Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

प्रादेशिक

‘वक्ता दशसहस्त्रेषु’
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मुंबईतील साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रालाही जबरदस्त धक्का बसला आहे. शेवाळकर यांच्या जाण्याने ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हरपला आहेच, पण त्याच बरोबर महाराष्ट्र साहित्य, संस्कृती, संतसाहित्याच्या व्यासंगी अभ्यासकाला मुकला असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य साहित्यप्रेमी, वाचकांबरोबरच राजकारण आणि अन्य क्षेत्रातील लोकांनीही शेवाळकर यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. अरुण साधू (ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार)- शेवाळकर यांचे निधन ही धक्कादायक बातमी आहे. ते उत्कृष्ट वक्ते, भारतीय व मराठी संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध होते. ते मला आपला धाकटा भाऊ मानत असत. अत्यंत मनमोकळा स्वभाव आणि खास वऱ्हाडी शैलीतील आदरातिथ्य ही त्यांची वैशिष्टय़े होती.

लोहमार्ग पोलिसांच्या ड्रॉप बॉक्स योजनेला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद
मुंबई, ३ मे/प्रतिनिधी

प्रवाशांना रेल्वेमध्ये घडणाऱ्या विविध गुन्ह्यांबाबत तक्रार अथवा सूचना करणे सोपे जावे; या उद्देशाने लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील बहुतांश उपनगरी स्थानकांवर बसविलेल्या ‘ड्रॉप बॉक्स’ योजनेला प्रवाशांकडून अतिशय थंड प्रतिसाद लाभला आहे. याउलट त्यांच्या टेलिफोन हेल्पलाईनचा मात्र प्रवाशांकडून मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे.

‘सारेगमप’मध्ये उद्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी
झी मराठीवरील प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘सारेगमप’ कार्यक्रमात मंगळवारच्या भागात गानसम्राज्ञी लता मंगेशकर ‘महाराष्ट्राचा आजचा आवाज’ ऐकण्यासाठी अवतरणार आहेत. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिट्ल चॅम्प्सनंतर आता ‘महाराष्ट्राचा आजचा आवाज’ या सेगमेंटच्या स्पर्धेत आता मधुरा दातार, अमृता नातू, अजित परब, हृषिकेश रानडे, योगिता गोडबोले-पाठक, विभावरी आपटे-जोशी आदी गायक असून गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गायक सुरेश वाडकर असे दर्जेदार परीक्षक आहेत. त्यामुळे ‘सारेगमप’ला अत्युच्च दर्जा प्राप्त झाला आहे. हृदयनाथ मंगेशकर परीक्षक आहेत म्हणूनच गानसम्राज्ञी लता मंगेशकर कार्यक्रम पाहायला आणि आजच्या तरुण आणि गुणी गायकांची गाणी ऐकण्यासाठी येणार आहेत. त्यांच्यासमोर आपलं गाणं सादर करण्याची मोठी संधी ‘सारेगमप’ने स्पर्धकांना उपलब्ध करून दिली असून त्याचा उपयोग स्पर्धक कसे करतात हे अवघ्या महाराष्ट्रातील रसिकप्रेक्षकांना मंगळवारी पाहायला मिळणार आहे.

लालबागला फुटली जलवाहिनी; पाण्यासाठी टँकरमागे रांगा
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी
नायगाव ते राणीबागदरम्यान पाणीपुरवठा करणारी महापालिकेची ४८ इंच व्यासाची जलवाहिनी आज पहाटे फुटली. परिणामी या पट्टय़ातील अनेक इमारतींना पाणीपुरवठा न झाल्याने, नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अबलंबून रहावे लागले. एमएमआरडीएमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर बांधण्यात येणाऱ्या फ्लायओव्हरसाठी सरदार हॉटेल नाक्याजवळ खोदलेल्या खड्डय़ातून जाणारी ही जलवाहिनी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास फुटली. त्यामुळे दत्ताराम लाड मार्गावर डॉ. आंबेडकर रोडपासून ते चिंचपोकळी स्थानकापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी होऊन, स्थानिकांना ढोपराइतक्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. जलवाहिनी फुटल्याने नायगाव-राणीबाग पट्टय़ातील बहुतांश घरांमध्ये आज पाणीपुरवठा झाला नाही.

हेलिकॉप्टर प्रकरण : एअरवर्क्‍सच्या माजी कर्मचाऱ्यांचीही
चौकशी; बोरगेच्या गावीही पोलीस पथक रवाना
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी
उद्योगपती अनिल अंबानींच्या हेलिकॉप्टरमधील इंधन टाकीत चिखल आणि खडे सापडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज ‘एअरवर्क्‍स’च्या काही माजी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तसेच रेल्वे अपघातात मरण पावलेला या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार भरत बोगरे याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठीही पोलिसांचे एक पथक साताऱ्याला रवाना करण्यात आले आहे. अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीत चिखल व खडे टाकण्यामागे एअरवर्क्‍सच्या माजी कर्मचाऱ्यांपैकी कुणाचा हात आहे का, या शक्यतेचा तपास पोलीस घेत आहे. त्यासाठी एअरवर्क्‍सच्या सहा माजी कर्मचाऱ्यांची शनिवारी आणि आठ जणांची रविवारी चौकशी केल्याचे गुन्हे अन्वेशन शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या चौकशीतून काय निष्पन्न झाले, याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. याप्रकरणी पोलिसांनी आजवर ६० जणांचा जबाब नोंदविला आहे.

मुंबईतील दोन बूथवर आज फेरमतदान
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील कालिना येथील १८३ आणि १८५ क्रमांकाच्या बूथवर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून त्यानुसार सोमवारी तेथे मतदान घेण्यात येणार आहे. या बूथवरील मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी दिला होता. या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त, भाजप-शिवसेना युतीचे अ‍ॅड. महेश जेठमलानी आणि मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांच्यात प्रमुख लढत होत आहे.