Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मुस्लिम मते विरोधात गेल्याने काँग्रेसमध्ये चिंता
समर खडस, मुंबई, ३ मे

हुकमाची एकगठ्ठा मते म्हणून देशभरात ज्या मुस्लिम मतांकडे काँग्रेस कायम पाहात आली होती आणि ज्यामुळे भाजपसारख्या उजव्या शक्ती कायम काँग्रेस आणि

 

मुस्लिमांवर नेहमी टीका करत होत्या, ती मुस्लिम मते मुंबईतील बहुतांश लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या विरोधात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीचे चिंतेचे वातावरण आहे. मात्र याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी तरुणांची मते मोठय़ा प्रमाणावर घेतल्याने काँग्रेसची थोडीशी आशा अद्यापही जिवंत आहे.
फाळणीची जखम घेऊन जन्माला आलेल्या भारतामध्ये प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम कायमच पुरोगामी पक्षाच्या बाजूनेच उभे राहिले. काँग्रेसला नाकारताना त्यांनी मुस्लिम लीग किंवा जमात ए इस्लामीसारख्या पक्षांना न स्वीकारता जनता पार्टी, जनता दल, समाजवादी पार्टी अशा पुरोगामी पर्यायांचाच स्वीकार केल्याचे दिसून येते. मात्र ३० एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाने चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे वातावरण उघड उघड दिसत होते.
दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा विभागात मुस्लिम वस्त्यांमध्ये उघडपणे तीर-कमानचा नारा बुलंद झालेला दिसत होता. धारावीमधील बडी मस्जीद, चमडा बाजार, एकेजी नगर, पाल वाडी, शेट वाडी आदी वस्त्यांमध्ये मुस्लिम कार्यकर्ते गळ्यात भगवी उपरणी घालून मतदानाला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना तीर-कमानची आठवण करून देत होते. या वस्त्यांमधील अनेकांशी संवाद साधला असता अनेक मुस्लिम नागरिकांनी शिवसेनेला मतदान केल्याचे स्पष्टही केले. काँग्रेस आणि शिवसेनेत फारसा फरक नाही, काँग्रेस मुस्लिमांना पुरेसे प्रतिनिधित्वही देत नाही, असे मुस्लिमांचे म्हणणे आहे.
दक्षिण मुंबईमध्ये बसपाचे उमेदवार महंमद अली यांची जितकी हवा होती तितका मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही, तरीही नागपाडा, भायखळा, शिवडी आदी भागांमध्ये ‘हाथ नही हाथी महंमदभाई है साथी’ अशी घोषणा सुरू होती. उत्तर-मध्य मतदारसंघामध्ये भाईजान हे बसपातून उभे राहिले होते. वांद्रे बेहराम पाडा, सांताक्रूझ गोळीबार, कुर्ला कसाईवाडा, चांदीवली आदी भागांमधून भाईजान यांना तुफान प्रतिसाद होता. हाच प्रकार उत्तर-पश्चिममध्ये सपाचे अबू आझमी यांच्याबाबतही होता. जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव स्कॉटर्स कॉलनी आदी ठिकाणी आझमी यांच्यासाठी मुस्लिम प्रचंड प्रमाणावर मतदानासाठी उतरले होते.
काँग्रेसला अचानक मुस्लिमांनी का नाकारले असा प्रश्न आता काँग्रेसमधील अनेक धुरिणांना पडला आहे. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीत दिरंगाई, राजकारणात पुरेसे प्रतिनिधित्व नाही, सच्चरचे गाजर दाखवून प्रत्यक्षात शिक्षण, नोकऱ्या यांच्यामध्ये कोणतेही स्थान नाही, असे काही प्रमुख प्रश्न नाराजीचे कारण होते. मात्र मुंबईतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक मुस्लिम लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई व राज्यातील सामाजिक सौहार्द न बिघडल्याने मुस्लिमांवरील काँग्रेसला मतदान करण्याचे दडपण निघून गेले. शिवसेना- भाजप दंगे करते ही भीती निघून गेल्यानेच हा प्रकार घडला असावा, असे काँग्रेसच्या नेत्यांना आता वाटते आहे. तसेच दुसरीकडे भाजपने संपूर्ण देशभरात अत्यंत चलाखीने आक्रमक मुस्लिमविरोधी भूमिका घेण्याचे टाळले आहे. वरुण गांधी यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांनाही फारसे महत्त्व देण्याचे काम भाजपने केले नाही, यामागे एक चलाख खेळी असावी, असे आता काँग्रेसमधील अनेकांना वाटते आहे.
मुंबईमध्ये मुस्लिमांनी पाठ फिरवल्याने सहाच्या सहा जागांवर काँग्रेस अडचणीत येऊ शकते. मात्र त्याचवेळी त्यांच्या मदतीला ‘मनसे’ आल्यामुळेच काँग्रेसमधील धुगधुगी अद्याप कायम आहे.