Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकामे नगरपालिकेने पाडली
महाबळेश्वर, ३ मे/वार्ताहर

महाबळेश्वरातील प्रसिद्ध वेण्णालेक लगतच्या पारंपरिक स्ट्रॉबेरी बागेत अनधिकृतपणे व दहशतवादाने धनदांडग्याकडून बेकायदेशीरपणे सुरू असलेले बांधकाम नगरपालिकेने नगरसेवकांच्या साक्षीनेच पाडली. महाबळेश्वर म्हंटले की, येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा लेक, त्या सभोवतालची हिरवीगार वनश्री व परिसरातील स्ट्रॉबेरी, राजबेरी, मलबेरी इ. फळपालेभाज्यांचे मळे डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत.

टंचाई निवारण योजनांना सात दिवसांत मंजुरी- कदम
सांगली, ३ मे / प्रतिनिधी

सांगली जिल्हय़ातील टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना तांत्रिक मंजुरी तसेच प्रशासकीय मान्यता केवळ सात दिवसांत देण्याचे आदेश पालकमंत्री तथा महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी दिले. सांगली जिल्हय़ातील टंचाई निवारणाची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते.

सातारा नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांचा नेत्यांना मुजरा
सातारा, ३ मे/दिनकर झिंब्रे

सातारा नगर परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले आणि त्यांचे चुलतबंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन राजांच्या नेतृत्वाखालील अनुक्रमे सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीच्या हातामध्ये निर्विवाद सत्ता अस्तित्वात आहे. सातारा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा डांगोरा पिटला जात असतानाच दुसऱ्या बाजूला पालिकेत गोंधळ सुरू झाला असून, औटघटकेच्या नगराध्यक्षपदासाठी आघाडय़ांच्या नेत्यांना मुजरा घालण्यात काही नगरसेवकांची अनेक महिन्यांपासून चढाओढ सुरू आहे.

राज्यातील प्राध्यापकांचे मागण्यांसाठी मोर्चा, निदर्शने, बेमुदत संप आंदोलन
सोलापूर, ३ मे/प्रतिनिधी

राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या आदेशाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी करावी. नेट सेटग्रस्त प्राध्यापकांना नेट सेटमधून सूट देऊन त्यांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीतील स्थान निश्चिती त्वरित करावी. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने (एमफुक्टो) आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमफुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. भारत जाधव व प्रा. अशोक साळुंके यांनी दिली.

मुन्ना नायकवडी यांचे हृदयविकाराने निधन
सांगली, ३ मे / प्रतिनिधी

सांगलीचे माजी नगरसेवक मुस्ताक ऊर्फ मुन्ना नायकवडी यांचे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. निधनासमयी ते ५३ वर्षांचे होते. सांगली महापालिका क्षेत्रात ‘कायदेआझम’ म्हणून परिचित असणाऱ्या मुन्ना नायकवडी यांचा काल वाढदिवस होता. वाढदिवशीच त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काल ते आपल्या एका मित्रासमवेत वाढदिवस साजरा करून घरी परतल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

वारणा कारखाना पल्प विभागात भाजून दोघे कामगार जखमी
पेठवडगाव, ३ मे / वार्ताहर

वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या पल्प मिल विभागाकडील सांडपाण्यापासून उपयुक्त अशी लिग्नोसल्फोनेट पावडर तयार करणाऱ्या प्रकल्पातील ड्रायरचे झाकण तपमान वाढल्याने निघून त्यातून बाहेर पडलेल्या पेटलेल्या पावडरच्या झोत्याने तेथील दोन कामगार भाजून जखमी झाले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातातील जखमी अमर दिनकर माने (वय २२, रा.कोडोली) व संदीप शिवाजी आमले (वय २१, रा.पोखले) यांच्यावर पारगावातील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार करून नंतर त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वारणा सहकारी साखर कारखान्यात सांडपाण्यापासून ही लिग्नोसल्फोनेट पावडर तयार करण्यात येते. त्या प्रकल्पातील ड्रायरचे तपमान वाढल्याने वाफेच्या दाबाने ते तुटले व पेटलेल्या पावडरने हे कर्मचारी जखमी झाले. यातील निम्मा प्रकल्प पूर्ववत सुरू करण्यात आला असून काही भाग दोन दिवसांत सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे या प्रकल्पाचे व्यवस्थापक एन.डी.कदम यांनी सांगितले. लेबर ऑफिसर एस.आर.यादव यांनी याबाबत कोडोली पोलिसांत नोंद दिली आहे.

कराड अर्बनच्या सांगली व कोल्हापूर शहर शाखांचे स्थलांतर
कराड, ३ मे/वार्ताहर

कराड अर्बन को-ऑप. बँकेच्या सांगली शहर व कोल्हापूर शहर या शाखांचे स्थलांतर नुकतेच प्रशस्त व भव्य इमारतींमध्ये करण्यात आले. अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून या स्थलांतरित शाखेचे उद्घाटन मोठय़ा दिमाखात पार पडले. बँकेच्या सांगली शहर शाखेचे स्थलांतर तेथील पटेल चौकातील प्रशस्त इमारतीमध्ये करण्यात आले. या स्थलांतर करण्यात आलेल्या शाखेचे उद्घाटन अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी तब्बल सव्वा कोटींच्या ठेवी जमा झाल्या. कोल्हापूर शहर शाखेचे स्थलांतर शिवाजी चौकातून आराम कॉर्नर येथील प्रशस्त इमारतीत झाले. रवींद्र पाटील यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ७५ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. सदर कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष वि. पु. गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, हितचिंतक, ग्राहक सभासद, सेवकवर्ग, ठेवीदार, कर्जदार उपस्थित होते.

सातारा जिल्ह्य़ाच्या पतपुरवठा आराखडय़ाचे मंगळवारी लोकार्पण
सातारा, ३ मे/प्रतिनिधी

सातारा जिल्ह्य़ाच्या सन २००९-१० या चालू वर्षांच्या पतपुरवठा आराखडय़ाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (५ मे) जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता नियोजन भवनमध्ये होणार असल्याची माहिती जिल्ह्य़ाचे अग्रणी बँक अधिकारी श्रीराम नानल यांनी दिली. जिल्ह्य़ाची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑप महाराष्ट्रने जिल्ह्य़ाचा पतपुरवठा आराखडा तयार केला आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील, भारतीय रिझव्र्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक एच. एन. धनुरकर, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चे सहाय्यक महाप्रबंधक रेमंड डिसोझा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र सातारा क्षेत्राचे सहाय्यक महाप्रबंधक व जिल्हास्तरीय आढावा व सल्लागार समितीचे निमंत्रक रघोत्तम देवळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय मुख्य व्यवस्थापक रवी देशपांडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक अंकुशराव नलावडे तसेच जिल्ह्य़ातील विविध बँकांचे प्रमुख अधिकारी, शासकीय महामंडळांचे प्रतिनिधी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

‘विज्ञानाचा अभ्यास करताना सखोल निरीक्षणाची आवश्यकता’
कोल्हापूर, ३ मे/विशेष प्रतिनिधी

विज्ञानाचा अभ्यास करत असताना प्रत्यक्ष कृती आणि सखोल निरीक्षण यांची आवश्यकता असते. परिस्थितीशी तडजोड न करता विज्ञानाची जोपासना केल्यास श्रेष्ठ संशोधक बनता येते, असे प्रतिपादन डॉ. विक्रम साराभाई यांचे सहकारी व ज्येष्ठ अवकाश संशोधक डॉ.आर.व्ही.भोसले यांनी केले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय येथे जॉर्ज काव्र्हर विज्ञान केंद्र व एम.एन.रॉय संस्था यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विज्ञान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष एस.बी.पवार हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वैज्ञानिक पद्धतीने पाण्याने दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी प्रा. श्याम येडेकर यांनी वैज्ञानिक विचार पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिर संयोजक डॉ.राजेंद्र कुंभार यांनी केले. शिबिरात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना ध्वनी, उष्णता व प्रकाश याबाबतीत मनोरंजक प्रयोगाद्वारे माहिती देण्यात आली. प्रा.सुधीर कुंभार यांनी स्लाईड शोद्वारे जैवविविधतेची माहिती दिली. या शिबिरात मुंबई, पुणे, दौंड, सोलापूर, कराड, सातारा व कोल्हापूर येथून निवडक ३१ विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. हे शिबिर दिनांक ७ मे पर्यंत चालणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रतिकृती व उपक्रम तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शिवणकर, प्राचार्य डॉ. अजित मगदूम, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, प्रा. चौगुले, प्रा. व्ही. एम. पाटील, प्रा.विजय माने, प्रा.रानमाळे व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

केळीची सदोष रोपे देणाऱ्या ‘रिलायन्स’ला ग्राहक मंचाचा दणका
सोलापूर, ३ मे/प्रतिनिधी

सदोष केळीची रोपे दिल्याबद्दल रिलायन्स लाईफ सायन्सेस प्रा. लि. कंपनीला फटकारत सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने संबंधित शेतक ऱ्यास ६ लाख १६ हजारांची भरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे. बार्शी तालुक्यातील पानगाव येथील प्रकाश काशीनाथ ननवरे यांनी आपल्या शेतात केळीची लागवड करण्यासाठी रिलायन्स लाईफ सायन्सेस प्रा. कडून अक्षय केळीची १८०० रोपे खरेदी केली होती. कंपनीच्या मानांकनानुसार या रोपांची लागवड करुन योग्य ती काळजी घेण्यात आली होती. परंतु त्यापैकी ९० टक्के रोपे जळून गेली. म्हणून ननवरे यांनी रिलायन्स लाईफ सायन्सेसला जिल्हा ग्राहक मंचमध्ये ओढले होते. मंचच्या अध्यक्ष संगीता धायगुडे व सदस्या संजीवनी शहा आणि प्रतिभा जहागीरदार यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कंपनीला तसेच कंपनीचे वितरक धन्यकुमार सालविठ्ठल (तुंगत, ता. पंढरपूर) यांना फटकारले आणि शेतकऱ्यास ५ लाख ४० हजारांची नुकसान भरपाई, ५० हजारांचा जमीन मशागतीसाठीचा खर्च, केळींच्या रोपांची किंमत २१ हजार १५० रुपये आणि मानसिक त्रासापोटी ५ हजार असा एकूण ६ लाख १६ हजारांची भरपाई देण्याचा आदेश पारित केला. याप्रकरणी तक्रारदार प्रकाश ननवरे यांच्यातर्फे अॅड.नीलेश ठोकडे तर रिलायन्स कंपनीतर्फे अॅड. संतोष न्हावकर आणि वितरकातर्फे अॅड. आर. जी. नादरगी यांनी काम पाहिले.

‘पांडुरंग कारखान्या’तर्फे लवकरच दुसरा हप्ता
पंढरपूर, ३ मे /वार्ताहर

श्रीपूर येथील पांडुरंग सह. साखर कारखान्याकडून सन २००८-०९ या गळीत हंगामासाठी सभासदांना प्रतिटन २२५ रुपयांचा दुसरा हप्ता दिला जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक प्रशांत परिचारक, कार्यकारी संचालक के. एन. निबे यांनी दिली. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची सर्व संचालक मंडळाची बैठक श्रीपूर येथे कारखान्याचे अध्यक्ष दिनकरभाऊ मोरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत ऊस उत्पादक सभासद, शेतकरी यांना प्रतिटन २२५ रुपये दुसरा हप्ता सर्वानुमते देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याने सभासदांना या अगोदर ११०० रु. हप्ता दिला, तर दुसरा हप्ता २२५ रु. असे कारखान्याने १३२५ रु. ऊस बिलापोटी रक्कम शेतक ऱ्यांना दिली आहे, असे प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

इचलकरंजी पाणीयोजनेवर जीवन प्राधिकरण सल्लागार
इचलकरंजी, ३ मे / वार्ताहर

नगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ३६ कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा विभागातील विविध विकासकामांवर प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून काम पाहण्याची तयारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दर्शविली आहे. केंद्र शासनाच्या लहान व मध्यम शहरासाठीची पायाभूत विकास योजनेंतर्गत ३६ कोटी ९४ लाख रुपये खर्चाचा प्रकल्प इचलकरंजी नगरपालिका राबवत आहे. या अंतर्गत ४ जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, दाबनलिका बदलणे, पंचगंगा नदी पाणी योजनेतील दाबनलिका दुरुस्ती, शहापूर व कबनूरमध्ये वितरण नलिका टाकणे, जुने पंप बदलणे आदी कामांचा समावेश आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. हे काम वेळेत व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेने प्राधिकरणासाठी प्रस्ताव पाठविला होता. प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता बी. डी. कुलकर्णी यांनी हे काम करण्याची तयारी दर्शविली आहे.