाराच्या घराण्याची वेदान्त आणि सत्पुरुषांच्या संस्काराची परंपरा शेवाळकरांना जन्मानेच मिळाली आणि त्या परंपरेची त्यांनी एखाद्या भाविकाप्रमाणे आयुष्यभर उपासना केली. साहित्य आणि वक्तृत्व हेच शेवाळकरांच्या कर्तृत्वाचे अलंकार नव्हते, तर मराठी भाषेवरची त्यांची निष्ठा, शिक्षक म्हणून त्यांना असणारी तळमळ, त्यांची गुणग्राहकता, त्यांच्यातला कार्यकर्ता, हेही त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू होते. शेवाळकरांमध्ये अंगभूत अशी सौजन्यशील वृत्ती होती. त्यामुळेच जसा प्रसंग येत गेला तसा काँग्रेस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट विचारांचा त्यांनी त्या त्या वेळी अभ्यासक म्हणून स्वीकार केला. या परस्परभिन्न विचारसरणी आणि त्या विचारसरणीला कवटाळून दुराग्रहीपणाने वावरणारे, अशा सर्वाशीच शेवाळकरांचे समान स्नेहबंध होते, ते या सौजन्यशीलतेमुळेच! शेवाळकरांच्या या सामाजिक आणि राजकीय संदर्भाकडे सातत्याने दुर्लक्षच झाले, हेही तेवढेच खरे! विद्यार्थिदशेत काँग्रेस कार्यकर्ता असणाऱ्या शेवाळकरांनी नंतर इतर राजकीय विचारसरणींचा अभ्यास केला, हे जेवढे खरे; तेवढेच त्यापैकी एकाही ‘इझम’ला त्यांनी आपल्यातल्या माणूसपणावर मात करू दिली नाही, कारण शेवाळकरांची प्रत्येकातल्या माणुसकीवर जिवापाड श्रद्धा होती. विविधांगी व्यासंग झाल्यामुळेच महात्मा गांधींविषयीचे त्यांचे आकर्षण, आचार्य विनोबा भावे यांच्यावरची त्यांची अनन्यसाधारण निष्ठा, बाबा आमटे यांच्याबद्दलचा टोकाचा भक्तिभाव आणि त्याचसोबत शंकराचार्याच्या अटकेनंतर त्या अटकेचा निषेध करण्यासाठी निघालेल्या मोर्चात त्यांचे सहभागी होणे सर्वासाठीच कुतूहलाचा विषय ठरले. एकाच वेळी अशा परस्परविरोधी भूमिका जगत असताना माझे माणसावर प्रेम आहे आणि त्याची जात, धर्म, लिंग किंवा राजकीय विचारसरणी माझ्यासाठी महत्त्वाची नाही, प्रत्येक माणसाच्या गुणपूजनाला उत्तेजन दिले पाहिजे, असे शेवाळकरांचे म्हणणे होते आणि ते त्यांनी अनेक प्रसंगांत सिद्ध करून दाखवले. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्या तेव्हा साहित्यिक विचारवंतांनी एक निषेधाचा खलिता जारी केला आणि उपोषणही केले. शेवाळकरांनी मात्र कोणताही गाजावाजा न करता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या शेकडो कुटुंबांच्या घरी धान्य, कपडे आणि अन्य वस्तू पाठवायचे भान बाळगले. महत्त्वाची बाब म्हणजे, शेवाळकरांना प्रसिद्धीचा सोस आहे, अशी जाहीर आणि खासगीतही टीका करणाऱ्यांना त्यांच्यातल्या या संवेदनशील माणसाचे कळवळणे सक्रिय दातृत्वशील कसे होते, हे कळलेही नाही. नांदेड आणि वणी अशा दोन ठिकाणी शेवाळकरांनी शिक्षक म्हणून काम केले आणि हे करताना आचार्यकुलाची चळवळ महाराष्ट्रभर चालवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक शिक्षक हा आचार्यच झाला पाहिजे, कारण आचार्याचा संबंध आचरणाशी आहे; शिक्षकाने किमान चांगले आचरण करून विद्यार्थ्यांवर त्याचे संस्कार केले पाहिजेत; प्रत्येक शिक्षक जसा ज्ञाननिष्ठ असला पाहिजे तसा तो विद्यार्थिनिष्ठही असला पाहिजे, असाही शेवाळकरांचा आग्रह होता. मात्र आजचे शिक्षक विद्यार्थ्यांपासून दूर जात आहेत. सर्व शिक्षक ज्ञाननिष्ठ नाहीत आणि विद्यार्थिनिष्ठ तर मुळीच नाहीत, याची खंत बोलून दाखवायचे धारिष्टय़ शेवाळकरांमध्ये होते. आजच्या शिक्षण पद्धतीबद्दल त्यांनी ‘संवादाचा सुवावो’ या ग्रंथात ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याशी बातचीत करताना व्यक्त केलेले विचार मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. शेवाळकर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होईपर्यंत साहित्य व्यवहारात कार्यकर्त्यांचे स्थान दुय्यम होते. शेवाळकरांनी मात्र साहित्य क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांला प्रतिष्ठा मिळवून दिली. संस्था केवळ लेखकाच्या भरवशावर उभ्या राहू शकत नाहीत, त्यासाठी घाम गाळणारे कार्यकर्ते लागतात आणि त्यांच्या घामाला असणारा साहित्याचा सुगंध अस्सल आणि अभिजात असतो, अशी भूमिका जाहीररीत्या मांडणारेही शेवाळकर हे पहिले साहित्यिक, वक्ते, शिक्षक आणि कार्यकर्ते! त्यांच्या या भूमिकेचे मराठी सारस्वतांनी खुल्या दिलाने स्वागत केले, ते प्रतिपादन स्वीकारले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने विराजमान होण्याची संधी शेवाळकरांना देऊन मराठी साहित्याच्या प्रांगणातील कार्यकर्त्यांचा गौरव केला. शेवाळकरांचे मराठी भाषेवरील प्रेम हाही टीकाकारांनी दुर्लक्षित केलेला एक मुद्दा. दहा मिनिटांचे भाषण असो कीे दोन तासांचे व्याख्यान, एकही इंग्रजी किंवा हिंदी शब्द न वापरता अस्खलित मराठीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची हातोटी त्यांच्यामध्ये होती. याचे एक महत्त्वाचे कारण, संत साहित्याचा त्यांच्यावर असलेला पगडा हे होते. संत-साहित्याच्या अभ्यासातून त्यांची मराठी भाषा जशी संपन्न झालेली होती, तसेच व्यासंगाचीही डूब त्या भाषेला होती. मराठी भाषेचा किंचितही उपमर्द शेवाळकरांना सहन होत नसे आणि तसे काही घडले तर एरवी सौजन्याने वागणारे शेवाळकर एखाद्या योद्धय़ासारखे लढाईसाठी समोर येत. शेवाळकरांनी एकदा भाषणाला सुरुवात केली की, वक्तृत्व आणि लिखित साहित्य यांच्यातील सीमारेषा पुसल्या जात. वक्तृत्वाची अत्यंत प्रवाही अशी शैली असणारे शेवाळकर प्रतिपादनाच्या पातळीवर श्रोत्यांना अनुभूतीचा एक वेगळा वैश्विक आविष्कार घडवत असत. शेवाळकरांच्या रामायण-महाभारतावरील व्याख्यानांना हजारोंची गर्दी होत असे. मात्र व्याख्यान मग ते धार्मिक विषयावर असले तरी श्रोत्यांना अंधश्रद्ध न होऊ देण्याचे किंवा भोंदूगिरीला उत्तेजन न देण्याचे विलक्षण सामथ्र्य शेवाळकरांच्या अशा व्याख्यानात असे. रेशमाची लगड उलगडत जावी आणि तिच्या स्पर्शाने मोहून जावे तसे काहीसे शेवाळकरांच्या व्याख्यानांमधून घडत असे. मात्र एखादा ग्रंथ किंवा घटनेवरील व्याख्यानाच्या प्रसंगी शेवाळकरांच्या प्रतिपादनाचा बाज वेगळा असे. मूळ ग्रंथ किंवा घडलेल्या घटनेबद्दल बोलण्यापेक्षा त्या ग्रंथ किंवा घटनेतील सौंदर्यस्थळे उलगडून सांगण्याची शेवाळकरांच्या व्याख्यानाची डौलदार अशी शैली होती. ज्यांनी संबंधित पुस्तक वाचलेले नाही अशांना शेवाळकरांनी पुस्तकाबद्दल काहीच सांगितले नाही, असे वाटले तरी तो ग्रंथ किंवा त्या घटनेचे सौंदर्य सांगून त्याकडे माणसाला आकृष्ट करणे जास्त आवश्यक असते. तो ग्रंथ वाचक कधीतरी वाचणारच आणि ती घटना प्रत्येकाला कधी ना कधी कळणारच असते, हे त्यामागचे खरे कारण. अशा वेळी नेमकी सौंदर्यस्थळे मांडून त्याकडे सर्वाना आकर्षित केले पाहिजे, असे शेवाळकरांना वाटत असे. शेवाळकरांच्या विविधांगी कर्तृत्वाची दखल घेऊन मराठी भाषकाने अनेक मान-सन्मान शेवाळकरांना आदरपूर्वक दिले. या सन्मानांवर राम शेवाळकरांचा सौजन्यशील अधिकार होता, यात शंकाच नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शेवाळकरांनी स्वत: झीज सोसून अनेक पुरस्कार सुरू केले. अनेक गरजू साहित्यिक, कलावंतांना कोणताही गाजावाजा न करता सर्वच प्रकारची मदत त्यांनी एक व्रत म्हणून केली. शेवाळकरांच्या दातृत्वाचा हा पैलूही त्यांच्या ‘वक्तादशसहस्रेषु’ आणि ‘साहित्यवाचस्पती’ या प्रतिमेत झाकोळून गेला. कार्यकर्ता, साहित्य निर्मिती, वक्तृत्व, गुणपूजन अशी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उठवणाऱ्या शेवाळकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राचे त्यांना मिळालेले राजदूतपद. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने सर्वच पातळय़ांवर विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात विसंवादाची दरी जेव्हा वाढू लागलेली होती तेव्हा जे मोजके साहित्यिक, विचारवंत, कलावंत आणि पत्रकार संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करण्यासाठी धैर्याने पुढे आले त्यात शेवाळकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आपण विदर्भपुत्र असून, संपूर्ण महाराष्ट्राने आपला कसा स्वीकार केलेला आहे, याचे वैयक्तिक अनुभव सांगतानाच विदर्भाने संयुक्त महाराष्ट्रात राहणे कसे हिताचे आहे, याचे प्रतिपादनच त्यांनी केले नाही, तर विदर्भात उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या प्रत्येक चळवळीला तन-मन-धनाने मदत केली. अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या या ज्ञानोपासकाचा मराठी मातीला विसर पडणे कदापि शक्य नाही.