Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९

‘पंक्चर’ बंगलोरला मिळाला ‘जॅक’चा आधार
उथप्पासह शतकी भागीदारी, मुंबईची सहाव्या स्थानावर घसरण

नाइट रायडर्सला चांगला ‘प्रसाद’ दिलात आता प्रसादभक्षण करून तोंड गोड करा आणि लागा पुढच्या तयारीला, अशा शुभेच्छा बहुतेक पंजाब किंग्ज इलेव्हनची मालक प्रीती झिंटा आपल्या खेळाडूंना देत असावी.

राम शेवाळकर यांचे देहावसान
नागपूर, ३ मे / प्रतिनिधी

संत साहित्यापासून समकालीन साहित्याच्या सर्वागीण अभ्यासाची दृष्टी लाभलेले, ओघवत्या वाङ्मयीन वाणीचे धनी, संस्कृत भाषेचे व्यासंगी, मराठीचे दृढ आग्रही, लोकसंग्राहक, पणजीच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, वक्ता दशसहस्रेशु नानासाहेब उपाख्य राम शेवाळकर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. नानासाहेबांच्या निघून जाण्याने त्यांच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला असून विदर्भाच्या सांस्कृतिक, वाङ्मयीन, सामाजिक क्षेत्राचा आधारवडच कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.शनिवारी नानासाहेबांचा मुलगा आशुतोष याचा वाढदिवस साजरा झाला. त्या आनंदात नानासाहेबही कुटुंबीयांसह सहभागी झाले होते पण, ती त्यांची अखेरची सायंकाळ ठरली. आज पहाटे त्यांनी मुलासोबत फराळ केला. त्यानंतर ते जपासाठी बसले आणि एका उचकीसरशी कोसळले. सर्वत्र धावाधाव झाली. तज्ज्ञ डॉक्टरांची चमूही आली पण, उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सकाळी १०.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते.
ज्ञानोपासक - अग्रलेख
आनंदयात्री! - विशेष
‘वक्ता दशसहस्त्रेषु’

मनमोहन सिंग हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार-राहुल गांधी
बरमेर, ३ मे / पी.टी.आय.

मनमोहन सिंग हेच संयुक्त पुरोगामी आघाडीचे आणि कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे सर्वात उत्तम उमेदवार असल्याचा पुनरूच्चार राहुल गांधी यांनी येथे बोलताना केला. मनमोहन सिंग हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माझी मनापासून इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील या सर्वोच्च पदासाठी आता ‘नो व्हेकन्सी’ असल्याचे सांगून राहुल गांधी यांनी या पदासाठी इच्छुक असलेल्यांना एकप्रकारे कानपिचकी दिली.

.. तर माझ्यापेक्षा तरूण व्यक्तीकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवीन - मनमोहन
नवी दिल्ली, ३ मे/वृत्तसंस्था

राहुल गांधी यांच्यामध्ये उत्तम पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी मिळाली तर एका विशिष्ट क्षणी माझ्यापेक्षा तरुण व्यक्तीकडे या पदाची सूत्रे सुपूर्द करीन असे उद्गार पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काढले. पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्यास आपण कारकीर्द पूर्ण करण्यावर भर द्याल की कारकीर्दीच्या मध्यास या पदाची सूत्रे अन्य कोणाकडे म्हणजे प्रत्येकाच्या मनात ज्यांचे नाव आहे त्या राहुल गांधीकडे सुपूर्द कराल का, या विचारलेल्या प्रश्नाला मनमोहनसिंग उत्तर देत होते.

नेपाळमध्ये पेच!
लष्करप्रमुखांना हटविल्यानंतर सीपीएन पक्षाने पाठिंबा काढला

काठमांडू, ३ मे/पी.टी.आय.

सरकारचे आदेश न पाळल्याचा ठपका ठेवून नेपाळच्या माओवादी सरकारचे पंतप्रधान प्रचंड यांनी देशाचे लष्करप्रमुख जनरल रुकमंगा कटवाल यांना त्यांच्या पदावरून हटवले. मात्र कटवाल यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, प्रचंड सरकारला पाठिंबा देणारा सीपीएन या प्रमुख राजकीय सहकारी पक्षाने या कृतीबद्दल सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. प्रचंड सरकारमधील इतर राजकीय पक्षांनीही या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून लष्कर आणि माओवादी सरकार यांच्यातील ही तेढ वाढतच जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुस्लिम मते विरोधात गेल्याने काँग्रेसमध्ये चिंता
समर खडस, मुंबई, ३ मे

हुकमाची एकगठ्ठा मते म्हणून देशभरात ज्या मुस्लिम मतांकडे काँग्रेस कायम पाहात आली होती आणि ज्यामुळे भाजपसारख्या उजव्या शक्ती कायम काँग्रेस आणि मुस्लिमांवर नेहमी टीका करत होत्या, ती मुस्लिम मते मुंबईतील बहुतांश लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या विरोधात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीचे चिंतेचे वातावरण आहे. मात्र याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी तरुणांची मते मोठय़ा प्रमाणावर घेतल्याने काँग्रेसची थोडीशी आशा अद्यापही जिवंत आहे. फाळणीची जखम घेऊन जन्माला आलेल्या भारतामध्ये प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम कायमच पुरोगामी पक्षाच्या बाजूनेच उभे राहिले. काँग्रेसला नाकारताना त्यांनी मुस्लिम लीग किंवा जमात ए इस्लामीसारख्या पक्षांना न स्वीकारता जनता पार्टी, जनता दल, समाजवादी पार्टी अशा पुरोगामी पर्यायांचाच स्वीकार केल्याचे दिसून येते. मात्र ३० एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाने चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे वातावरण उघड उघड दिसत होते.

उत्तर-मध्य मुंबईतील चार मतदानकेंद्रावर
उद्या फेरमतदान
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील दोनऐवजी चार मतदान केंद्रांवर फेरमतदान करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच सोमवारऐवजी आता मंगळवार ५ मे रोजी या मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे. कलिना येथील १८३ व १८५ आणि कुर्ला येथील २२९ए व २३२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर हे फेरमतदान घेण्यात येणार आहे. आधी निवडणूक आयोगाने केवळ कलिनातील दोन मतदान केंद्रांवर सोमवारी फेरमतदान करण्याची घोषणा केली होती. मात्र उत्तर-मध्य मुंबईतील भाजपा नेते पराग अळवणी यांनी कुल्र्यातील मतदान केंद्रावरही फेरमतदान घेण्याची मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. कुल्र्यातील उपरोक्त दोन मतदान केंद्रावरील मतदारांनी कलिनातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्याने, तेथे विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे कलिनाप्रमाणेच कुल्र्यातील मतदान केंद्रांवरही फेरमतदान घेणे गरजेचे असल्याचे अळवणी यांनी स्पष्ट केले होते.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी