Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

माहिती अधिकाराची अंमलबजावणी होत नसल्याची तरुणाची तक्रार
राजूर, ३ मे/वार्ताहर

येथील आदिवासी विकास कार्यालय व राजूर पोलीस ठाण्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला. त्याची मुदत संपूनही अद्यापि माहिती दिली नाही. त्यामुळे दि. १९ मेपासून

 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देवराम दगडू देठे यांनी दिला आहे.
आदिवासी विकास कार्यालयातून ठराविक लोकांनाच शासकीय मदत मिळते. प्रकल्पाधिकारी पावडे यांनी २६ मार्च रोजी दुधाळ जनावरांच्या लाभार्थ्यांची यादी दिली नाही. या विभागाची जबाबदारी असणारे शिंदे नावाचे अधिकारी लोकांशी उद्धटपणे वागतात, असा आरोप त्यांनी पत्रकात केला आहे.
येथील सहायक प्रकल्प अधिकारी थोरात यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. त्यांच्या बदलीची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी आदिवासी विकासमंत्र्यांकडे केली आहे. देठे यांनी महार वतन जमिनीबाबत राज्य माहिती आयोगाकडे (मुंबई) दुसरे अपील करूनही माहिती देण्यात आली नाही, तर राजूर पोलीस स्टेशनकडे शेतातील पेंढे व धान्य जळाल्याने केलेल्या पंचनाम्याच्या प्रतीसाठी १३ फेब्रुवारीला अर्ज प्राप्त होऊनही माहिती दिली नाही. त्यामुळे उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजूर विभागातील काही सामाजिक कार्यकर्ते माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. ग्रामसेवक संघटनेने याबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटून निवेदन दिले आहे.