Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

विद्यार्थ्यांच्या उपोषणाची दुसऱ्या दिवशीही दखल नाही
तिघांची प्रकृती खालावली
संगमनेर, ३ मे/वार्ताहर

येथील सिद्धकला महाविद्यालयाने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ उपोषण सुरू केलेल्या वीस विद्यार्थ्यांपैकी तिघांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असून महाविद्यालय प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये

 

तीव्र संताप व्यक्त होत आहे.
येथील सिद्धकला इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या शिक्षण संस्थेत प्रथम वर्षांसाठी प्रत्येकी ४५ हजार रुपये शुल्क भरून तालुक्यातील २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र, वार्षिक परीक्षा जवळ आलेली असताना प्रथम सत्रातीलच अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी महाविद्यालयाने शिक्षकच उपलब्ध करून दिले नाहीत, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. वार्षिक परीक्षा देणे विद्यार्थ्यांना अशक्य ठरले आहे. वर्षभरात झालेल्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई, भरलेले शुल्क व प्रवेश घेतेवेळी जमा केलेली कागदपत्रे परत मिळावीत, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कालपासून महाविद्यालयासमोर उपोषण सुरू केले. दरम्यान, उष्णता जास्त असल्याने आज दुपारनंतर संदीप वर्पे, किरण गायकवाड व गणेश झावरे या तिघा विद्यार्थ्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन त्यांची प्रकृती खालावली.
विद्यार्थ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वैद्यकीय अ धिकाऱ्यांना बोलविले. तपासणी केली असता विद्यार्थ्यांना चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थता वाटू लागल्याचे निष्पन्न झाले. या तिघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.दरम्यान, पोलीस निरीक्षक वसंत तांबे वगळता प्रशासनाच्या, तसेच महाविद्यालयाच्या प्रशासनापैकी कोणीही उपोषणकर्त्यांकडे फिरकले नाही. विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असून, दोन दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.