Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

एस. टी. बस पुलावरून पडून २३ जखमी
सिल्लोड, ३ मे/वार्ताहर

राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पुलावरून उलटून झालेल्या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. सिल्लोड-कन्नड बस (क्रमांक एमएच२० डी ७८०२) ही बस सव्वाआठच्या सुमारास बसस्थानकातून निघाली. शहराबाहेर पडतानाच ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर कठडा नसलेल्या पुलावरून उलटली.

आमदार काळे दगडफेकीत जखमी
चिकलठाण्यातील घटनेमुळे खळबळ; दोघांना अटक

औरंगाबाद, ३ मे/प्रतिनिधी

तरुणांच्या टोळक्याने केलेल्या दगडफेकीत आमदार डॉ. कल्याण काळे आज दुपारी जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दगड लागला. त्यांना उपचारासाठी माणिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमेवर सहा टाके घालण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांचे भाऊ जगन्नाथ काळे यांनी सांगितले. या हल्ल्यात त्यांच्या मोटारीच्या काचा फुटल्या. या हल्ल्यासंदर्भात दोन जणांना अटक केल्याचे पोलीस निरीक्षक खुशालचंद बाहेती यांनी सांगितले. शेख गनी अब्दुल रऊफ आणि हारून कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

परभणीच्या मातीशी नाळ जोडलेला प्रतिभावंत!
आसाराम लोमटे, परभणी, ३ मे

प्रासादिक आणि रसाळ वक्तृत्वाविषयी ख्यातकीर्त असलेले प्राचार्य राम शेवाळकर यांचे कर्तृत्व विदर्भात बहरले; पण मराठवाडी मातीशी त्यांचे जन्मापासूनचे नाते होते. जुन्या परभणी जिल्ह्य़ातले शेवाळा (तालुका कळमनुरी) हे त्यांचे मूळ गाव, त्यामुळे या जिल्ह्य़ाच्या मातीशी त्यांची नाळ होतीच. शेवाळकर यांच्या निधनाने आपल्या मातीतला प्रतिभावंत हरपला, अशाच साहित्य रसिकांच्या भावना आहेत.

दोघांचे एकच गाणे
दिवसभराच्या गोंधळानंतर काम संपलं स्लॅबचं. दुसऱ्या दिवशी कमी सिमेंट वापरून ‘माल’ तयार केला. त्याचे चौकोनी आळे किंवा साचे नुकत्याच भरलेल्या नव्या छतावर तयार केले. दुसऱ्या दिवसापासून तीन आठवडय़ांपर्यंत जेवढं देता येईल तेवढं पाणी द्यावं लागतं. दिवसभरात ती आळी दोन-तीन वेळा भरत राहावी लागतात. रात्री एकदा भरली ती की सकाळवर कोरडी होतात. पण वापरलेल्या सिमेंटची तहान काही भागत नाही. कितीही पाणी टाका.

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
गंगाखेड, ३ मे/वार्ताहर

तालुक्यातील डोंगराळ भागासह अन्य भागात पुन्हा एकदा रानडुकरांचा त्रास सुरू झाला आहे. तालुक्यातील निळानाईक तांडा येथील शेतकरी रामचंद्र चव्हाण (वय ४०) काल रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाले. निळानाईक या तांडय़ावरील रामचंद्र चव्हाण काल सायंकाळी ७ वाजता शेतात चालले होते. अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करीत दोन्ही मांडय़ांना चावा घेतला. गंगाखेडच्या जिल्हा उपरुग्णालयात प्रथमोपचार करून चव्हाण यांनाअंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
तालुक्यातील कोद्री, पिंपळदरी, उंडेगाव, वडवणी, महातपुरी, खळी, दुसलगाव परिसरात रानडुकरे पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

तेरच्या रुग्णालयातील शिपायाला बलात्काराच्या आरोपावरून अटक
उस्मानाबाद, ३ मे/वार्ताहर

सहकारी मित्राच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून तेरच्या ग्रामीण रुग्णालयातील शिपाई उमेश माणिकराव जाधव (वय २७) याला पोलिसांनी अटक केली आहे. तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दीड वर्षांपूर्वी उमेश जाधव रुजू झाला. त्याचे चार वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. त्याची पत्नी परीक्षेसाठी गावी गेल्यानंतर शनिवारी जाधवने आपल्या सहकारी मित्राच्या मुलीवर बलात्कार केला. शासकीय वसाहतीतील जाधवच्या घरासमोरून काल रात्री ही मुलगी स्वत:च्या घरी निघाली होती. त्या मुलीस उमेशने ‘माझ्या बायकोचे कपडे आणले का?’ म्हणून विचारले आणि तिला ओढतच घरात नेले. टी. व्ही. चा आवाज मोठा करून तिच्यावर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली, असे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर ढोकी पोलिसांनी जाधवला अटक केली.

कुलूप तोडून एक लाखाची चोरी
नांदेड, ३ मे/वार्ताहर

शहर व परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून काल मध्यरात्री वामननगर परिसरातील शिक्षक ज्ञानोबा गव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून चोरांनी एक लाख रुपयांचा ऐवज नेला.
अखंडितपणे सुरू असलेल्या चोरीचे गुन्हे थांबविण्यासाठी घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील अधिकारी सर्व काही आलबेल असल्याच्या आविर्भावात आहेत. शहरात सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात छोटय़ा-मोठय़ा चोऱ्या होत आहेत. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने चोऱ्या होत असताना पोलिसांना मात्र त्यांचे धागेदोरे अद्यापि सापडले नाहीत. वामननगर परिसरात राहणारे शिक्षक ज्ञानोबा गव्हाणे कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरटय़ांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा ऐवज नेला. चोरी झाल्याचे काल सकाळी लक्षात आल्यानंतर ज्ञानोबा गव्हाणे यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

‘महाराष्ट्र देशा’ सीडीचे लातूर येथे प्रकाशन
लातूर, ३ मे/वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘महाराष्ट्र देशा’ या मराठी गीतांच्या सीडीचे प्रकाशन क्रीडामंत्री दिलीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या सीडीचे १ मे रोजी प्रकाशन करण्यात आले. लातूरचे तरुण किरण माने यांची निर्मिती असलेल्या ‘महाराष्ट्र देशा’ या अल्बमला संपर्कमंत्री देशमुख यांनी शुभेच्छा देत हा अल्बम राज्यभर गाजावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. लातूरची नाटय़चळवळ चालविणाऱ्या युवकांनी मिळून सबंध देशाचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीते ही लातूरच्या आदिनाथ शिंदे यांनी लिहिली आहेत. या अल्बममध्ये आठ वीररसातील गीते ही पं. शौनक अभिषेकी, सारेगमफेम अनिकेत सराफ, जितेंद्र अभ्यंकर, चंद्रकांत महामुनी यांनी गायिली आहेत. रोहित नागभिडे व लातूरचे शैलेश लोखंडे यांनी संगीत दिले आहे.

सामुदायिक विवाह सोहळय़ाचे आयोजन
बीड, ३ मे/वार्ताहर

शारदा प्रतिष्ठानचा अकरावा सामूहिक विवाहसोहळा गढी येथील भवानी मंदिराच्या प्रांगणात संत-महंतांच्या उपस्थितीत व सनई चौघडय़ांच्या मंगलमयी सुरात हजारो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने पार पडला. या वेळी ह.भ.प. विष्णू रामानंद भारती महाराज, आशाबाई जाधव तलवाडेकर, भगवानबाबा टाकळगावकर, तीर्थराज महाराज पठाडे, विठ्ठल महाराज पंडित, रघुनाथ महाराज भोजगावकर, विद्याताई रामदास, अनिल महाराज रामदासी, अर्जुन महाराज जाधव, गायकवाड महाराज आनंदवाडीकर आदी उपस्थित होते.प्रारंभी जयभवानी महाविद्यालय येथून वधू-वरांची मिरवणूक कृषी सभापती विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. अकराव्या सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, संतमहंत, वऱ्हाडी मंडळींचे स्वागत कार्यवाह आमदार पंडित, भाजपा तालुकाध्यक्ष शेख जमादार, नगराध्यक्ष प्रशांत भागवत, जिल्हा परिषद सदस्य प्रा. पी. टी. चव्हाण आदींनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन प्रतिष्ठानचे कार्यवाह आमदार अमरसिंह पंडित यांनी केले.

पीक कर्ज वाटपातील गैरव्यवहार; शाखाधिकाऱ्यासह तिघे निलंबित
बीड, ३ मे/वार्ताहर

जिल्हा बँकेच्या सिरसाळा शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात गैरव्यवहार केल्याच्या कारणावरून शाखा अधिकाऱ्यासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये कर्मचारी व अधिकारी राजकीय वरदहस्ताच्या नावाखाली मनमानी कारभार करत असल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यातून अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाचीही कार्यवाही करण्यात आली आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा शाखेतही मागील काही दिवसांपासून शाखा अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी गैरव्यवहार करत असल्याचे निष्पन्न झाले. शेतक ऱ्याकडून पैसे घेण्याचे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. बँक व्यवस्थापनाने केलेल्या चौकशीत शाखा व्यवस्थापक विजय सरवदे, तपासणीस एस. पी. जाधव व लिपिक डी. एम. सावंत हे दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय बँक व्यवस्थापकाने घेतला. २८ एप्रिलला निलंबनाचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्हा बँकेच्या अन्य शाखेतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पालिका कर्मचाऱ्याला मांस विक्रेत्याची धमकी
औरंगाबाद, ३ मे/प्रतिनिधी

बेकायदेशीररित्या होणारी मांस विक्री पालिकेच्या पथकाने थांबविल्याने चिडलेल्या मांस विक्रेत्याने पालिका कर्मचाऱ्यास धमकी दिली. सकाळी कांचनवाडी येथे ही घटना घडली.
पालिकेच्या पथकाने असदुल्लाह यांच्या नेतृत्वाखाली कांचनवाडी येथे बेकायदेशीरपणे होणारी मांस विक्री थांबविली. मोहसीन दाऊद कुरेशी याच्या दुकानावर छापा घातला आणि तेथील मांस नष्ट केले. त्याच्याकडे परवाना नव्हता. वाल्मी संस्थेच्या समोरच उघडय़ा जागेवर तो मांसविक्री करत होता. पंचनामा केल्यानंतर त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर त्याचा भाऊ सलीम याने असदुल्लाह यांना गाठून ‘बघून घेईन’ अशी धमकी दिली. यानंतर पुन्हा सलीम याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आले असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक आणि विभागप्रमुख डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले. गेल्याच आठवडय़ात पालिकेच्या सुरक्षारक्षकांवर बेकायदेशीरपणे मांस विक्री करणाऱ्या काही खाटिकांनी हल्ला केला होता. ही घटना टी. व्ही. सेंटर भागात घडली होती.

शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला अपघात; चालक जखमी
औरंगाबाद, ३मे/प्रतिनिधी

शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी वैजापूर मार्गावर घडली. बाळू दत्तात्रय जाधव (वय ३०, भोईवाडा) असे जखमी चालकाचे नाव असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेनेची रुग्णवाहिका औरंगाबादकडे येत होती. दिवशी पिंपळगाव येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. चालकाच्या बाजूनेच धडक लागल्याने चालक बाळू हा जखमी झाला.

वर्णा येथे तरुणीचा उष्माघाताने मृत्यू
बोरी, ३ मे/वार्ताहर

जिंतूर तालुक्यातील वर्णा येथे शुक्रवारी एका तरुणीचा मृत्यू झाला. यमुना गजानन अंभोरे (वय २१) असे तिचे नाव आहे. बोरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. बोरीपासून पाच किलोमीटरवर असलेल्या वर्णा येथील गजानन लक्ष्मणराव अंभोरे, जिजाबाई लक्ष्मणराव अंभोरे व यमुना गजानन अंभोरे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतात कामासाठी गेले. भर उन्हात पिकांचे काड वेचीत असताना दुपारी १ वाजता अचानक यमुनाला उलटय़ा झाल्या. तिला ताबडतोब बोरी येथील डॉ. बकान यांच्याकडे उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी परभणीस जाण्याचा सल्ला दिल्यानंतर तिला परभणीच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रात्री तिला भयंकर त्रास सुरू झाला. अंगात ताप तीव्र असल्याने व छातीत दुखू लागल्यावर मध्यरात्री १ वाजता यमुना हिला नांदेडला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका आणली, परंतु रात्री दोनच्या सुमारास तिचे निधन झाले. यमुनाचा पती गजानन अंभोरे याने काल बोरी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

निवडणूक भत्ता देण्याची मागणी
धारूर, ३ मे/वार्ताहर

मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती आदेशही मिळाले व त्यासाठी तीनदा प्रशिक्षणही घेतले. परंतु ऐनवेळी राखीव असल्याचे सांगून २२ एप्रिलला २४ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतून कार्यमुक्त करण्यात आले. त्यांना निवडणूक भत्ता मिळालाच नाही. तो मिळावा, अशा मागणीचे निवेदन या २४ कर्मचाऱ्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बीड मतदारसंघातील निवडणूक कार्यात मतदान अधिकारी म्हणून आम्हा २४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांना राखीव असल्याचे सांगून ऐन वेळी कार्यमुक्त करण्यात आले होते.