Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

नेपाळमध्ये पेच!
लष्करप्रमुखांना हटविल्यानंतर सीपीएन पक्षाने पाठिंबा काढला
काठमांडू, ३ मे/पी.टी.आय.

सरकारचे आदेश न पाळल्याचा ठपका ठेवून नेपाळच्या माओवादी सरकारचे पंतप्रधान

 

प्रचंड यांनी देशाचे लष्करप्रमुख जनरल रुकमंगा कटवाल यांना त्यांच्या पदावरून हटवले. मात्र कटवाल यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, प्रचंड सरकारला पाठिंबा देणारा सीपीएन या प्रमुख राजकीय सहकारी पक्षाने या कृतीबद्दल सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. प्रचंड सरकारमधील इतर राजकीय पक्षांनीही या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून लष्कर आणि माओवादी सरकार यांच्यातील ही तेढ वाढतच जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
६१ वर्षीय लष्करप्रमुख कटवाल यांना पदावरून हटवायचेच होते तर प्रचंड यांनी घटनात्मक तरतुदींचा आधार घ्यायला हवा होता तसेच इतर सहकारी पक्षांना विश्वासात घ्यायला हवे होते असे मत नेपाळचे राष्ट्रपती डॉ. राम बरन यादव यांनीही व्यक्त केले आहे. प्रचंड यांनी आज कॅबिनेटची बैठक बोलावली व चार सहकारी पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नसतानाही लष्करप्रमुख कटवाल यांना पदावरून हटविण्याचा निर्णय जाहीर केला. लष्करप्रमुखांना हटविले कारण सरकारच्या आदेशाचे नीट पालन का झाले नाही याबाबत योग्य व समाधानकारक खुलासा करण्यात ते अपयशी ठरले असे नेपाळचे माहिती मंत्री कृष्ण बहाद्दूर महारा यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. लेफ्टनंट जनरल कुल बहाद्दूर खडका यांची लष्करप्रमुख या पदावर प्रचंड यांनी नियुक्तीही जाहीर केली असून ते प्रचंड यांच्या अत्यंत विश्वासातील समजले जातात. या कृतीबद्दल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून विरोधी प्रतिक्रिया उमटल्या असून भारतानेही या निर्णयाबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. कटवाल आणि प्रचंड यांनी आपसातील मतभेद मिटवून टाकावेत अशी इच्छा भारताने प्रदर्शित केली आहे.