Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

राम शेवाळकर यांचे देहावसान
नागपूर, ३ मे / प्रतिनिधी

संत साहित्यापासून समकालीन साहित्याच्या सर्वागीण अभ्यासाची दृष्टी लाभलेले, ओघवत्या वाङ्मयीन वाणीचे धनी, संस्कृत भाषेचे व्यासंगी, मराठीचे दृढ आग्रही,

 

लोकसंग्राहक, पणजीच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, वक्ता दशसहस्रेशु नानासाहेब उपाख्य राम शेवाळकर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. नानासाहेबांच्या निघून जाण्याने त्यांच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला असून विदर्भाच्या सांस्कृतिक, वाङ्मयीन, सामाजिक क्षेत्राचा आधारवडच कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.
शनिवारी नानासाहेबांचा मुलगा आशुतोष याचा वाढदिवस साजरा झाला. त्या आनंदात नानासाहेबही कुटुंबीयांसह सहभागी झाले होते पण, ती त्यांची अखेरची सायंकाळ ठरली. आज पहाटे त्यांनी मुलासोबत फराळ केला. त्यानंतर ते जपासाठी बसले आणि एका उचकीसरशी कोसळले. सर्वत्र धावाधाव झाली. तज्ज्ञ डॉक्टरांची चमूही आली पण, उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सकाळी १०.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते.
नानासाहेब गेल्या अनेक वर्षांपासून हृदयरुग्ण होते पण, अंतरीच्या कळा चेहऱ्यावर न आणता ते अखेरच्या श्वासापर्यंत भाषणे, प्रवचने, प्रस्तावनांसाठी खपत होते. प्रकृती साथ देत नव्हती तरीही त्यांच्या उत्साहाला पारावार नव्हता. कोणत्याही क्षेत्रातले निमंत्रण असो त्यांच्या तोंडी नकार नव्हता. घरी येणाऱ्याला त्यांची कवाडे नेहमीच खुली होती. दगदगीची त्यांनी केव्हाच पर्वा केली नाही. पुरेशी व्यवस्था असो वा नसो, व्याख्यानांसाठी ते कुठल्याही वाहनाचे फिरायचे. प्रकृती जपण्याचा सल्लाही ते चार निमंत्रणे स्वीकारून आणि चारचौघात वावरूनच पाळत असत. कामाचा त्यांचा झपाटाच असा होता की भाषणे आणि प्रवचनांची तर मोजदादच लागत नाही. तीन हजारांपेक्षा अधिक पुस्तकांच्या प्रस्तावना त्यांच्या नावावर आहेत आणि पुणे, मुंबई, नागपुरातील बावीस पुस्तके त्यांच्याकडे प्रस्तावनांसाठी आजही पडून आहेत. नुकतेच त्यांचे ‘पाणियावरी मकरी’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. त्यांचा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा वेध घेणारा ‘विचक्षणा’ हा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या पुस्तकाच्या मुद्रित शोधनाचे सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांनी शनिवारीच ते पुस्तक प्रकाशकांच्या स्वाधीन केले. रात्रीच बाबुराव मेहुणकर यांचे ‘संत तत्त्वोपनिषद’ हे पुस्तकही त्यांनी वाचून संपवले. वाचन, अभ्यास, अध्ययन, समीक्षेचे त्यांना वेडच होते. आचार्य कुलाच्या अधिपत्याखालील मामा क्षीरसागर प्रतिष्ठानचे ते प्रमुख होते. ६ एप्रिलला प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी ही संस्था सवरेदय आश्रमात विलीन केली. विनोबा विचार केंद्रात झालेला हा त्यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला. केवळ प्रस्थापितच नव्हे तर नवोदित कलावंत, लेखकांनाही नानासाहेबांचा मोठा आधार होता. अनेक लेखक त्यांचा आशीर्वाद घेऊन लेखनाचा किंवा वाङ्मयीन उपक्रमाचा संकल्प सोडीत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून अनेक सन्मान, पुरस्कार त्यांच्या वाटय़ाला आले. या प्रवासात अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली. आयुष्याच्या वाटचालीत केवळ साहित्य, संगीत, संस्कृती किंवा कलेचेच क्षेत्र नव्हे तर मंत्र्यांपासून तो सामान्य माणसापर्यंत त्यांनी असंख्य जिव्हाळ्याची माणसे जोडली. हे संबंध जोपासत असतानाच त्यांचा कामाचा झपाटाही कुठेच मंदावला नव्हता. ऊर्जेचा हा अखंड स्रोत आता मात्र विसावला आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.