Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

.. तर माझ्यापेक्षा तरूण व्यक्तीकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवीन - मनमोहन
नवी दिल्ली, ३ मे/वृत्तसंस्था

राहुल गांधी यांच्यामध्ये उत्तम पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण

 

आहेत. पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी मिळाली तर एका विशिष्ट क्षणी माझ्यापेक्षा तरुण व्यक्तीकडे या पदाची सूत्रे सुपूर्द करीन असे उद्गार पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काढले. पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्यास आपण कारकीर्द पूर्ण करण्यावर भर द्याल की कारकीर्दीच्या मध्यास या पदाची सूत्रे अन्य कोणाकडे म्हणजे प्रत्येकाच्या मनात ज्यांचे नाव आहे त्या राहुल गांधीकडे सुपूर्द कराल का, या विचारलेल्या प्रश्नाला मनमोहनसिंग उत्तर देत होते. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत कोणती कामे अपुरी राहिली त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो? पंतप्रधानपदी विराजमान होण्याची पुन्हा संधी मिळाल्यास तुम्ही ही कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देणार का या प्रश्नावर मनमोहनसिंग म्हणाले की, मला शेती, शिक्षण व ग्रामीण आरोग्य या क्षेत्रांना प्राघान्य द्यायला आवडेल. २००४ साली लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधानपदी आपली निवड झाली आहे हे कळले तेंव्हा मनात काय भावना दाटल्या असे सांगून मनमोहनसिंग म्हणाले की, माझी पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याचे या पदासाठी शपथविधी होण्याच्या फक्त ४८ तास आधी सोनिया गांधी यांनी मला सांगितले होते. पंतप्रधानपदाासाठी सोनिया गांधी याच सुयोग्य उमेदवार आहेत हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या व्यक्तित्वाला काही मर्यादा आहेत, मी लोकनेता नाही असे मी सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र सोनिया गांधी यांनी त्यावेळी माझे काहीही ऐकून घेतले नाही. सरतेशेवटी पंतप्रधानपदाची जबाबदारी मी स्वीकारली. सोनिया गांधी यांनी दाखविलेल्या विश्वासाच्या पाठबळावरच मी पंतप्रधान म्हणून कामास प्रारंभ केला.