Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘वक्ता दशसहस्त्रेषु’
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मुंबईतील साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रालाही जबरदस्त धक्का बसला आहे. शेवाळकर यांच्या जाण्याने ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हरपला आहेच, पण त्याच बरोबर महाराष्ट्र साहित्य, संस्कृती, संतसाहित्याच्या व्यासंगी अभ्यासकाला मुकला असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य साहित्यप्रेमी, वाचकांबरोबरच राजकारण आणि अन्य क्षेत्रातील लोकांनीही शेवाळकर यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अरुण साधू (ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार)- शेवाळकर यांचे निधन ही धक्कादायक बातमी आहे. ते उत्कृष्ट वक्ते, भारतीय व मराठी संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध होते. ते मला आपला धाकटा भाऊ मानत असत. अत्यंत मनमोकळा स्वभाव आणि खास वऱ्हाडी शैलीतील आदरातिथ्य ही त्यांची वैशिष्टय़े होती.
विद्याधर निमकर (चतुरंग प्रतिष्ठान)- आमच्या चतुरंग प्रतिष्ठान संस्थेचे ते आधारवड

 

होते. संस्था कशी चालवायची आणि ती चालवतांना माणसांना कसे जोडून ठेवायचे, याचा ते एक आदर्श वस्तूपाठ होते. आम्ही वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेत असू. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रावर त्यांचा एक आदरयुक्त व प्रेमळ असा दरारा होता. कोणत्याही घटनेतून चांगला अर्थ कसा काढायचा, हे त्यांनीच आम्हाला शिकवले.
डॉ. अरुण टिकेकर (ज्येष्ठ पत्रकार व एशियाटीक सोसायटीचे अध्यक्ष)-शेवाळकर अमोघ वक्तृत्वाची निसर्गदत्त देणगी लाभलेले, संत वाङ्मयाचे भाष्यकार, समाजात टोकाची भूमिका घेणाऱ्यांमध्ये सामंजस्य साधू पाहणारे समन्वयक, ऋजू व्यक्तीमत्वाचे पण चुकणाऱ्याला प्रसंगी चार शब्द सुनावण्याचे सामथ्र्य असलेले आणि साहित्य व संस्कृतीचे व्यासंगी आज आपल्यातून निघून गेले आहेत. हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मोठे नुकसान आहेच, पण त्याचबरोबर समाजाचेही अपरिमित नुकसान आहे.
प्रा. डॉ. सुभाष भेंडे (ज्येष्ठ साहित्यिक)- शेवाळकर हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. रसाळ वाणीचा आणि श्रोत्यांना एका जागी खिळवून ठेवणारा वक्ता म्हणून त्यांची चांद्यापासून बांद्यापर्यंत ख्याती होती. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने सारे जण मंत्रमुग्ध होऊन जायचे.
नागपूरातील त्यांचे निवासस्थान हे विदर्भातील एक सांस्कृतिक केंद्र होते. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य व संस्कृतीची कधीही भरून येणार नाही, अशी हानी झाली आहे.
प्रा. के. ज. पुरोहित (जेष्ठ साहित्यिक)- मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांचे वाचन अखंड होते. संस्था कशी वाढवावी आणि माणसे कशी जोडावीत, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांच्या निधनाने आपण सांस्कृतिक क्षेत्राचा फार मोठा आधार गमावला आहे.
राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
सुशीलकुमार शिंदे (केंद्रीय ऊर्जामंत्री)- शेवाळकर हे विचारवंत आणि बुद्धीवंत होते. मराठी साहित्य व भाषेसाठी त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने युवकांना प्रेरणा मिळायची तर सर्वसामान्य लोकांना त्यांचे वकृत्व विचार करायला लावायचे.
नितीन गडकरी (भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)- शेवाळकर आणि आमचे कौटुंबीक संबंध होते. ते विदर्भाचा अभिमान आणि ‘महाराष्ट्र भूषण’ होते. मराठीवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. सोप्या व सर्वाना सहज समजेल, अशा भाषेत ते लेखन करत असत.
माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस-आयचे प्रदेशाध्यक्ष)- युवकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व संस्कृतीची जी हानी झाली आहे, ती कधीही भरून येणार नाही.
अशोक चव्हाण (मुख्यमंत्री)- ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी संपूर्ण राज्यात ख्याती प्राप्त केलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मराठी साहित्यातील तेजस्वी तारा निखळला आहे. लाखो रसिकांवर त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी पडली होती. ज्ञानेश्वरी, रामायण आणि महाभारताच्या निरुपणाला त्यांनी आपल्या प्रतिभेने वेगळ्या उंचीवर पोहोचवले होते.
छगन भुजबळ (उपमुख्यमंत्री)- मराठी साहित्याचा आधारस्तंभ हरपला आहे. मराठी साहित्य व संस्कृती क्षेत्रातील त्यांचा वावर हा अनेकांना आधार देणारा होता. त्यांच्या मतांचा सर्वत्र आदर केला जात असे.
मनोहर जोशी (शिवसेना नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष)- शेवाळकर यांच्या निधनाने मराठी शारदेचा सच्चा उपासक आपल्यातून निघून गेला आहे. एक चतुरस्र साहित्यिक म्हणून ते कायमच मराठी वाचकांच्या स्मरणात राहतील. ते माझे वैयक्तिक मित्र असल्याने माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला ते उपस्थित राहात.
आर. आर. पाटील (माजी उपमुख्यमंत्री)- सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्था आणि व्यक्तींचे ते आधारस्तंभ होते. उत्तम संघटक, उत्तम लेखक आणि अनुपमवाणी वैभवाचे धनी असेलेले शेवाळकर आज आपल्यात नाहीत.
विलासराव देशमुख (माजी मुख्यमंत्री)- कविता, आत्मकथन, ललित लेखनासह सर्व वाङ्मय प्रकारात त्यांनी आपला स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवला होता. त्यांना अमोघ वाणीचे वरदान मिळाले होते. त्यांचा नम्र व आगत्यशील स्वभाव आणि वऱ्हाडी आदरातिथ्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ साहित्यिक, व्यासंगी तत्ववेत्ता व विचारवंत आणि उत्तम वक्ता गमावला आहे.
जीवनपट
नाव : राम बाळकृष्ण शेवाळकर; जन्म : २ मार्च १९३१; कौटुंबिक : आई : गोपिका बाळकृष्ण शेवाळकर; वडील : बाळकृष्ण काशिनाथ शेवाळकर; पत्नी : विजया शेवाळकर; पुत्र : आशुतोष ; सून : मनीषा; शिक्षण : एम.ए. (संस्कृत), एम.ए. (मराठी) नागपूर विद्यापीठ; (प्रथम श्रेणी : ना.के. बेहरे सुवर्णपदक) जीविका : शिक्षक, शासकीय प्रशाळा, वाशीम (१९५४-५५); प्राध्यापक : (अ) यवतमाळ महाविद्यालय, यवतमाळ (१९५५ ते ५७); (आ) पीपल्स कॉलेज, नांदेड (१९५७-१९६५); प्राचार्य, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी (१९६५-८८).
भूषवलेली पदे
अध्यक्ष : अखिल भारतीय कीर्तन कुल, डोंबिवली; पु.भा. भावे स्मृती समिती, मुंबई; महारोगी सेवा समिती, मनोहरधाम, वर्धा; श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था, नागपूर; विश्वसंत साहित्य प्रतिष्ठान, नागपूर.
उपाध्यक्ष : मध्य भारत संशोधन संस्था, नागपूर; दीनदयाल शोध संस्थान, दिल्ली; संतभारती, पुणे; श्री रामकृष्ण संस्कृती पीठ, कामठी.
माजी अध्यक्ष : विदर्भ साहित्य संघ, नागपूर; शिक्षण प्रसारक मंडळ, वणी; वनसमाज निर्माण मंडळ, यवतमाळ; महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, विदर्भ विभाग, नागपूर; महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे; अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, मुंबई; महारोगी सेवा समिती, दत्तपूर, वर्धा.
माजी उपाध्यक्ष : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे; महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे; अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई;
संयोजक : महाराष्ट्र आचार्यकुल, नागपूर;
मिळालेले पुरस्कार : मॅन ऑफ द इयर पुरस्कार, अमेरिका (१९९७); ‘साहित्य धुरंधर’ पुरस्कार, बोस्टन, अमेरिका (१९९७); स्वामी विवेकानंद पुरस्कार, पुणे (१९९८); श्रीमद् जगदगुरू शंकराचार्य पीठ, करवीर, कोल्हापूर (१९९८); स्वामी विवेकानंद पुरस्कार, कल्याण; ‘बंधुता’ पुरस्कार, पुणे (१९९९); दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘कुसुमाग्रज’ पुरस्कार, मुंबई (१९९९); ‘संतमित्र’ ग्रंथश्रेष्ठ पुरस्करा, पुणे (२००१); मानद् वाङ्मयपंडित (डी.लिट.) नगापूर विद्यापीठ (२००१); डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार (२००१) ‘नानासाहेब नारळकर विद्व्त’ पुरस्कार, नगर (२००२); पुणे मराठी ग्रंथालय वर्धापन दिन पुरस्कार (२००२); अखिल भारतीय कीर्तन कुलाचा ‘समाज भूषण’ पुरस्कार, डोंबिवली (२००३); राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान ‘विदर्भ गौरव’ पुरस्कार, नागपूर (२००३); ‘उत्तुंग’चा स्वर्गीय श्रीकृष्ण पंडित पुरस्कार, मुंबई (२००३); ‘विदर्भ भूषण’ पुरस्कार, मुंबई (२००४); ‘ज्ञानेश्वर’ पुरस्कार, पुणे (२००४); महाकवी संत ‘श्री. विष्णुदास’ पुरस्कार, माहूर (२००५); विदर्भ साहित्य संघ- ग.त्र्यं माडखोलकर स्मृती ‘जीवनव्रती’ पुरस्कार (२००६); ‘नागभूषण’ पुरस्कार (२००७); राष्ट्रसेवा पुरस्कार (उरळी कांचन); जीवन गौरव पुरस्कार, पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर;
शेवाळकरांची साहित्य संपदा
कविता संग्रह : असोशी; रेघा; अंगारा
आत्मकथन, व्यक्तिवेध, चरित्रे :
आत्मकथन : माहेरचे दिवस; रांगोळी; ध्यासशिखरे; माझी दृष्टी आणि सृष्टी; स्नेहगोत्री;
व्यक्तिवेध : उजेडाची झाडे; देवाचे दिवे; प्रवास आणि सहवास; प्रसन्नतेचा मूक कटाक्ष; दर्शन विनोबांचे; मोरपीस; वर्तुळ आणि क्षितिज; पाणीयावरी मकरी (आत्मचरित्र)
चरित्रे : महर्षि विनोबा; साम्ययोगी विनोबा;
निरुपणे : अवसेचे चांदणे; अमृताचा घनु : श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित विरहिणींचे सविस्तर निरूपण; गाभारा
ललित : अमृतझरी; पूर्वेची प्रभा; ताराकंचे गाणे; रामसेतू; माणिकाच्या वाती; आकार आणि सुवास; भावबंध.
लेखसंग्रह : सारस्वताचे झाड; रुचिभेद; आकाशाचा कोंब; त्रिदल; द्वादशी; प्रतिध्वनीचे मानस; प्रतीतिधर्म; वाळ्याचा मळा भाग १ व २; विमर्श; हेच पांढऱ्यावरती काळे; ज्ञानपुनव; शिक्षकाचा धर्म; मारोचे पाय; तिसरा डोळा; खुसाचा शोध.
संपादित : मोहर (प्रतिनिधिक काव्यसंग्रह); अमृत; लोकनायक अणे व त्यांचा काळ, भाग पहिला, लेखिका वीणा हरदास; मुरलीधर गंधे : एक अनिकेत. संपादक वा.रा. सोनार, राम शेवाळकर व इतर; निवडक पु.भा. भावे संपादक वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे आमि राम शेवाळकर; देशगौरव शुभाषचंद्र बोस, संपादक वि.स. जोग, राम शेवाळकर आणि शेषराव मोरे; अग्निकमळ (कवि. या.मु. पाठक); ग.त्र्यं. माडखोलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व. संपादक डॉ. वि.स. जोग; चोरघडे स्मृतिग्रंथ. कै. वामन कृष्ण चोरघडे स्मृतिग्रंथ समिती. अध्यक्ष प्रा. राम शेवाळकर; पंजाबराव देशमुख गौरवग्रंथ (संपादक : सुभाष सावरकर, राम शेवाळकर); भावयात्रा (कै. पु.भा यांच्याविषयी विविध लेखकांनी लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह) संपादक- राम शेवाळकर, वा.य. गाडगीळ, शं.वि. जोशी आणि वसंत वऱ्हाडपांडे.
ध्वनिफिती : ध्वनिमुद्रक व प्रकाशक : अलुरकर म्युझक हाऊस, पुणे; लक्ष्मण/महाभारतातील स्त्रीशक्ती; स्वातंत्र्यवीर सावरकर; योगेश्वर कृष्ण; सीता/दुर्योधन; रामायणातील राजकारण / विनोबा भावे; ज्ञानेश्वर / कर्ण; अवसेचे चांदणे (दुसरी आवृत्ती) (अभियान पुणे,); कानडा तो विठ्ठलु सीडी-एचएमव्ही; ज्ञानेश्वर माऊली.
व्हीसीडी : संत ज्ञानेश्वर ध्वनिफिती; ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास, भाग-१ आणि २; ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद; ज्ञानेश्वरांचा नारायणधर्म; पसायदान; समाधी सोहळा; ज्ञानेश्वरांचा भक्तियोग, भाग-१ आणि २.