Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

लोकमानस

तरुणांना संशोधनाबाबत असेही प्रोत्साहन

नीरज पंडित यांच्या ‘मूलभूत संशोधनाची गरज’ या लेखात (२९ एप्रिल) म्हटल्याप्रमाणे, डॉ. अनिल काकोडकर यांनी ‘भारताने मूलभूत संशोधन करण्याची गरज आहे आणि तरुणांना वाढत्या प्रमाणात संशोधनक्षेत्रात वाव मिळावा’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

या संदर्भात गेली पाच वर्षे मराठी विज्ञान परिषदेतर्फे अणुऊर्जा आयोग आणि युनिव्हर्सिटी इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (यूआयसीटी) यांच्या आर्थिक सहकार्याने विज्ञानविषयक जागृतीचे काम केले जात आहे. महाराष्ट्राच्या तालुक्यातालुक्यात यूआयसीटीच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांची अथवा अणुऊर्जा आयोगाच्या शास्त्रज्ञांची शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांत भाषणे आयोजित केली जातात. त्यांचा हेतू विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, हाच आहे. मग संशोधन म्हणजे काय, कोणकोणत्या विषयांत संशोधन करता येते, ते कोणकोणत्या संस्थांत चालते, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते व त्यासाठी काही शिष्यवृत्त्या असतात का, असे संशोधन करणाऱ्यांना पगार किती मिळतो अशा सर्व प्रकारची माहिती दिली जाते.
गेल्या पाच वर्षांत अशी ६७० भाषणे झाली आणि प्रत्येक भाषणाला १५० मुलांची उपस्थिती धरली तर हा संदेश एक लाख मुलांपर्यंत परिषदेने पोहोचवला आहे, असे म्हणता येते. याशिवाय परिषदेतर्फे दरवर्षी अकरावी ते बी.एस्सी.पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या एक वर्षभराच्या विज्ञान संशोधनासाठी १० हजार रुपयांची तीन पारितोषिके आहेत. ही योजना गेली १० वर्षे चालू असून त्याला दुर्दैवाने फारच अल्प प्रतिसाद असतो. त्यामुळे यंदापासून एक पारितोषिक बी.एस्सी.पर्यंतच्या मुलांसाठी, दुसरे एम.एस्सी.च्या मुलांसाठी आणि तिसरे पीएच.डी. करणाऱ्या मुलांसाठी अशी पुनर्रचना करण्यात आली आहे.
परिषद गेली चार वर्षे बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना ‘दैनंदिन जीवनातील विज्ञान’ या विषयावर प्रशिक्षण देते. त्यांनी यावर शाळाशाळांत जाऊन भाषणे देण्यासाठी ही योजना आहे. भाषणाबरोबर प्रात्यक्षिकांचीही योजना असून त्यासाठी परिषद त्यांना प्रयोग संच पुरवते. यातून २०० भाषणे झाली आणि हा कार्यक्रम ३०-४० हजार मुलांपर्यंत पोहोचला. यामुळे बी.एस्सी.च्या मुलांत शिक्षणाबद्दलचा उत्साह वाढला आणि एम.एस्सी.कडे जाणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. औरंगाबादच्या कुलकर्णी या शिक्षकाने या योजनेत तर भाग घेतलाच होता, पण त्याने हे प्रयोग आणि भाषण इंग्लंडच्या शाळेत केल्यावर तेथील शिक्षक आणि विद्यार्थी अशा प्रकारच्या शैक्षणिक प्रयोगामुळे भारावून गेले होते!
मराठी माणसाला नाटक आणि गाणे आवडते. त्यामुळेच येथे केशवराव दाते, बालगंधर्व यांच्यासारखे अभिनेते आणि भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे गायक झाले. विज्ञानात मूलभूत संशोधन व्हायचे असेल तर ते येथील लोकांच्या रक्तात भिनायला हवे. मात्र विज्ञानप्रसाराचे हे काम परिषदेबरोबर बीएआरसी, टीआयएफआरसारख्या संस्थांनीही करायला हवा.
अ. पां. देशपांडे
कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, मुंबई

विज्ञाननिष्ठा महत्त्वाची

‘गोष्ट डॉट कॉम’ सदरांतर्गत दररोज एक छोटीशी गोष्ट सादर करून ज्ञानदा नाईक ‘आजचा संकल्प’ही जाहीर करत असतात. त्यांचे हे सदर कायम उत्सुकतावर्धक असते. ‘हे सगळं कोण करतं?’ या शीर्षकाची गोष्ट (२५ एप्रिल) नित्याप्रमाणे वाचली. अखेरीस लेखिका संकल्प सुचवतात- ‘मी ईश्वराचे नित्य स्मरण करेन.’
ज्ञानदाताईंना सुचवावेसे वाटते की जगाकडे, निसर्गाकडे पाहताना ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ राखणे गरजेचे आहे. त्याचे कारण - बहुसंख्य माणसे आपमतलबाने आणि भीतीपोटी ‘ईश्वर’ नावाच्या काल्पनिक व्यक्तित्त्वाला शरण जात असतात. त्याच्याकडून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी त्याला ‘नवस’रूपी लाचदेखील देत असतात. विज्ञानाधिष्ठित सबळ पुराव्याने ‘ईश्वरा’चे अस्तित्त्व सिद्धच होऊ न शकल्याने अशा या ‘ईश्वरा’चे स्मरण करून किंवा त्याला लाच देऊन आपले प्रश्न सुटतील; तर आपल्याला अन्य काही कृती-कर्म करण्याची गरजच उरणार नाही. आपण सर्वजण जाणत असतो की- हे सारे व्यर्थ आहे. तरीदेखील तोच तो विचार वर्षांनुवर्षे सर्वाच्या माथी मारत राहण्यात काही मतलब आहे का?
मानवाचे पृथ्वीवर अस्तित्त्व निर्माण झाल्यापासून आज २१व्या शतकात मानवाने कुठवर प्रगती गाठली आहे, हे आपण सर्व पाहतच आहोत. या सर्व प्रगतीमागे विज्ञानाचेच अधिष्ठान आहे आणि कोणत्याही ‘ईश्वरी चमत्कारा’ने हे काहीही घडलेले नाही, हेदेखील आपण जाणतोच. मग ईश्वरी चमत्काराचा बागुलबुवा का उभा करावा?
विजयानंद हडकर,
डोंबिवली

मतदार राजाच्या उदासीनतेची कारणे

दिवसेंदिवस मतदार मतदानाबाबतीत अधिकाधिक उदासीन होत चालले आहेत. लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी निवडणुकीसारखे प्रभावी माध्यम नाही, हे खरे असूनही १९८०पासून काही राजकारण्यांमुळे मतदारांत अनुत्साह दिसतो. एक वेळ वडापाव खाण्याची भ्रांत, अंगावर कळकट कपडे, पायात झिजलेल्या स्लिपर, बसभाडय़ाला पैसे नाहीत अशा एकेकाळच्या कार्यकर्त्यांजवळ आता नेते झाल्यावर अचानक एअरकंडिशण्ड गाडय़ा व बंगले आले कसे, हे कोडे मतदाराला पडले आहे.
१९८० नंतर राजकारणात काही धनदांडगे, गुन्ह्य़ांमध्ये सहभाग असणारे, लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी व लोकांनी आपल्याला किंवा आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मत द्यावे म्हणून वाट्टेल ते करण्यास मागेपुढे न पाहणारे किंवा त्यांचे दलाल पाहून मतदार अशा नालायक उमेदवारांना मतदान न करता घरी राहणे किंवा पिकनिकला जाणे पसंत करतात.
यंदा काही राजकारण्यांनी आपली अपत्ये किंवा पुतण्या-भाचा किंवा पत्नीला तिकीट मिळवून देऊन आपले राजकीय वारसदार मतदारांच्या माथी मारले. ज्यांनी कधी ग्रामपंचायत किंवा पालिका निवडणूकही लढवली नाही त्यांना असे लोकसभेच्या रिंगणात उभे केले जाते व त्यावर वारेमाप खर्च केला जातो, तेव्हा या उमेदवाराला आपल्या कामाबद्दल आत्मविश्वास नसल्याचाच पुरावा मतदारांना मिळतो. भ्रष्टाचार, बेकारी,नागरी सुविधा हे सामान्यजनांना भेडसावणारे प्रश्न असताना राजकारण्यांना त्याचे सोयरसुतक नाही. म्हणूनच मतदार राजा निवडणुकाबाबत उदास असल्याचे यंदा दिसून आले
जगन्नाथ निळे,
नवी मुंबई

आर्थिक निकषच खरा!

मराठा आरक्षणावरून फार दिवसांपासून गोंधळ चालला आहे. प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे असे वाटते. त्यात काही गैर नाही पण आपल्याबरोबर सर्वाचाच विकास झाला पाहिजे, ही भावना महत्त्वाची आहे. मराठय़ांना आरक्षण का नसावे, या प्रश्नाचे उत्तर येईल मराठे म्हणजे राजे, पाटील, संस्थानिक, आमदार, खासदार, मंत्री इ. मग त्यांना आरक्षणाची काय गरज? पण या समाजाची दुसरी बाजू ‘गरीब मराठा समाज’ आहे, त्याचे काय? मूठभर श्रीमंत मराठय़ांसाठी गरीब मराठय़ांवर अन्याय का?
गरीब मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनीच सर्वात जास्त आत्महत्या का केल्या याचे कारण कोणी पाहत नाही. शेती पिकत नाही, पिकली तर योग्य भाव नाही, सावकार दाराशी सतत उभा, बँकेत तर कुणी पायही ठेवू देईना, मुलाला महाविद्यालयात पाठवायला पैसा नाही, पोटाला चिमटा घेऊन शिकवलंच तर नोकरी नाही या समस्या आहेत गरीब मराठा समाजाच्या.
शहरामध्ये पंख्याच्या हवेत बसून मराठय़ांना आरक्षण द्यायला नको, असे लिहिणे सोपे आहे, पण समस्या समजून घेणे कठीण आहे.
गरीब ओबीसी समाजालाही आरक्षणाची गरज आहे हे खरे; पण मराठय़ांना आरक्षण हवे, अशी मागणी करणाऱ्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता. मग मराठा समाजाची गरीब परिस्थिती असताना त्यांना विरोध का?
वास्तविक सर्वच समाजांतील गरीब लोकांना आरक्षणाची नितांत गरज आहे. ते देणे शक्य नसल्यास सर्व अशांसाठी आर्थिक निकष लावून आरक्षण द्यावे.
किरण ढोकळे,
लातूर