Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

जुनाट पाणीयोजना हेच नगरचे दुखणे
नगर, ३ मे/प्रतिनिधी

शहराच्या पाणीपुरवठय़ाची शब्दश वाट लागली आहे. मात्र, त्याला मनपाचा अकार्यक्षमपणा कमी व पाणीपुरवठा योजनेचा जुनाटपणा अधिक कारणीभूत आहे. या संपूर्ण योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक असताना त्यासाठी पाठपुरावा करायचे सोडून या प्रश्नाचे

 

राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरू आहे.
शहराची लोकसंख्या साडेचार लाख आहे. रोज ५६ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. वीजपुरवठय़ात मुळा धरण, विळदघाट किंवा अन्य ठिकाणी व्यत्यय आला नाही, तर वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत रोज इतके पाणी जमा होत असते. तशा नोंदी आहेत.
शहरातील १३ टाक्यांमधून नळांद्वारे हे पाणी घरांमध्ये पोहोचवले जाते. कोणती टाकी कधी भरेल, त्यावरच्या वाहिन्यांचे व्हॉल्व्ह कधी सोडायचे, ते किती वेळाने बंद करायचे याचे वेळापत्रक आहे. एक टाकी झाली की दुसरी, मग तिसरी व हे सुरू असतानाच मुख्य टाकीत म्हणजे वसंत टेकडी येथे मुळा धरणातून पाणी जमा होणे सुरूच अशी ही योजना आहे. मुळा धरणावरील उपसा केंद्रातून सलग २४ तास उपसा सुरू राहिला, तरच पुढचे सर्व चक्र सुरळीत चालते. अगदी एका तासाचाही व्यत्यय पुढचे सगळे चक्र बिघडवून टाकतो.
ऐन उन्हाळ्यातही नगरच्या पाणीपुरवठय़ात थोडीही कपात करण्यात आलेली नाही. मुळा धरणातून वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत रोज जेवढे पाणी यायचे तितकेच आजही येत आहे, तरी शहरात पाण्याची ओरड सुरू आहे. याचे कारण शहरांतर्गत पाणी वितरण व्यवस्था पूर्णपणे ढासळली हे आहेच. शिवाय वीजपुरवठय़ातील सततच्या अनियमितपणामुळे मनपालाही पाण्याचा साठा जसा असेल त्याप्रमाणे पाणी सोडण्याचे वेळापत्रक सारखे बदलणे भाग पडत आहे.
उन्हाळ्यात प्रत्येक कुटुंबाची पाण्याची गरज नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेही पाणी कमी मिळते अशी मानसिकता तयार झाली आहे. गेल्या काही वर्षांत शहरात, विशेषत मध्य भागात अपार्टमेंटस्ची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली. अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटस् मिळून पिण्याच्या पाण्याचे बऱ्याचदा दोन किंवा तीनच नळजोड असतात. वापरायच्या पाण्यासाठी अपार्टमेंटस्मध्ये बोअरची सोय असते किंवा जुना आड असतो. त्यावर वीजपंप बसवून वापरायच्या पाण्याची सोय केली जाते.
अनेक फ्लॅटस् असलेल्या किंवा १००पेक्षा अधिक व्यक्ती असलेल्या एखाद्या अपार्टमेंटची पिण्याच्या पाण्याची गरज दोन किंवा तीन नळजोड कशी भागवू शकतील?
शहरांतर्गत जलवाहिन्यांत अनेक दोष निर्माण झाले आहेत. सध्या पाणीपुरवठा योजना सन १९७२मधील आहे. त्यानंतर आजतागायत या जलवाहिन्यांत काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. परिसर वाढत गेला, त्याप्रमाणे नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. मूळच्या जलवाहिन्यांवरचे नळजोड वाढत गेले. त्यांचा आकार मात्र आहे तसाच राहिला. मुकुंदनगर, तसेच मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या अन्य ग्रामपंचायतींमधील नळजोड व जलवाहिन्यांना तर कसली रचनाच नाही. गरजेप्रमाणे त्या टाकण्यात आल्या आहेत. वितरण व्यवस्था कोलमडण्यास प्रामुख्याने योजनेचा जुनाटपणा हे कारण आहे.
या संपूर्ण पाणीयोजनेसाठी नवीन साठवण टाक्या, तसेच मुख्य जलवाहिन्यांबरोबरच त्यावर जोडलेल्या अन्य जलवाहिन्यांचेही आकार, रचना बदलण्याची गरज आहे. त्यासाठी ११७ कोटींची शहर पाणीपुरवठा सुधार योजना मनपातील मागील सत्ताधाऱ्यांनी केंद्र सरकारकडे दिली आहे. मात्र, तिच्या पाठपुराव्यासाठी राजकीय, तसेच प्रशासकीय प्रयत्न करायचे सोडून पाणीप्रश्नावर आपली पोळी भाजून घेण्याचाच सर्वाचा प्रयत्न सुरू आहे.
’पाण्याचा अपव्यय नको!’
सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम यांचे मत आहे. शहर पाणीपुरवठा सुधार योजना तयार करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. सार्वजनिक नळ कोंडाळी, तसेच बेजबाबदारपणे वाया जाणारे पाणी थांबवले तरी रोज काही लाख लिटर पाण्याची बचत होईल, असे ते म्हणाले.