Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मालमोटारचालकाला लुबाडणाऱ्यांना अटक
नगर, ३ मे/प्रतिनिधी

मालमोटार अडवून चालकाला लुटणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना नगर-मनमाड रस्त्यावर देहरे शिवारात घडली.
जावेद यादव अली (वय २४) व जाफर जोहर अली (वय ३२, दोघे रा. भगवाननगर, ता.

 

गेवराई, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबरचा अन्य एकजण पळून गेला. या प्रकरणी मोटारचालक नसीरखान सादिक महंमद (वय २०, रा. शिक्रापूर, ता. तावडी, जि. गुडगाव, हरियाणा) याने फिर्याद दिली आहे.
नसीर खान मालमोटारीतून (एचआर ५५ जी ६६४९) कर्नाटकातून माल घेऊन दिल्लीला निघाला होता. तो नगर-मनमाड रस्त्याने जात असताना देहरे शिवारात त्याला वरील आरोपींनी अडविले व ‘पुढे आरटीओ आहे. तुझ्या मालमोटारीत लोड आहे. आम्हास बाराशे रुपये दे’, असे ते म्हणाले. मोटारचालकाने त्यास नकार देताच आरोपींनी मोटरसायकल मालमोटारीस आडवी घातली व चालकास शिवीगाळ, दमदाटी करून त्याच्याजवळील १५ हजार रुपये हिसकावून घेतले. मात्र, चालक व त्याच्या साथीदाराने आरडाओरड केल्याने लोक जमा झाले. त्यांनी जावेद यादव व जाफर जोहर या दोघांना पकडले. तिसरा आरोपी पसार झाला. एमआयडीसी पोलिसांनी वरील दोघांना अटक केली. तपास उपनिरीक्षक मोहकर करत आहेत.