Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. कवडे हल्लाप्रकरणी कोणतेही धागेदोरे नाहीत
भेर्डापूरला आज ‘बंद’
श्रीरामपूर, ३ मे/प्रतिनिधी

भेर्डापूर येथील डॉ. प्रमोद बाळासाहेब कवडे यांच्यावर शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या (सोमवारी)गावात ‘बंद’चे आवाहन करण्यात आले

 

आहे. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणी अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत.
अशोकनगर येथील आपला दवाखाना बंद क रून काल रात्री डॉ. कवडे आपल्या आल्टो मोटारीतून भेर्डापूरला घरी निघाले होते. कारेगाव-भेर्डापूर रस्त्यावर भिंगारे वस्तीजवळ पल्सर मोटरसायकलवरील तोंड बांधलेल्या तरूणांपैकी मागे बसलेल्या तरुणाने कवडे यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी कवडे यांच्या गालातून आरपार गेली. कवडे यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहायक विजय याकूब कसबे यांनी आरडाओरडा केल्याने आसपासचे लोक जमले. कारेगाव येथील यात्रेमुळे तैनात असलेले पोलीसही या वेळी दाखल झाले. येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर डॉ. कवडे यांना पुणे येथील मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे पुणे येथे गेलेल्या पोलिसांच्या पथकाला त्यांचा जबाब घेता आला नाही. डॉ. कवडे यांचे कोणाशी वैमनस्य नसल्याचे बोलले जात असल्याने हल्ल्यामागचे कारण समजू शकत नाही. त्यामुळे तपासाला चालना मिळत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी कवडे यांच्या कुटुंबीयांचीही आज भेट घेतली. डॉ. कवडे यांचे सहायक विजय कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या भेर्डापूरला सभा घेण्यात येणार आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गावात ‘बंद’चे आवाहनही केले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर गुन्ह्य़ाचा तपास लावावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.