Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

रयत’च्या विद्यार्थ्यांना जूनपासून विशेष संगणक शिक्षण
श्रीरामपूर, ३ मे/प्रतिनिधी

ज्ञान महामंडळाच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना येत्या जूनपासून विशेष संगणक शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष

 

रावसाहेब शिंदे यांनी दिली.
भारती विद्यापीठाने शिंदे यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला. त्यानिमित्त पत्रकारांच्या वतीने शिंदे यांचा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष रमण मुथा व ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ वार्ताहर अशोक तुपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिंदे म्हणाले की, ग्रामीण विद्यार्थी इंग्रजी व संगणक शिक्षणात मागे पडत आहेत. आज इंग्रजी जगाची ज्ञानभाषा बनली आहे. दोन्ही विषयांत विद्यार्थी मागे पडू नये, म्हणून संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला.
ज्ञान महामंडळाचे विवेक सावंत व माजी कुलगुरू डॉ. राम ताकवाले यांनी संस्थेला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. आता संगणक शिक्षण देण्यासाठी ज्ञान महामंडळाने शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.
रयत शिक्षण संस्थेचा कार्यालयीन कारभारही संगणकाच्या ऑनलाईन पद्धतीने सुरू केला जाईल. संस्थेची विद्यालये ग्रामीण भागात अधिक आहेत. त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजी शिक्षणाचे प्रशिक्षणही भविष्यात ज्ञान महामंडळाच्या माध्यमातूनच दिले जाईल.
माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या कारकीर्दीत इंग्रजी भाषेची सक्ती कमी करण्यात आली. त्याचा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणावर परिणाम झाला. या निर्णयाने मोठे नुकसान झाले. आता अभ्यासक्रम सोपे करण्याचे प्रकार बंद झाले पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, महात्मा फुले यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव आहे. मदर तेरेसा, बाबा आमटे, कर्मवीर पाटलांच्या सेवाकार्यात सहभाग घेता आला, त्याचा आनंद मोठा आहे. यापूर्वी मंत्रिपद आणि न्यायमूर्तीचे पद मी नाकारले.
मला सत्तेचा मोह नाही कर्मवीरांबरोबर शिक्षण क्षेत्रात काम केले. रयतच्या विस्ताराला हातभार लावला. त्यामुळे आयुष्यात समाधान मिळाले, असेही त्यांनी सांगितले.
मानवी कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील साळवे यांनी प्रास्तावित केले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, रमण मुथा, तुपे आदींची भाषणे झाली. आभार प्रा. नानासाहेब देवकर यांनी मानले.