Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

मिशन सीईटी
काऊंट डाऊन
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
मेडिकल-इंजिनिअरिंग सीईटी आता अवघ्या आठ दिवसांवर आली आहे. त्यामुळे हाती असलेल्या कमी कालावधीचा अतिशय योग्य वापर करून चांगला स्कोअर कसा करता येईल, याचे प्लॅनिंग करण्याची आता गरज आहे.
त्यासाठी ‘हे वाचा-, ते सोडवा.. असे लिहा.. तसे करू नका..’ असे सांगण्याबरोबरच तुमचा आत्मविश्वास टिकविणे आणि तो उंचावत नेणे हेसुद्धा अतिशय गरजेचे आहे.
पुण्यातील माझ्या विद्यार्थ्यांच्या व इतर काही विद्यार्थ्यांच्या सीईटी बद्दलच्या प्रतिक्रिया पहा-
सर, आता आणखी किती करायचे.. आता बास, एवढे हे सगळे माझ्याने होईल का?.., कंटाळा आलाय.., मला तर आता पळून जावेसे वाटतेय किंवा जीव घ्यावासा वाटतोय.. खूप टेन्शन आलंय हो..’
महाराष्ट्राच्या इतर भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा असेच काहीसे थोडय़ा-फार फरकाने वाटत असेल.
माझ्या युवक मित्रांनो, असा धीर खचू देवू नका. हिंमत हारू नका. मान्य आहे की..

 

बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप अभ्यास केला.. त्यानंतर लगेच सीईटीचा अभ्यास सुरू झाला आहे. त्यमुळे, ‘आता बास..’ असे वाटणे स्वाभाविक आहे. तुमची मनस्थिती मी जाणतो. पण खरं सांगू का.. ‘हत्ती गेलाय.. आता फक्त शेपूट राहिलेय..’
आपले प्रत्येकाचे एक श्रद्धास्थान असते. त्या श्रद्धास्थानावर गाढ श्रद्धा, विश्वास ठेवा आणि स्वत:चा आत्मविश्वास अत्यंत प्रबळ करा. लक्षात ठेवा-'Nothing is impossible if you decide' मी तर म्हणेन 'You can do it? तुमचा सीईटीचा रिझल्ट लागल्यावर आणि तुमच्या मनासारख्या ठिकाणी प्रवेश मिळाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या पालकांच्या व शिक्षकांच्या चेहेऱ्यावर फुललेला आनंद मला आताच दिसतोय.
‘मिशन सीईटी’ या आमच्या लेखमालेला (संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या लेखांचा खूप फायदा होतोय असे अनेकांनी कळविले. तसेच कित्येकांनी असंख्य शंका व प्रश्न विचारले आहेत. त्यातील काही निवडक शंकांचे निरसन आणि शेवटच्या आठ दिवसांचे टाईमटेबल, याबद्दलची माहिती या लेखात दिली आहे.
परीक्षा व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप :
वास्तविक महाराष्ट्र शासनाच्या सीईटीच्या माहितीपुस्तिकेत परीक्षेबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ती वाचून काढावी. त्यातील महत्त्वाच्या मुद्दय़ांना अंडरलाईन करावी. म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनेक शंका दूर होण्यास मदत होईल.
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी Phy व Chem या विषयांची १०० गुणांची परीक्षा (प्रत्येकी ५० प्रश्न आणि ५० गुण) तसेच Bio या विषयाची १०० गुणांची (१०० प्रश्न) परीक्षा असते. एकूण परीक्षा २०० गुणांची असते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी Phy व Chem (५० प्रश्न व ५० गुण प्रत्येकी) आणि Maths (५० प्रश्न व १०० गुण) अशी एकूण २०० गुणांची परीक्षा असते.
ही परीक्षा एकूण तीन भागांमध्ये घेतली जाते.
Phy व Chem च्या एकत्रित १०० गुणांचा पेपर, त्यासाठी ९० मिनिटे वेळ असतो.
’ PCB गटाच्या विद्यार्थ्यांना बायोचा पेपर दिला जातो. त्यावेळी PCB गटाच्या विद्यार्थ्यांना बायोचा पेपर दिला जातो. त्यावेळी PCM चे विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर पडतात.
’ PCB व PCMB या गटांचे विद्यार्थी शेवटी Maths पेपर सोडवितात. त्यासाठी देखील ९० मिनिटे वेळ असतो.
प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपाची Multiple Choice असते. सर्व प्रश्न अनिवार्य असतात. सर्व प्रश्न हे फक्त मान्यताप्राप्त (Board Sanctioned) पुस्तकांमधूनच विचारण्यात येतात.
त्याचप्रमाणे हे प्रश्न केवळ बारावीच्या अभ्यासक्रमावरच आधारलेले असतात. अभ्यासक्रमाबाहेरीली extra किंवा PMT/CBSE वरील प्रश्न नसतात.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंढलाच्या ६ डिसेंबर २००७ च्या परिपत्कानुसार वगळलेल्या पोर्शनवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. (विद्यार्थ्यांनी बारावीच्या पोर्शनची Scope & Limitations एकदा नजरेखालून घालावीत. (शक्य असल्यास), अनुभव असा आहे की काही शिक्षकांनाच पोर्शन काय आहे व मान्यताप्राप्त पुस्तके कती व कोणती आहेत याचीच माहिती नाही.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांना दिलेल्या पर्यायांमध्ये शास्त्रज्ञांची नावे, सनावळ्या, नन ऑफ दीज ऑल ऑफ दीज असले पर्याय नसतात.
या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसते.
शेवटच्या आठ दिवसात..
उन्हात हिंडू नका, फ्रीजमधील पाणी पिऊ नका, बाहेरचे खाणे पिणे पूर्ण बंद करा आणि ठणठणीत व आनंदी रहा.
टीव्ही, लँडलाईन/ मोबाईल, एसएमएस यापासून दूर रहा. टाईमपास करू नका.
टेन्शन घेऊ नका. तो तुमचा क्र.१चा शत्रू आहे.
सभोवतालच्या जगाला पूर्णपणे विसरा. अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. फक्त सीईटी व त्यातील खणखणीत यश एवढेच दिसू द्यात. महाभारतातल्या अर्जुनाला झाडावरच्या पोपटाचा फक्त डोळा दिसत होता. बस्स, अगदी तसेच.
रोज १४ ते १६ तास अभ्यास झालाच पाहिजे.
त्यामध्ये प्रत्येक विषयासाठी (PCM/PCB) तीन ते चार तास आणि रोज फुल पोर्शनवर असलेला पेपर सोडविण्यासाठी ३ तास.
PCM साठी- सर्व बेसिक concepts, formulae, Derivations रिव्हाईज करा. ‘टेन’च्या पावर्स, डेसिमल पाईंट शिफ्टिंग इ. प्रॅक्टिस करा. पाढे पाठ करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षभर तुम्ही जे MCQ's सोडविले आहेत, ते व्यवस्थितपणे नजरेखालून घाला. मान्यताप्राप्त पुस्तकातून थिअरीचे महत्त्वाचे मुद्दे वाचा. (पुस्तकाची यादी शेवटी दिली आहे.) वर्षभरात काही नोट्स काढल्या असतील तर त्या वाचा. शिक्षकांनी सांगितलेले तसेच तुम्ही तयार केलेले short cuts लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. बेसिक concepts पक्क्य़ा असतील तर कोणत्याही स्वरूपाची प्रश्नपत्रिका आल्यास ती सोडविणे शक्य होईल.
Bio साठी- प्रत्येक धडय़ाच्या नोट्स/ सिनॉप्सीस वाचा, पुस्तकातून अंडरलाईन केलेला, हायलाईट केलेला भाग नीट वाचा. काही धडय़ांमधील बेसिक concepts वाचा. वर्षभर सोडविलेले MCQ's पुन्हा एकदा नजरेखालून घाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे- सहा-सात मान्यताप्राप्त पुस्तके-अगदी शेवटपर्यंत पुन:पुन्हा वाचत रहा. कंटाळा करू नका. Bio ची प्रश्नपत्रिकाही मान्यताप्राप्त पुस्तकातूनच काढली जाते. त्यामुळे सर्व पुस्तके वाचण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक पुस्तकाचा काना न कोपरा वाचून खाडा. एखादा भाग किंवा अगदी एखादे वाक्य जरी वाचण्याचा तुम्ही कंटाळा केलात आणि नेमका त्यावरच प्रश्न विचारला तर? त्यामुळे रिस्क घेऊ नका. स्वत:च्या हातांनी स्वत:चे नुकसान करू नका.
आता, रोज एक पेपर सोडवायचा आहे. त्या संदर्भात बाजारात उएळ साठी खूप साहित्य उपलब्ध आहे. ऑनलाईन परीक्षा आहेत, सीडी आहेत, त्याचा वापर करायलाही हरकत नाही.
परंतु सीईटी हे वेळेचे गणित आहे. अगदी सेकंदा-सेकंदाचा विचार त्यात करायचा असतो. मग, वेळेचे हे गणित नीट जमवायचे असेल तर, सीईटी ज्या पद्धतीने घेतली जाते, त्याच पद्धतीने आपण सराव करणे आवश्यक आहे. ही परीक्षा काही ऑनलाईन नाही. तेथे तुम्हाला काही (‘क्लिक’ करायचे नसते. तेथे तुम्हाला गोळे सारवायचे असतात. (सर्कल डार्क करणे). त्यासाठी काही सेकंद तरी वेळ लागतो ना? (क्लिकपेक्षा जास्तच). म्हणून खालील पद्धत तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल, असे नक्की वाटते. सीईटीच े'Question Sets' बाजारात मिळतात. त्यातल्या त्यात एक चांगला सेट विकत घ्या. (चांगला म्हणजे- ज्यामध्ये पोर्शनला धरून प्रश्न दिलेत असा.) त्याच पुस्तकात 'Answer-sheet' चे एक पेज असते. ते व्यवस्थित कापून काढा. त्याच्या Xerox (आठ-दहा) काढा. आणि त्या 'Answer-sheet' वापर करून रोज एक पेपर सोडवा, वेळ लावून सोडवा; 'Answer-sheet' वरील उत्तराचे गोळे राखून उत्तरे काढा. म्हणजे ‘फायनल एक्साममध्ये’ तुम्हाला वेळेचं गणित बरोबर जमेल.
नंतर सोडविलेला पेपर तुमचा तुम्हीच तपासा. Question Sets मध्ये उत्तरे दिलेली असतात. ज्या प्रश्नात तुम्ही गडलेले असाल, तेथे तुम्ही का गंडला याचा विचार करा- Method चुकली का? Logic चुकले Formula वापरायला चुकलात? प्रश्न नीट समजला नाही का, उत्तर बरोबर आले नाही चुकीचा गोळा सारवला. ज्या चुका झाल्या त्यापुढच्या पेपरच्या वेळी जाणीवपूर्वक टाळा.
.. तेव्हा मित्रांनो, तुमचे भवितव्य ठरविणारी CET आता अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामध्ये घवघवीत यश मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून तयारी सुरू ठेवा.
मान्यताप्राप्त पुस्तके-
१) फिजिक्स- प्रकाशने- निराली, नरेंद्र, फढके, शेठ, बालाजी, मनाली, व्हिजन, एस. चाँद, नीलकंठ, निर्मिती, धारिया, मॅक मिलन.
२) केमिस्ट्री- निराली, नरेंद्र, उत्तम निर्मिती, शेठ, बाजी इ.
३) बायॉलॉजी- बालाजी, नीलकंठ, नरेंद्र, नीराली, फडके, व्हिजन, हिमालय.
प्रा. दिलीप शहा
सायन्स अ‍ॅकॅडमी, पुणे
(०२०) २४४४७४६४.