Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

रिक्षा ‘बंद’ मुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय
पुणे, ३ मे/ प्रतिनिधी

आज रिक्षाचालकांचे उपोषण
भाडेकपातीबाबत बंड ठाम
भाडेकपात रद्द करण्याची मागणी करून रिक्षाचालकांनी सुरू केलेला बंद आज तिसऱ्या दिवशीही सुरू राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. उद्या (सोमवारी) रिक्षा संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने विधान भवनासमोर उपोषण करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसेस सोडण्याबरोबरच पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या पुढाकाराने शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांहून माफक दरात कॅब सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘अरे यार, अरुण दाते नाबाद ७५!
अरुण नुलकर

आपल्या मखमली आवाजानं रसिकांच्या हृदयात मानाचं स्थान मिळविणारे आजचे लोकप्रिय गायक अरुण दाते आज वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. खरंतर, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘सखी शेजारिणी तू हसत रहा’, ‘स्वरगंगेच्या काठावरती’, ‘जपून चाल पोरी जपून चाल’, ‘मान वेळावुनी धुंद बोलू नको’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘शुक्रतारा मंदवारा,’ अशी असंख्य चिरतरुण गाणी गाणारे अरुण दाते आणि त्यांना लाभलेले कवी मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे, यशवंत देव हे सर्व तरुणच आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात ‘बंद’ ला संमिश्र प्रतिसाद
मीटर सक्तीच्या विरोधात बंद

पिंपरी, ३ मे/प्रतिनिधी

पुणे शहरातील रिक्षाभाडे दर कमी करण्याचा निर्णय मागे घ्यावा व पिंपरी-चिंचवड शहरातील मीटर सक्ती रद्द करावी, या मागणीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी परिसरातील रिक्षाचालकांनी आज सकाळपासून सुरू केलेल्या बेमुदत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमुळे बाहेरगावहून आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे व रिक्षा पंचायत संघटनेचे प्रमुख आत्माराम नाणेकर यांनी शहरातील रिक्षा ७० ते ८० टक्के बंद असल्याचा दावा केला.

ही परिस्थिती आम्हा सर्वाना अंतर्मुख करायला लावणारी.. ’
मतदारराजा का रुसला ?

पुण्यात सर्व मार्गानी जागृतीचा प्रयत्न होऊनही मतदारांमध्ये दिसलेला निरुत्साह आणि जेमतेम ४१ टक्के झालेले मतदान ही परिस्थिती सर्वच राजकीय पक्षांना अंतर्मुख करायला लावणारी आहे असे मला वाटते. मतदारांनी सर्व राजकीय पक्षांना दिलेला हा एकप्रकारचा गंभीर इशारा आहे आणि त्याचा सर्वानाच विचार करावा लागणार आहे. सुशिक्षितांसह समाजाच्या सर्व वर्गात निरुत्साह निर्माण होण्याची कारणे कोणती असतील, याचा मी जेव्हा माझ्या पद्धतीने शोध घेतला, तेव्हा हे स्पष्टपणे जाणवले की, लोकशाहीसह प्रशासन यंत्रणा, न्यायव्यवस्था, राजकारणी, लोकप्रतिनिधी अशा सर्वच व्यवस्थांवरील लोकांचा विश्वास वेगाने उडत आहे.

भौगोलिक माहिती सीडीमध्ये
पुणे, ३ मे/ प्रतिनिधी

धुळे जिल्ह्य़ातील आदिवासी भागातील पिंपळनेर येथील नीलेश छडवेलकर, शरद दाभाडे या दोन तरुणांनी महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी विश्वकोश प्रथमच सीडीच्या रुपात तयार करून ‘ज्ञानगंगा’ या नावाने नुकताच प्रकाशित केला. शैलनी सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीने ही सीडी तयार केली आहे. या विश्वकोशात जग, भारत व महाराष्ट्राशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व भौगोलिक विषयांसह अन्य अनेक विषयांची समग्र माहिती यामध्ये आहे. बारा हजार पाने या विश्वकोषात आहेत. विषायनुरूप तीन हजार नकाशे, छायाचित्र, व्हिटोआहो असून पंधरा हजार प्रश्नांच्या अनेक सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये केला आहे. याचा उपयोग स्पर्धापरीक्षांसाठी होऊ शकतो. कला, साहित्य, क्रीडा, हवामान, इतिहास, पर्यटन अशा विविध विषयांची विस्तृत माहिती या कोशात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोघा तरुणांकडे संगणक क्षेत्रामधील एकही पदवी अथवा सर्टिफिकेट नसताना त्यांनी ग्रामीण भागात राहून हा अभिनव उपक्रम केला आहे. आजपर्यंत सुमारे तीस हजार घरांमध्ये हा विश्वकोश पोहोचला असून तो महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचविण्याचा या दोघांचा मानस आहे.

‘आजा मेरी गाडी मे बैठ जा’चा पहिला प्रयोग उद्या
पुणे, ३ मे/ प्रतिनिधी

समन्वय या नाटय़संस्थेच्या ‘आजा मेरी गाडी मे बैठ जा’ या नाटकाचा पहिला प्रयोग येत्या पाच मे रोजी भरत नाटय़ मंदिर येथे होणार आहे. हे नाटक फ्रेंच लेखक मिलान कुंदेरा यांच्या ‘दि लाफेबल लव्हस्’ या कथासंग्रहातील ‘दि हिचहायकिंग गेम’ या कथेवर आधारित आहे. या नाटकाचे लेखन शशांक शेंडे यांनी केले असून दिग्दर्शन आशुतोष परांडकर यांनी केले आहे. मयूर खांडगे व आरती बडगबाळकर यांच्या प्रमुख भूमिका असून या नाटकाची प्रकाशयोजना हर्षवर्धन पाठक यांची आहे. तसेच रोहित नागभिडे यांनी या नाटकाला संगीत दिले आहे.

मतदान याद्यांतील त्रुटींबाबत तक्रार करण्याचे आवाहन
पुणे, ३ मे/प्रतिनिधी

प्रशासन यंत्रणेतील त्रुटींमुळे पुण्यातील ज्या नागरिकांना मतदान करता आले नाही अशा नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रयत्न आमदार विनायक निम्हण यांच्या कार्यालयामार्फत केले जाणार आहेत.मतदार यादीत नाव नसणे, एकाच यादीत दोनदा नाव येणे, यादीतून नाव गायब होणे, मतदान केंद्र न सापडणे, यादीत चुकीचे छायाचित्र प्रसिद्ध होणे अशा अनेक तक्रारी असून, त्या योग्य त्या पुराव्यांसह जिल्हा प्रशासन, निवडणूक अधिकारी, निवडणूक आयोग यांच्या निदर्शनास आणून देण्याची योजना आखण्यात आली आहे. संबंधित नागरिकांनी त्यांची लेखी स्वरूपातील तक्रारी ४४६ गोपी भवन, हॉटेल शैलजाजवळ, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ या पत्त्यावर आणून द्याव्यात, असे आवाहन आमदार निम्हण यांनी केले आहे.

चोरांच्या टोळीस अटक
पुणे, ३ मे/ प्रतिनिधी

कोंढवा खुर्द आणि भारती विद्यापीठ परिसरातील दोन सदनिकांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटय़ांनी अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी या घटना घडल्या.
भारती विद्यापीठ येथील गुरुदत्त सोसायटीमधील सदनिकेचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटय़ाने ९६ हजार रुपये किमतीचे चार लॅपटॉप चोरून नेले. आशुतोष सुरेशकुमार त्रिपाठी (वय २२) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्रिपाठी व त्याचा मित्र परीक्षेसाठी महाविद्यालयात गेले असल्याचा गैरफायदा घेऊन चोरटय़ाने ही घरफोडी केली. सहायक पोलीस फौजदार आर.टी. जाधव या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. कोंढवा खुर्द येथील भवेरा पार्क सोसायटीत राहणारे भूपती चिन्नास्वामी पिल्ले (वय ५८) यांच्या घरातून अज्ञात चोरटय़ाने एक लाख ५७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गुरुवारी दुपारी सव्वाबारा ते सव्वातीन या वेळेत ही घरफोडी करण्यात आली. पिल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. कदम या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

‘बाबासाहेब दूरदर्शी अर्थतज्ज्ञही होते’
पुणे, ३ मे/प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ कायदेतज्ज्ञच नव्हते, तर दूरदर्शी अर्थतज्ज्ञही होते, असे मत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय परिषदेतर्फे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. डॉ. जाधव म्हणाले, की आंबेडकर हे खरे अर्थशास्त्रज्ञ होते. विदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी पीएच.डी.साठी सादर केलेला प्रबंधही अर्थशास्त्र या विषयावरीलच होता. यावेळी जयदेव गायकवाड, रजनी त्रिभुवन, आरिफ बागवान आदी उपस्थित होते.

डॉ. भगवान माळी यांना ‘मणिभाई देसाई’ पुरस्कार
बारामती, ३ मे/वार्ताहर

येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागातील व्याख्याते व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. भगवान माळी यांना नुकताच ‘मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २००८’ प्रदान करण्यात आला. पुणे येथे झामाजी गृहराज्यमंत्री श्री. भाई वैद्य यांच्या हस्ते डॉ. माळी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून गौरविण्यात आले. डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या समारंभास माजी खासदार डॉ. शांती पटेल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे, शांतीलाल खिंवसरा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ. माळी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीकुमार शहा (सराफ), सचिव जवाहरशेठ शहा (वाघोलीकर), खजिनदार अॅड. रमेश दोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर, उपप्राचार्य प्रकाश मेहेर, उपप्रचार्य प्रा. मेजर मानसिंगराव गोडसे, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी डॉ. भगवान माळी यांचे अभिनंदन केले.

नाझरे धरणातील पाणीसाठय़ात घट
जेजुरी, ३ मे / वार्ताहर

जेजुरी गाव व औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे धरणातील पाणीसाठय़ात लक्षणीय घट झाली आहे. क ऱ्हा नदीवर असलेल्या या धरणालाच मल्हारसागर ‘जलाशय’ म्हटले जाते. याची पाणीसाठा क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा ५८८ दशलक्ष घनफूट आहे, तर २०० दशलक्ष घनफूट मृत साठा मानला जातो. सध्या उपयुक्त असलेला सर्व पाणीसाठा संपला असून १६२ द. घनफूट मृत पाणीसाठा शिल्लक आहे.
जेजुरी गाव, औद्योगिक वसाहत, आय. एस. एम. टी. कंपनी, मोरगाव १६ गावांची प्रादेशिक योजना, पारगाव, कोळविहिरे आदी योजनांना येथून पाणी उचलले जाते.
दररोज १.७ दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी लागते. धरणातील पाणीसाठा जरी कमी झाला असला, तरी उपलब्ध असलेल्या मृत साठय़ातील पाणी पावसाळ्यापर्यंत व्यवस्थित पुरेल, असे पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी परमानंद गोसावी व कालवा निरीक्षक गोरखनाथ गायकवाड यांनी सांगितले. धरणाच्या पात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने, पाण्याजवळ मोटार लावून तेथून पाणी जॅकवेलपर्यंत उचलून टाकावे लागत आहे.