Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
(सविस्तर वृत्त)

रेल्वे तिकीट आरक्षणासाठी सावेडीत कक्ष उघडणार
नगर, ३ मे/प्रतिनिधी

नगर, शिर्डी, कोपरगाव, बेलापूर स्थानक, तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्याबरोबरच रेल्वे तिकीट आरक्षणासाठी सावेडी एमआयडीसी परिसरात काऊंटर उघडण्यात येईल, असे आश्वासन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे नूतन व्यवस्थापक के. स्वामीनाथन यांनी दिले.

 

मध्य रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीची पहिली बैठक स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली व वाणिज्य व्यवस्थापक नरेंद्र पाटील आदींच्या उपस्थितीत अलीकडेच सोलापूर येथे पार पडली. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले. स्वामीनाथन यांनी सांगितले की, नगर रेल्वेस्थानकावर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक कोच, इंडिकेशन बोर्ड उभारण्यात येईल, तसेच झेलम एक्स्प्रेसची स्वच्छता, रेल्वेगाडय़ांत तृतीयपंथीय आणि चोरटय़ांचा वाढता त्रास याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल. शिर्डी स्थानकाविषयी प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या असून, शिर्डी-पुणतांबे लोहमार्ग देशाशी जोडण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. बैठकीत पत्रकार सुधीर मेहता यांनी नगरचे, रमेश कोठारी, रणजीत श्रीगोड यांनी शिर्डी व बेलापूर स्थानकाचे प्रश्न मांडले. वेळेवर आणि स्वच्छ रेल्वेगाडय़ा, स्वच्छ रेल्वेस्थानके, सुरक्षितता आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ, असे स्वामीनाथन यांनी सांगितले. प्रवासी संघटना व प्रवासी महासंघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.