Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मनमोहन सिंग हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार-राहुल गांधी
बरमेर, ३ मे / पी.टी.आय.

मनमोहन सिंग हेच संयुक्त पुरोगामी आघाडीचे आणि कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे सर्वात उत्तम उमेदवार असल्याचा पुनरूच्चार राहुल गांधी यांनी येथे बोलताना केला. मनमोहन

 

सिंग हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माझी मनापासून इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील या सर्वोच्च पदासाठी आता ‘नो व्हेकन्सी’ असल्याचे सांगून राहुल गांधी यांनी या पदासाठी इच्छुक असलेल्यांना एकप्रकारे कानपिचकी दिली. निवडणुका घोषित होताच सिंग यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सर्वसंमतीने ठरविण्यात आल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. पुढील पंतप्रधान मनमोहन सिंग हेच असतील तसेच त्यावेळी अणुकराराची पूर्तता होईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. येथील कॉँग्रेसचे उमेदवार हरीश चौधरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवरही हल्ला चढविला. गेल्या निवडणूकीत भाजपने ‘इंडिया शायनिंग ’ मोहीम राबविली. तत्कालिन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने ‘इंडिया शायनिंग’ चा उदोउदो केला पण त्याचा फायदा शेअरबाजाराशी संबंधित असणाऱ्यांना तसेच देशातील उच्चभ्रू व अतिश्रीमंत व्यक्तींशी निगडित होता. सामान्य माणूस या ‘शायनिंग’ पासून कोसो दूर होता, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ‘एनडीए’ ने शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल उपस्थित करून राहुल गांधी म्हणाले त्यांच्या सरकारमधील एका घटक पक्षाच्या नेत्याने देशाला शेतकऱ्यांची नव्हे तर कॉल सेंटर सुरू करणाऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले होते यावरून त्यांचे शेती आणि शेतकरी यांच्यावरील प्रेम किती बेगडी होते हे लक्षात येते, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.