Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

नवनीत

पंजाबच्या इतिहासात शेख फरीद या एकाच नावाचे दोन सूफी सत्पुरुष प्रसिद्ध आहेत. पहिला शेख फरीद सोनी, हा शाहब्रह्म म्हणून गौरविला जातो. तो तेराव्या शतकापूर्वी होऊन गेला. अजमेरला त्याचा मुक्काम असे. त्याच्या नावावर काव्य नाही, पण त्याच्या साक्षात्कारी व्यक्तिमत्वाच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्याच्या परंपरेत पुढे बाबा फरीद आला. हा नानकदेवांचा ज्येष्ठ समकालीन होता. बाबा फरीद हा काही पंजाबी

 

अभ्यासकांच्या मते आद्य पंजाबी कवी. याच्याबरोबर नानकदेवांनी दोनवेळा शास्त्रार्थ केला. बाबा फरीद शकरगंज याची १३० द्विपदी वचने आणि चार कवने गुरुग्रंथसाहिबात मिळतात. त्यातच फरीद-नानकदेव संवादही दिसतो. शेखकडून माधुर्यभक्तीचा पुरस्कार झाला. नानकदेवांनी तो मानला नाही. नामस्मरण साधना, ईश्वरतत्त्वाचे सर्वव्यापकत्व, प्रपत्तिभाव इत्यादी बाबी नानकदेवांनी शेखसमोर ठेवल्या. वायव्य भारतातील संत परंपरेचा इतिहास पाहायचा तर पुन्हा आपल्याला नानकदेवांकडेच वळावे लागते. त्यांच्या आधी या भागात कार्य करुन गेलेल्या संत नामदेवांकडे यावे लागते. एखाददुसरा अपवाद आढळतो. तेराव्या शतकातील भारतीय राजकारण आणि धर्मव्यवस्था यांचे काही पैलू स्पष्ट करताना खलीक अहमद निजामी यांनी शेख हमीद उद्दीन या मुसलमान संताची माहिती दिली आहे. तो खेडय़ात एक लहानशा घरात राहून एक बिघा जमिनीत स्वत शेती करी. त्याची राहणी, पोषाख सामान्य भारतीय शेतक ऱ्याचा होता. त्याने एक गायही पाळली होती. त्याची पत्नी चरख्यावर सूतकताई करी. शेख पती-पत्नी पूर्णत शाकाहारी झाले आणि त्यांची बोली हिंदवी असे. अन्य कुणी संत झाल्याची माहिती मिळत नाही. हमीद उद्दीनच्या नावावर काव्य नाही. त्याच्या प्रत्यक्ष कार्याबद्दलही काही सांगता येत नाही. शेख इस्माईल, शेख अली बिन् उस्मान हुजवीही, गंज बख्श, सैय्यद अहमद सुलतान सर्वर, फरीद उद्दीन मसऊद आणि ख्वाजा निजामुद्दीन अवलिया असे काही सूफी संत सांगता येतात. यांचा प्रभाव मुसलमानांप्रमाणेच हिंदूंवर पडल्याच्या अनेक जनश्रुती मिळतात. त्यांचे थोडे वाङ्मय जे सांगितले जाते ते सूफी दर्शनविषयक आहे.
अशोक कामत

परमइनांतर म्हणजे काय? निरीक्षणाच्या दृष्टीने परमइनांतराचे महत्त्व काय?
इनांतर म्हणजे निरीक्षकाच्या दृष्टीने आकाशात दिसणारे सूर्य वा ग्रह यांच्यातील अंशात्मक अंतर. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर निरीक्षक आणि सूर्य यांना जोडणारी रेषा आणि निरीक्षक व ग्रह यांना जोडणारी रेषा यामधील कोन म्हणजे इनांतर. अंतर्ग्रहांच्या म्हणजेच शुक्र आणि बुध या ग्रहांच्या बाबतीत बहिर्युतीच्या वेळेस पृथ्वी, सूर्य व तो ग्रह एका रेषेत असतात. या वेळेस त्या ग्रहाचे इनांतर शून्य असते. बहिग्रहांच्या बाबतीत हीच स्थिती त्या त्या ग्रहाच्या युतीच्या वेळेस म्हणजे पृथ्वी- सूर्य बहिग्रह एका रेषेत असताना अशी स्थिती असते. ग्रह सूर्याभोवती भ्रमण करताना जसजसा कक्षेत पुढे पुढे जातो तसतसा आकाशात तो सूर्यापासून दूर दूर जाताना दिसतो. पर्यायाने त्याचे इनांतर वाढत जाते. बहिर्ग्रहाचे इनांतर सतत वाढत जाऊन प्रतियुतीच्या वेळेस जेव्हा ग्रह- पृथ्वी- सूर्य अशी स्थिती असते, तेव्हा बहिग्रहाचे इनांतर जास्तीतजास्त १८० अंश असते. अंतर्ग्रहाची कक्षा मात्र सूर्य व पृथ्वी यादरम्यान असल्याने हे ग्रह आकाशात सूर्यापासून फार लांब गेलेले दिसत नाहीत. निरीक्षकाच्या दृष्टीने अंतग्रह आकाशात जेव्हा जास्तीत जास्त (सूर्यापासून) लांब गेलेला दिसतो, म्हणजेच त्याचे इनांतर जास्तीत जास्त असते. या कोनाला त्या ग्रहाचे परमइनांतर म्हटले जाते. बुधाचे परमइनांतर केवळ १८ ते २८ अंश इतकेच असते. त्यामुळे बुध ग्रह सूर्यापासून फार लांब गेलेला दिसू शकत नाही. शुक्राचे परमइनांतर ४६ ते ४८ अंश असते. हे परमइनांतर बदलत राहण्याचे कारण आहे ग्रहांची लांब वर्तुळाकार कक्षा. आकाश निरीक्षणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमइनांतराच्या रात्री त्या ग्रहाचे निरीक्षण सूर्यास्तानंतर आपण जास्तीतजास्त वेळ करु शकतो.
मृणालिनी नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

वीरसेन कदम ऊर्फ बाबा कदम या नावाने महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या कादंबरीकाराचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्य़ातील अक्कलकोट संस्थानात झाला. इतिहास आणि तत्वज्ञान या विषयात पदवी संपादन करणाऱ्या बाबा वकिलीची पदवी संपादन करून १९५९ च्या सुमारास पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून रुजू झाले. खटला चालवणारे बाबा कादंबरीकार कसे झाले याचा किस्सा मोठा गमतीदार आहे. एक वकील इचलकरंजीच्या कोर्टात खटला चालवत असताना साक्षीदारांना वाटेल ते प्रश्न विचारत होता. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या बाबांचे डोके भणभणू लागले. पण सरकारी वकील असल्याने ते कोर्ट सोडून जाऊ शकत नव्हते. खटल्याचे कामकाज सुरू असताना केवळ विरंगुळा म्हणून त्यांनी शाहू महाराजांना डोळ्यासमोर ठेवून आबासाहेब थोरात नावाचे पात्र उभे करून अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षण हा विषय हाताळून ६०० पानांची ‘प्रलय’ नावाची महाकादंबरी लिहिली. पण, प्रकाशक मिळेना. मोठय़ा मुश्कीलीने हजार रुपये दिल्यावर एक प्रकाशक मिळाला आणि एके दिवशी तो प्रकाशक बाबांकडे आला. १००० रुपये परत करुन कादंबरी करायच्या आणि रॉयल्टीच्या गोष्टी तो करु लागला. यावर बाबांचा विश्वासच बसला नाही. पण त्याने बाबांना अत्र्यांचा ‘मराठय़ा’चा अंक दाखवला. त्यात अग्रलेखाचा मथळा होता- महाराष्ट्रात एक जबरदस्त कादंबरीकार उदयास येतो आहो, नाव बाबा कदम! जवळजवळ ८० कादंबऱ्या, सहा लघुकथा, प्रवासवर्णने त्यांनी लिहिले, भालू, डाग, प्रलय, इन्साफ या कादंबऱ्यावर चित्रपट निघाले. कादंबऱ्यातून जातीव्यवस्था, रुढी परंपरा यावर हल्ला चढवून सर्कस, क्रिकेट, वेश्यांचे जीवन, शिकार, गावातील संघर्ष हे विषय हाताळले. बाबा उत्तम चित्रकार असून, शेकडो जलरंग चित्रे व तैलचित्रे त्यांनी रंगविली. लाकडाच्या भुश्यापासून विविध वस्तू बनविण्याचा त्यांचा हातखंडा आहे. १९६० च्या दशकात उदयाला आलेल्या त्या कादंबरी बाबांची जादू आजही कायम आहे.
संजय शा. वझरेकर

पुन्हा पौलमीला खूप कंटाळा आला. ती वैतागली आणि तिने पुस्तके इकडे तिकडे भिरकावून दिली. दणादणा पाय आपटत ती घरभर हिंडली. खिडक्यांची दारे धडाधडा उघडून ती एका खिडकीत बसून राहिली. कशातच तिचं मन रमत नव्हतं. आई स्त्रीरोगतज्ज्ञ, बाबा सर्जन. दोघेही सारखी आपली हॉस्पीटलमध्येच असायची. कधी ऑपरेशन करत तर कधी पेशंट तपासत असायची. त्या शिवाय मधूनमधून कॉन्फरन्ससाठी सिंगापूर, इंग्लंड, जर्मनी, कुठे कुठे दोघांचे आलटूनपालून दौरे चालूच असाचे. पौलमीला एकटीला कंटाळा येऊ नये म्हणून दोघंही तिला खूप गोष्टी आणून द्यायचे. आई-बाबा घरी आले रे आले की हाताची घडी घालून, दोन्ही गाल फुगवून पौलमी आरडाओरडा करायची,‘हे काय रे बाबा, मला घरी अगदी करमत नाही. एकटीला काहीच नसतं करायला. किती कंटाळा येतो मला ठाऊक आहे?’ आई म्हणे,‘अगं आजी असते ना घरी तुझ्याबरोबर?’ ‘ती सारखी झोपते’,पौलमी फुरंगटून म्हणाली. आई-बाबांनी ज्या ज्या म्हणून गोष्टी मुलांसाठी बाजारात मिळतात त्या सगळ्या तिला आणून दिल्या होत्या. गेम्स, सायकल, चेंडू, मॉडेल ट्रेन, उडणारी विमाने, वीजेवर चालणाऱ्या मोटारी, कितीतरी बाहुल्या, कापूस भरलेले प्राणी, गोष्टींची पुस्तके, रंगवायची पुस्तके, रंगीत खडू.. तरीही पौलमी हाताची घडी घालून पाय आपटत म्हणायची,‘‘मला सारखं तेच ते खेळून कंटाळा आलाय.’’ पौलमीने सगळं घर हळूहळू तिच्यासाठी आई-बाबांनी आणलेल्या वस्तूंनी भरून गेलं. कपाटं खेळण्यांनी इतकी भरली की त्यांची दारं उघडली की सगळी गडगडत खाली पडायची. प्रत्येक खेळण्याचा तिला कंटाळा यायचा. मग आई-बाबा आणखी खेळणी आणून द्यायचे. ती म्हणायची,‘‘मी बोअर झालेय.’’ सोफावर तिचे गेम्स ढीगाने होते. जेवणाच्या टेबलावर पुस्तकांचे ढीग होते. बाबांच्या अभ्यासिकेत तिने रंगविलेली पुस्तके, खडू यांचे संमेलन होते आणि हॉलमध्ये सायकल, चेंडू, मोटारी, विमाने.. काही विचारूच नका. घरी कोणी आले तर त्यांना पाय कुठे ठेवून पुढे जायचे ते कळायचे नाही. कुठे बसायचे ते त्याहून समजायचे नाही. पौलमीचे मला कंटाळा आलाय, हे पालुपद चालूच असायचे. आपल्या वस्तू रागावून इकडे-तिकडे फेकायलाही आता जागा उरली नव्हती. काय करावं तेच मुळी आई-बाबांना कळत नव्हतं. त्या दिवशी पौलमीचा सातवा वाढदिवस होता. आईने चक्क हॉस्पीटलमधून सुट्टी काढली. ती पौलमीला म्हणाली,‘‘तुझा वाढदिवस आपण वेगळ्या ठिकाणी साजरा करुया.’’ आई तिला घेऊन आमचं घर नावाच्या अनाथालयात गेली. पौलमीला तिने मुलांना खाऊ वाटायला लावला. ती मुले, त्यांचे करुण चेहरे, त्यांचे कपडे, त्यांचे राहणे, सगळंच नेहाला वेगळं होतं. पूर्ण दिवस आई आणि पौलमी त्या मुलांबरोबर राहिले. संध्याकाळी पौलमीला टाटा करायला ४० मुले ग्राऊंडवर आली. पौलमीची पावले जड झाली. ती आईला म्हणाली,‘‘मी यांच्याशी खेळायला येत जाऊ? आणि माझी खेळणी पुस्तकेही यांच्यासाठी आणू का?’’ आईने पौलमीला प्रेमाने जवळ घेतले आणि ती म्हणाली, ‘‘माझी शहाणी पौलमी.’’
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com