Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

राज्य

आगळा वेगळा आर्टिस्ट मुन्नाभाई ..
संजय बापट, ठाणे, ३ मे

साधारणपणे कोणतेही चित्र रेखाटायचे म्हणजे पट्टी-पेन्सिल, ब्रश आणि रंग आलेच. कोणत्याही चित्रकाराला या मूलभूत साधनांशिवाय कलेची हौस भागविता येत नाही. मग व्यवसाय तर दूरच! पण अशाही परिस्थितीत चित्रकलेसाठी लागणारी कोणतीही साधने न घेता केवळ हाताच्या बोटांनी पाच ते दहा मिनिटांत मोठमोठी पण आकर्षक चित्रे काढून देणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल? एवढेच नव्हे, तर चित्रकलेबरोबरच हिंदी चित्रपटातील हजारो गाणी गाणारा आणि काही चित्रपटांतील संवाद त्याच कलाकारांच्या आवाजात सादर करणाऱ्या कलाकाराला कोणतीही विशेषणे कमीच पडतील!

‘मतपेटय़ांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करा’
आनंद परांजपे यांची मागणी
ठाणे, ३ मे/प्रतिनिधी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतपेटय़ांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना भाजपा युतीचे येथील उमेदवार आनंद परांजपे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजा कराळे यांनी दिली.

देशहितासाठी भाजप व काँग्रेसने एकत्र यावे -घैसास गुरुजी
सांगोला, ३ मे/वार्ताहर

भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांची ध्येयधोरणे वेगळी असली तरी देशहितासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन केंद्रात सरकार स्थापन करावे व प्रादेशिक पक्षांना धडा शिकवावा, असे प्रतिपादन बहुभाषिक ब्राह्मण सभेचे अध्यक्ष वेदमूर्ती मोरेश्वर विनायक घैसास गुरुजी यांनी केले आहे.

‘शेतीला पूरक व्यवसायाची जोड काळाजी गरज’
सातारा, ३ मे/प्रतिनिधी

शेतक ऱ्यांनी केवळ शेती करून चालणार नाही. शेतीला अनुषंगिक व्यवसायाची जोड दिल्यास येणाऱ्या अडचणीवर शेतकरी सक्षमपणे मात करू शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी शनिवारी व्यक्त केला. येत्या खरीप हंगामाला सामोरे जाण्यासाठी शेतक ऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शासनाने राज्यभर १ ते ३१ मे २००९ या कालावधीत कृषी दिंडीचे आयोजन केले आहे. सातारा जिल्हा कृषी दिंडीचा शुभारंभ नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विकास देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

लोकसभेच्या रंगीत तालमीनंतर, आता मोर्चेबांधणी विधानसभेची
जयप्रकाश पवार, नाशिक, ३ मे

लोकसभा निवडणुकीचे राज्यातील तीनही टप्पे पार पडल्यानंतर त्यातील उमेदवार व त्यांच्या पाठीराख्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या असताना, लोकसभा हीच रंगीत तालीम समजून त्यात हिरीरीने भाग घेतलेल्या विविध पक्षांतील इच्छुकांनी आता तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ज्या पक्षाची उमेदवारी घ्यावयाची त्याची शक्तीस्थळे, अपायकारक ठरू शकतील अशी मर्मस्थळे, विशिष्ट कार्डची संभाव्य उपयोगिता, एकगठ्ठा मतदारांची ठिकाणे, त्यावर कोणत्या नेत्या वा कार्यकर्त्यांचा प्रभाव पडू शकतो यासह उपलब्ध होणाऱ्या मनुष्य व आर्थिक बळाचा अंदाज घ्यायला इच्छुकांनी अग्रक्रम दिला आहे.

प्रत्येक घर संस्कार केंद्र बनले पाहिजे - मोरे
राधानगरी, ३ मे / वार्ताहर

पाश्चात संस्कृतिच्या वाढत्या अतिक्रमणामुळे भारतीय संस्कृतिचा विसर पडत चालला असून जिजाऊ व छत्रपती शिवरायांचा वारसा जतन करण्यासाठी प्रत्येक घर हे संस्कार केंद्र बनले पाहिजे, असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक व भोगावती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यु. एम. मोरे यांनी केले.

नाशिक-पुणे दरम्यान व्हॉल्वो बसफेऱ्यांमध्ये वाढ
नाशिक, ३ मे / प्रतिनिधी
उन्हाळ्याची सुट्टी तसेच लग्नसराईचा हंगाम लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोईसाठी नाशिक-पुणे या मार्गावर व्हॉल्वो वातानुकूलीत बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रकांनी घेतला आहे. सुटय़ांमध्ये नाशिक ते पुणे दरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दरवर्षी मोठी वाढ होत असते. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन दोन मेपासून व्हॉल्वो बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. नाशिकहून सकाळी सहा, सात, आठ, साडेअकरा, दुपारी साडेबारा, एक वाजून ३० मिनिटे, सायंकाळी पाच, सहा, सात व रात्री साडेअकरा याप्रमाणे बस सुटण्याची वेळ आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक मधुकर सोनवणे यांनी केले आहे.

पारोळा स्फोट प्रकरण: नगराध्यक्षास पोलीस कोठडी
पारोळा, ३ मे / वार्ताहर

फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोट प्रकरणी फरार असलेला मालक नगराध्यक्ष गोविंद शिरूडे रविवारी स्वत:हून येथील न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर त्यास आठ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. १० एप्रिल रोजी येथील सावित्री फायरवर्क्स या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात २५ ठार तर ५७ जण जखमी झाले. या प्रकरणी कारखान्याचे संचालक गणेश धोत्रे, विनोद पाटील, नारायण सोनार, संजय वाणी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. अद्यापही चंद्रकांत शिरूडे, विकास शिरूडे व मनिषा शिरूडे हे तीन जण फरार आहेत.

जकातीतील तोटय़ाबाबत सीआयडी चौकशीची मागणी
नगर, ३ मे/प्रतिनिधी
महापालिकेला मागील आर्थिक वर्षांत जकात वसुलीत आलेल्या १५ कोटी रुपये तोटय़ाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी मुस्लिम ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष सलमान आर्मेचरवाला यांनी केली. यासंदर्भात त्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह विभागीय आयुक्त, नाशिक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे. मनपा अधिकाऱ्यांनी मागील वर्षांत जाणीवपूर्वक जकात वसुली मनपा यंत्रणेकडे ठेवली. जकात वसुलीबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवूनही ती न देता न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आदी आरोप आर्मेचरवाला यांनी केले आहेत.

विवाहितेची आत्महत्या
चाकण, ३ मे / वार्ताहर

घरात तुळईला गळफास लावून दावडी (ता. खेड) येथे एका तीस वर्षे वयाच्या विवाहितेने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बाबतची माहिती अशी, की चाकणपासून जवळच असलेल्या दावडी (ता. खेड) येथील सारिका देशमुख (वय ३० वर्षे) या विवाहितेने घरात कोणी नसल्याची संधी साधून घरातील तुळईला गळफास लावून आत्महत्या केली. सारिकाचा भाऊ शांताराम सोंडेकर यांनी हा प्रकार संपत्तीवरून झाला असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. खून केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मंदाकिनी भोर यांचे निधन
नवी मुंबई, ३ मे/प्रतिनिधी

पत्रकार विजय प्रभाकर भोर यांच्या मातोश्री मंदाकिनी प्रभाकर भोर यांचे दीर्घ आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ५० वर्षांंच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. ‘लोकसत्ता’चे नवी मुंबई वार्ताहर विजय भोर यांच्या मातोश्री मंदाकिनी या गेल्या दोन वर्षांंपासून कर्करोगाने आजारी होत्या. रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास तुर्भे येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील वडगावसहाने येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तुर्भे येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, नवी मुंबई महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश वैती आणि नवी मुंबईतील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.