Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

हास्याचा सातमजली गडगडाट!
नगर, ३ मे/प्रतिनिधी

हास्याचा सातमजली मनमुराद गडगडाट करत शहरातील विविध हास्य क्लबच्या सदस्यांनी आज जागतिक हास्यदिन साजरा केला. प्रसिद्ध विनोदी कथालेखक ‘हास्यसम्राट’ फेम संजय कळमकर यांनी या हास्यदिनाला आपल्या विनोदी किश्श्यांची रेशमी किनार दिली.
सुप्रभात, खंदक, प्रभा, जय आनंद, माणिकनगर, विजय असे अनेक हास्य क्लब शहरात कार्यरत आहेत. त्यांनी एकत्र येऊन जागतिक हास्यदिनानिमित्त शिल्पा गार्डन येथे या

 

कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जीवनात हास्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून, ताणतणाव दूर करण्यासाठी आता हास्योपचार उपयोगात आणला जाऊ लागला आहे. दुखमय वातावरण सुखकारक करण्यासाठी हास्यकलेइतका प्रभावी उपाय नाही, असे कळमकर यांनी सांगितले. अशा कार्यक्रमांना आपल्यासारख्या लेखकांना बोलावण्यापेक्षा पुढाऱ्यांना बोलवा. त्यांच्या कधीही पूर्ण न होणाऱ्या आश्वासनांतून, न केलेल्या कामांमधून प्रभावी हास्यनिर्मिती होईल, अशी विनोदी सूचनाही त्यांनी केली. खेडय़ातील कष्टकरी जनतेलाही हास्याची आवश्यकता आहे. तेथे हास्यक्लब निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे कळमकर म्हणाले.
सर्वश्री. शरद मुथा, अर्जुनसिंह चंदेल, इंद्रभान भंडारी, प्रभाकर देवळालीकर, दिनेश मेहता, अमृतलाल छल्लाणी, कनकमल मुनोत, विजय गुंदेचा, बकरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
इंद्रभान भंडारी यांनी हास्य क्लब स्थापनेसाठीच्या सुरुवातीच्या प्रयत्नांची माहिती दिली. सन १९९५मध्ये फक्त काहीजणांना घेऊन सुरू झालेल्या हास्य क्लब ३मध्ये आता ५५० सभासद असल्याची माहिती त्यांनी दिली. कळमकर यांचा मीना मुनोत, सुवालाल शिंगवी, संपतलाल बोरा यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. धार्मिक परीक्षा मंडळातील हास्य व आरोग्यविषयक ग्रंथदालनाचे उद्घाटन कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले.