Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

प्राचार्य राम शेवाळकर अनंतात विलीन
नागपूर, ३ मे/ प्रतिनिधी

प्राचार्य राम शेवाळकर यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५.३० वाजता डागा ले आऊट मधील त्यांच्या ‘पर्णकुटी’ या निवासस्थानातून निघाली. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र आशुतोष शेवाळकर यांनी भडाग्नी दिला. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.

वैदर्भीय साहित्य जगताला धक्का
नागपूर, ३ मे / प्रतिनिधी

सर्व मराठी मनांना ओघवत्या वक्तृत्वाने मोहवून ठेवणारे, संत साहित्य आणि मराठी भाषेचे व्यासंगी पुरस्कर्ते प्राचार्य राम शेवाळकर यांच्या निधनामुळे विशेषत: वैदर्भीय साहित्य जगताला धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि अन्य क्षेत्रातील शेकडो मान्यवरांनी ‘पर्णकुटी’ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शेतक ऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेती मार्गदर्शन प्रदर्शन हवे -सुदर्शन
नागपूर, ३ मे/प्रतिनिधी

विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी गोरक्षण सभेने जैविक तंत्रज्ञानावर आधारित शेतीचे मार्गदर्शन करणारे प्रदर्शन तयार करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांनी केले. मोरोपंत पिंगळे गोरक्षण परिसरातील प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी सुदर्शन बोलत होते. यावेळी गोरक्षण सभेचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार, सचिव निखिल मुंडले आणि उपाध्यक्ष अजय पत्की उपस्थित होते.

गोसीखुर्द प्रकल्प स्थलांतरितांना विशेष ओळखपत्र
नागपूर, ३ मे / प्रतिनिधी

गोसीखुर्द प्रकल्पातील पर्यायी गावठाण्यात स्थलांतरित झालेल्या लोकांना विशेष ओळखपत्र देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी दिली. आंभोरा अडेगाव गावातील प्रकल्पग्रस्तांना धन्यवाद देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १ मे रोजी भेट दिली. यावेळी या अभिनंदन सोहोळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता खोलापूरकर होते. ओळखपत्रामुळे स्थलांतरित नागरिकांना सहकार्य करणे सोपे जाईल. याशिवाय महसूल, सिंचन व अन्य विभागातील अधिकारी प्रकल्पग्रस्त गावांमध्ये शिबीर घेऊन समस्यांचे निराकरण करतील, असे जिल्हाधिकारी दराडे यांनी सांगितले.

मसल पॉवर फिटनेस क्लबचे उद्घाटन
नागपूर, ३ मे/प्रतिनिधी

आधुनिक समाजव्यवस्थेत जीवनाला गतिमानता आलेली असल्याने, निरोगी आरोग्य राखणे अत्यावश्यक असून, तरुण पिढीने शिक्षणाबरोबरच सुदृढ शरीर जोपासन्याला महत्त्व देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर यांनी केले. चंदननगर येथे मसल पॉवर फिटनेस क्लबच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. क्लबचे उद्घाटन महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय बाभरे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार महेंद्र सुके, नगरसेवक दीपक चौधरी, सामाजिक कार्यकर्ते राजा हांडा उपस्थित होते. याप्रसंगी विजय बाभरे यांनी व्यायामाचे महत्त्व सांगून आजच्या तरुणांना व्यायामाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी या फिटनेस क्लबचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाभरे यांनी यावेळी केले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी विचार मांडले. उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रशिक्षकांनी क्लबमधील आधुनिक व नवीन मशीनद्वारा व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी शैलेंद्र राठी, राजेश शुक्ला, काशिनाथ पुरी, हेलोंडे, नारायण चौरे, हरीष डाखोळे, विनोद इंगोले तसेच, परिसरातील नागरिक व तरुण उपस्थित होते.

वैद्यक परिषदेच्या निवडणुकीत आयएमए पॅनलचा विजय
नागपूर, ३ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (एमएमसी) २६ एप्रिलला झालेल्या निवडणुकीची शनिवारी मुंबई येथे मतमोजणी झाली असून त्यात आयएमएचे सर्व नऊ उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले आहेत. यामध्ये विदर्भातील डॉ. किशोर टावरी (नागपूर) आणि डॉ. उद्धव देशमुख (अमरावती) यांचा समावेश आहे. तब्बल १२ वर्षांंनंतर महाराष्ट्र वैद्यक परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता होती. परंतु नागपूर वगळता इतर जिल्ह्य़ात फारसे मतदान झाले नाही. अल्प मतदान झाल्याने कोण निवडून येणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मुंबईतील हॉफकीन संस्थेच्या सभागृहात शनिवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू होती. सुरुवातीपासूनच आयएमएचे उमेदवार आघाडीवर होते. या निवडणुकीत तीन पॅनल्स रिंगणात होते. त्यात आय.एम.ए., डॉ. आंबेडकर मेडिकोज कम्यून आणि महाराष्ट्र रिफार्मिस्ट पॅनलचा समावेश होता. तर काही उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात होते. या निवडणुकीत नागपूरमध्ये २५.८२ टक्के, पुणे येथे १३ टक्के तर मुंबई येथे फक्त १५ टक्के मतदान झाले होते. आय.एम.ए.तर्फे डॉ. किशोर टावरी, डॉ. उद्धव देशमुख, डॉ. संजय गुप्ते (पुणे), डॉ. संतोष कदम (ठाणे), डॉ. बिपीन पंडित (मुंबई), डॉ. सुहास पिंगळे (मुंबई), डॉ. सुरेश राव (मुंबई), डॉ. रवी वानखेडकर (धुळे), डॉ. उत्तुरे हे उभे होते. हे सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती आय.एम.ए.चे माजी सचिव डॉ. संजय देशपांडे यांनी दिली.

जैन टीचर्स असोसिएशनचे अधिवेशन
नागपूर, ३ मे/प्रतिनिधी

भारतीय जैन संघटना व जैन टीचर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात शिक्षक अधिवेशन झाले. संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रकाश मारवडकर यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड. वीरेंद्र फुलाडी, डॉ. नरेंद्र भुसारी, भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष रजनीश जैन, टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र नखाते, उपाध्यक्ष विजय उदापूरकर, सतीशचंद्र जैन, सचिव साधना पोहरे, ग्रामीण अध्यक्ष प्रभाकर डाखोरे उपस्थित होते. सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्यापूर्वी आपल्या सव्‍‌र्हिस रेकार्डबद्दल, तो कसा अद्ययावत करावा, सेवापुस्तिकेत त्रुटी राहू नये, घेतलेल्या प्रशिक्षणाच्या रजेच्या, प्राप्त झालेल्या अथवा वसुलीच्या, रकमेच्या नोंदी आदी विषयांवर वीरेंद्र फुलाडी यांनी माहिती केले. याप्रसंगी प्रकाश मारवडकर व रजनीश जैन यांनी संघटनेच्या सामाजिक उपक्रमावर तर डॉ. नरेंद्र भुसारी यांनी शैक्षणिक उपक्रमावर भाषण दिले. अधिवेशनाचे प्रास्ताविक राजेंद्र नखाते व संचालन आदेश जैन यांनी केले.