Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

दोन साक्षात्कारी अनुभव
दिवस नक्की लक्षात नाही, परंतु तो १९५६ सालचा नोव्हेंबर महिना होता. मी कोर्टात एका खुनाच्या खटल्यात शेवटचा युक्तिवाद करीत होतो. त्याकाळी केस जिल्हा न्यायालयात वर्ग होण्यापूर्वी खटल्यात तितका पुरावा आहे किंवा नाही याची शहानिशा खालच्या कोर्टात होत असे. असाच तो खटला होता. खालच्या कोर्टातच आरोपीच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वाटली, म्हणून सरकारी साक्षीदारांची उलटतपासणी मी घेतली. माझे बोलणे चालू असतानाच घरून निरोप आला की माझी नऊ-दहा महिन्यांची मुलगी घटसर्पाच्या विकाराने

 

निवर्तली.
निरोप मेहेरबान कोर्टानेही ऐकला. त्याच्याच सांगण्यावरून त्या दिवसाचे कामकाज स्थगित करावयाचे ठरले. आरोपी हे ऐकत होता. त्याला वाटले त्यावेळच्या सामाजिक पद्धतीनुसार मी दहा दिवसांतही कोर्टात येणार नाही आणि मेहेरबान न्यायाधीश साहेबही तितके दिवस खटल्याचे काम स्थगित ठेवणार नाहीत. मी काम चालू ठेवले तर तो सुटेल, अशी त्याला खात्री होती. त्यामुळे तो एकदम मला उद्देशून म्हणाला, ‘तुमची मुलगी मरू नाही, पण मेली. पण आता मी फासावर गेलो तर काय?’
माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी न्यायाधीशांना कामकाज चालू ठेवण्याची विनंती केली. त्यांनीही ती मान्य केली. तास-दीड तासात माझे म्हणणे संपले. सरकारी वकिलांनी जो खुलासा करायचा होता तो केला. कोर्टाने निकाल दिला. आरोपी निर्दोष सुटला. हिवाळ्याचे दिवस होते. निकाल झाला, तेव्हा सायंकाळचे सात-साडेसात वाजले होते.
मुलीचा अंत्यविधी करून घरी आलो. घरात सहानुभूतीदारांची गर्दी होती. त्यात त्यावेळचे आमदार (कै.) गोपाळराव भांगरे व माझ्याकडे एक नव्यानेच वकिली सुरू केलेले किंवा करण्याच्या मार्गावर असलेले डी. वाय. शेलार होते. ते पुढे जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. माझ्या घराला माडी आहे. माडीत काही मित्रमंडळी, आप्तेष्ट बसले होते, म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी शेलार आणि भांगरेंनी मला सांगितले की कुणी साधू आत येण्याची परवानगी मागतोय, पण या म्हणून सांगितले तरी येत नाही. त्याचे म्हणणे आहे की, मालकाची परवानगी पाहिजे व ती त्यांनी खाली येऊन दिली पाहिजे. मी खाली गेलो. हातात कमंडलू, काखेत मृगाजीन, सहा फूट उंचीची करारी मुद्रेची ६५-७० वयाची, गोऱ्या वर्णाची व्यक्ती. चर्येवर तेज. मी आत या म्हणालो. ते म्हणाले की, तुमच्या घरात आज नको ते घडले आहे. अशाही परिस्थितीत दुख बाजूला ठेवून जमलेल्यांना वाटे लावून तुमच्या पत्नीने खीर-पुरीचे जेवण स्वहस्ते करून मला वाढत असाल, तर मी आत येतो.
काय उत्तर द्यावे हे मला समजेना. मी त्यांना थांबण्यास सांगून घरात पत्नीच्या कानावर ही गोष्ट घालण्यासाठी म्हणून आत गेलो. पत्नी म्हणाली, ‘तो साधू आपली परीक्षा पाहत आहे. तुम्ही त्यांना हो सांगा.’ तिने जमलेल्यांना निरोप द्यायला सुरुवात केली.
साधू आत आले. ते बसेतो आमदार भांगरे आणि शेलार सोडून बाकीची मंडळी निघून गेली. जेवणाची तयारी होईपर्यंत साधू माझ्याशी बोलत होते. त्यांना मराठी येत नव्हते. हिंदीही त्यांना तितकी अवगत होती असे दिसले नाही. ते इंग्रजीत बोलत होते.
मला म्हणाले, ‘तुम्ही योगाच्या नावाखाली हटयोगाचे अनुकरण करीत आहात. माझा हटयोगाला विरोध नाही, पण गुरुशिवाय तो अनुसरता कामा नये. तुम्ही गुरूकडून ही विद्या शिकला नाहीत. स्वत अभ्यासातून ती आत्मसात केली आहे. ही तुमची चूक आहे. तिचा विपरित परिणाम होऊ शकतो.’ त्यांनी मला प्राणायामाचा अभ्यास तेवढय़ा वेळात जो शिकवता येईल तो शिकवायचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जेवण झाले. मध्यरात्री दीड-दोनचा सुमार असेल. ते म्हणाले, ‘जिथे कुणी नसेल अशी जागा मला दाखवा. मला झोपायचंय.’ संगमनेरच्या दक्षिणेस केशवतीर्थ नावाचे ठिकाण आहे. ती जागा दाखवावी, म्हणून आमदार भांगरे यांच्यासह त्यांना घेऊन म्हाळुंगी नदीच्या पात्रातून चालत होतो. तेव्हा नदीला पाणी होते. निम्म्या नदीपात्रात आम्ही आलो असता साधूने मला विचारले की यांना म्हणजे भांगरेंना इंग्रजी येते काय? मी नाही म्हणून सांगितले. त्यावर तत्काळ साधू इंग्रजीतून म्हणाले, ‘हे फक्त सहा महिन्यांचे सोबती आहेत. पण ही गोष्ट त्यांना सांगू नका.’ मी सांगितली नाही.
१९५७च्या निवडणुकीत भांगरेंना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली. मी पक्षाचा प्रचारक होतो. तेव्हा संगमनेर-अकोले द्विदल मतदारसंघ होता. एके दिवशी भांगरेंच्या प्रचारासाठी अकोले तालुक्यातील समशेरपूरला माझी जाहीर सभा होती. सभेस भांगरे आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. सभा सुरू झाली. भांगरेंनी भाषणास सुरुवात केली, तोच त्यांचे हात-पाय लटपटायला लागले. मी त्यांचा हात धरून खाली बसवण्याच्या प्रयत्नात असतानाच ते कोलमडले आणि सभेतच गतप्राण झाले. साधूचे भाकित खरे ठरले.
अशाच प्रकारचा, परंतु थोडासा वेगळा अनुभव १९८९च्या चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीच्या आदल्या रात्री आला. मी आणि माझे मित्र (कै.) रामेश्वर सोमाणी घराच्या तळमजल्यातील पुढील भागात बोलत बसलो होतो. रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले होते. पत्नी आजारी असल्याने पुण्याला रूबी हॉस्पिटलमध्ये होती. घरी मी एकटाच होतो. बाहेर गल्लीत लहान-थोर हनुमान जयंतीची आरास करण्यात गर्क होते. एवढय़ात एका वयस्कर स्त्रीने दरवाजा हळूच ढकलला व खाण्यास काही मिळेल काय म्हणून चौकशी केली. सोमाणी तिच्यावर रागावले. ही भिक्षा मागण्याची वेळ आहे काय? असे ओरडले. ती स्त्री काहीही न बोलता पुन्हा दरवाजा बंद करून जाण्याच्या तयारीत असताना मला राहवले नाही. मी तिला थांबवले व मित्रास घरात खाण्याचं काही मिळते हे बघून काही असल्यास घेऊन या व त्या स्त्रीला द्या, असे सांगितले. मित्राला एक पोळी मिळाली. ती त्याने त्या स्त्रीला दिली. वृद्ध स्त्रीने थोडे कालवण असलं तर देता का म्हणून विनवले. मित्र पुन्हा रागावले. मी पुन्हा मध्यस्थी केली व असल्यास द्या म्हणून सांगितले. मित्राला घरात भाजी मिळाली. त्यांनी ती दिली. यावर त्या स्त्रीने भात असल्यास द्याल का म्हणून विनंती केली. मित्र आता संतापाने लाल झाले. तिला घालवून देण्याच्या तयारीत असताना मी पुन्हा तिला थांबवले. घरात जाऊन जे असेल ते भातासह इतर पदार्थ म्हातारीच्या पदरात टाकले. म्हातारीने आशीर्वाद दिला. दरवाजा न वाजेल अशा पद्धतीने बंद केला. म्हातारी घरासमोर बसून अन्न खात असेल असे वाटले म्हणून मी दरवाजा उघडला, पण ती रस्त्याने शांतपणे चाललेली दिसली. इतर उघडय़ा असलेल्या घरासमोर ती उभी राहिली नाही की कोणाजवळ काही मागितले नाही. ना आम्ही दिलेले अन्न खाल्ले. मनात प्रश्न उभा राहिला. अशी कशी भिकारी. इतकी समजदार, इतकी सूज्ञ, इतकी अनासक्त, इतकी शांत की मित्र रागावला तरी खेद, खंत न मानणारी.
हे असे चक्रावून सोडणारे अनुभव मला आयुष्यात आले आहेत. खरं तर कुमारवयापासून चमत्कार, कर्मकांड वा अंधश्रद्धा अशा बाबींवर माझा अजिबात विश्वास नव्हता व आताही नाही. खरं तर मी देवाला साधा नमस्कारही करत नाही. तरी असे अनुभव का येतात, हे एक कोडे आहे.कधी त्या साधूची आठवण झाली म्हणजे त्याचे शब्द आठवतात. जे योग्य मार्गाने साधना करतात त्यांना असे अनुभव येतात.
कोणत्याही परिस्थितीत त्यांचे मन शांत, स्थिर राहते व ते समजूतदारपणे अशा प्रसंगात हसतमुखाने वावरतात, अशा विरक्त स्त्री-पुरुषांचे वर्णन अनेक आध्यात्मिक ग्रंथात वाचावयास मिळते. काहींना अशांचे दर्शनही घडते. अशा व्यक्ती आज भारतात, जगात अन्यत्रही असू शकतात. अशांचे दर्शन घडले, तर साधकाच्या मनावर त्यांच्या वैराग्याबद्दल आश्चर्ययुक्त आदराचा ठसा उमटतो. साधकाच्या चित्तातही जर वैराग्याच्या संस्काराचा थोडा जरी अंश असला, तरी त्याला या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या दर्शनाने निश्चितच समाधान मिळते.