Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

हास्याचा सातमजली गडगडाट!
नगर, ३ मे/प्रतिनिधी

हास्याचा सातमजली मनमुराद गडगडाट करत शहरातील विविध हास्य क्लबच्या सदस्यांनी आज जागतिक हास्यदिन साजरा केला. प्रसिद्ध विनोदी कथालेखक ‘हास्यसम्राट’ फेम संजय कळमकर यांनी या हास्यदिनाला आपल्या विनोदी किश्श्यांची रेशमी किनार दिली.
सुप्रभात, खंदक, प्रभा, जय आनंद, माणिकनगर, विजय असे अनेक हास्य क्लब शहरात कार्यरत आहेत. त्यांनी एकत्र येऊन जागतिक हास्यदिनानिमित्त शिल्पा गार्डन येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जीवनात हास्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून, ताणतणाव दूर करण्यासाठी आता हास्योपचार उपयोगात आणला जाऊ लागला आहे.

दोन साक्षात्कारी अनुभव
दिवस नक्की लक्षात नाही, परंतु तो १९५६ सालचा नोव्हेंबर महिना होता. मी कोर्टात एका खुनाच्या खटल्यात शेवटचा युक्तिवाद करीत होतो. त्याकाळी केस जिल्हा न्यायालयात वर्ग होण्यापूर्वी खटल्यात तितका पुरावा आहे किंवा नाही याची शहानिशा खालच्या कोर्टात होत असे. असाच तो खटला होता. खालच्या कोर्टातच आरोपीच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वाटली, म्हणून सरकारी साक्षीदारांची उलटतपासणी मी घेतली. माझे बोलणे चालू असतानाच घरून निरोप आला की माझी नऊ-दहा महिन्यांची मुलगी घटसर्पाच्या विकाराने निवर्तली.

जुनाट पाणीयोजना हेच नगरचे दुखणे
नगर, ३ मे/प्रतिनिधी

शहराच्या पाणीपुरवठय़ाची शब्दश वाट लागली आहे. मात्र, त्याला मनपाचा अकार्यक्षमपणा कमी व पाणीपुरवठा योजनेचा जुनाटपणा अधिक कारणीभूत आहे. या संपूर्ण योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक असताना त्यासाठी पाठपुरावा करायचे सोडून या प्रश्नाचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरू आहे. शहराची लोकसंख्या साडेचार लाख आहे. रोज ५६ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. वीजपुरवठय़ात मुळा धरण, विळदघाट किंवा अन्य ठिकाणी व्यत्यय आला नाही, तर वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत रोज इतके पाणी जमा होत असते. तशा नोंदी आहेत.

डॉ. कवडे हल्लाप्रकरणी कोणतेही धागेदोरे नाहीत
भेर्डापूरला आज ‘बंद’

श्रीरामपूर, ३ मे/प्रतिनिधी

भेर्डापूर येथील डॉ. प्रमोद बाळासाहेब कवडे यांच्यावर शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या (सोमवारी)गावात ‘बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणी अद्याप क ोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत.
अशोकनगर येथील आपला दवाखाना बंद क रून काल रात्री डॉ. कवडे आपल्या आल्टो मोटारीतून भेर्डापूरला घरी निघाले होते. कारेगाव-भेर्डापूर रस्त्यावर भिंगारे वस्तीजवळ पल्सर मोटरसायकलवरील तोंड बांधलेल्या तरूणांपैकी मागे बसलेल्या तरुणाने कवडे यांच्यावर गोळी झाडली.

विद्यार्थ्यांच्या उपोषणाची दुसऱ्या दिवशीही दखल नाही
तिघांची प्रकृती खालावली

संगमनेर, ३ मे/वार्ताहर

येथील सिद्धकला महाविद्यालयाने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ उपोषण सुरू केलेल्या वीस विद्यार्थ्यांपैकी तिघांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असून महाविद्यालय प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील सिद्धकला इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या शिक्षण संस्थेत प्रथम वर्षांसाठी प्रत्येकी ४५ हजार रुपये शुल्क भरून तालुक्यातील २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र, वार्षिक परीक्षा जवळ आलेली असताना प्रथम सत्रातीलच अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही.

मोटरसायकल खड्डय़ात घसरल्याने तरुण ठार
राहाता, ३ मे/वार्ताहर

तालुक्यातील पिंपळस शिवारात नगर-मनमाड रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी खोदलेल्या खड्डय़ात मोटरसायकल घसरून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. बाळासाहेब सोपान वाणी (वय २६, साकुरी) असे मृताचे नाव आहे. मयत बाळासाहेब व सुधाकर वाणी हे दोघे भाऊ मोटरसायकलने (एमएच १६ व्ही ४३१५) नगर-मनमाड रस्त्याने शहराकडे येत होते. पिंपळस शिवारात हॉटेल गीतगंगासमोर मोटरसायकल रस्त्याचे काम चालू असलेल्या खड्डय़ात घसरून पडली.
मयत बाळासाहेब याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. वाणी बंधू तरकसवाडी येथे रात्री शेतीला पाणी भरून सकाळी साकुरीत येत असताना हा अपघात घडला. सुधाकर वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नगर-मनमाड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालू असून, अनेक ठिकाणी रस्त्याची व पुलांची कामे अर्धवट आहेत. वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असल्याने दररोज अनेक छोटे-मोठे अपघात घडतात. काम चालू असल्याच्या ठिकाणी कोणतेही फलक नसल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास होतो.

तलावात बुडून युवकाचा मृत्यू
राहाता, ३ मे/वार्ताहर

दहेगाव येथील राहाता नगरपालिकेच्या जुन्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा युवकांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना आज दुपारी घडली. दीपक पुंडलिक गायकवाड (वय १९, रा. भीमनगर, ता. राहाता) असे मृताचे नाव आहे. दीपक राहाता येथील विखे पाटील महाविद्यालयात शिकत होता. नुकतीच त्याने बारावीची परीक्षा दिली. तो व त्याचा मित्र अनंत दादू वाघमारे एका लग्न समारंभासाठी पिंपळसला गेले होते. जेवण करून नंतर ते जवळ असलेल्या दहेगावला गेले. उन्हाची काहिली शमविण्यासाठी नगरपालिकेच्या जुन्या साठवण तलावात पोहण्यासाठी ते गेले. अनंताने प्रथम पाण्यामध्ये उडी घेतली. त्यापाठोपाठ दीपकने उडी मारली. मात्र, तो बुडू लागला. अनंताने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण तोही बुडू लागला. तलावावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी साडीच्या पदराने अनंताला वाचविले. मात्र, दीपक बुडाला. त्याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता. राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी. सी. गावित, तसेच तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षकांनी घटनास्थळाला भेट दिली.

बेकायदा वाळू वाहतुकीविरुद्ध धडक मोहीम
पाथर्डी, ३ मे/वार्ताहर

बेकायदा वाळू वाहतूकदारांविरुद्ध धडक मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून काल व आज ११ वाहनांविरुद्ध मिरी परिसरात जप्तीची कारवाई केली. तहसीलदारांनी प्रत्येकी १२ हजार २०० रुपये दंडात्मक कारवाई केली. श्रीगोंदे येथील नायब तहसीलदाराला वाळू तस्कराने मारहाण केल्यानंतर बेकायदा वाळूवाहतूकदारांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात येत आहेत. त्यानुसार पैठण तालुक्यातून सर्वाधिक अवैध वाळू वाहतूक नगर, पुण्याकडे चालते. सध्याही २४ तासांत सुमारे पाचशे मालमोटारी वाहतूक होते. रात्री अशी वाहतूक वेगात असून, करंजी व मिरी येथून गाडय़ा पुढे जातात. पोलीस व महसूल अधिकाऱ्यांचे पथक आता संयुक्तपणे कारवाई करणार असून, रात्रीची गस्त तालुक्यात घालीत असताना श्री. कुमार यांनी मिरी येथे अचानक जाऊन धडक कारवाई केली. आज दिवसभर करंजी व मिरी येथून तुरळक प्रमाणात वाळू वाहतूक झाली.

मोठय़ा तिथीमुळे राहुरीत लग्नसराईची धामधूम!
राहुरी, ३ मे/वार्ताहर

तालुक्यात अनेक ठिकाणी आज लग्नसराईची धामधूम होती. शहरातही बहुतेक मंगल कार्यालयांमध्ये वऱ्हाडी मंडळींची वर्दळ आणि वाद्यवृंदाचा निनाद सुरू होता. उन्हाची तीव्रता कायम असली तरी लग्नसराईतला उत्साह कमी झाला नसल्याचे पाहावयास मिळाले. प्रामुख्याने नगर-मनमाड रस्त्यावर वरातींमुळे वाहतुकीवर ठिकठिकाणी ताण पडला.
दि. ३ मे ही मोठी लग्नतिथी असल्याने भटजी मंडळींचीही धावपळ उडाली. तालुक्यात बहुतेक ठिकाणी, वाडय़ा-वस्त्यांवर विवाह समारंभांची लगबग होती. एस. टी. बस, तसेच खासगी वाहतुकीच्या वाहनांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. एकाच दिवशी आणि वेळी विवाहांचे निमंत्रण असल्याने पाहुणे मंडळींचीही त्रेधा उडाली. डॉल्बी डिजीटल साऊंड सिस्टिम, वाद्यवृंद पथक, डोलीबाजा यांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला. बाजारपेठेतही खरेदीचा उत्साह होता. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली होती. वाढत्या उष्म्यातही लग्नसराईचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र होते.

केडगाव ब्राह्मण सेवा संघातर्फे २५ व्रतबंध
नगर, ३ मे/प्रतिनिधी

केडगाव ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने याही वर्षी बुधवारी (दि. २९) सामुदायिक व्रतबंधनाचा कार्यक्रम श्रीछत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात धार्मिक वातावरणात झाला. बटूंना आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईक, तसेच केडगाव परिसरातील नागरिक या वेळी उपस्थित होते. केडगाव ब्राह्मण सेवा संघातर्फे गेल्या १२ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. या वर्षी २५ बटूंची जिल्ह्य़ाच्या विविध भागांतून नावनोंदणी झाली होती. या बटूंवर पंढरपूरकर गुरुजी यांनी संस्कार केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण जोशी, कार्याध्यक्ष दिलीप इनामदार, उपाध्यक्ष अरविंद धुमाळ, अशोक जोशी, सचिव नंदकुमार पोळ, अजित कुलकर्णी, खजिनदार किरण खुर्जेकर, अरविंद कुलकर्णी, एम. डी. देशपांडे, सुनील रसाळ आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.

बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी साळवे
नगर, ३ मे/प्रतिनिधी

बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश साळवे यांची निवड करण्यात आली.नाबार्डचे अंबादास आरोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यकारिणी निवडण्यात आली.अन्य कार्यकारिणी अशी - सरचिटणीस सुनील सोयगावकर, जिल्हा उपाध्यक्ष रतन तुपविहिरे, उत्तर - बाळासाहेब गाडे, अशोक काळापहाड, खजिनदार रमेश चाबुकस्वार, महिला आघाडीप्रमुख रजनीताई ताठे, जिल्हा संघटक बी. एल. लसगरे, रूपीचंद पंडागळे.