Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

क्रीडा

चेन्नईकडून पराभवाची परतफेड
दिल्लीवर १८ धावांनी मात

जोहान्सबर्ग, ३ मे / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आज या पराभवाची परतफेड चेन्नईने केली. शादाब जकातीने २४ धावांत घेतलेले ४ बळी व त्याला त्यागी (१८-२), मुरलीधरन (२२-१), मॉर्केल (३२-१) यांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे चेन्नईने दिल्लीला १८ धावांनी पराभूत केले. या विजयासह चेन्नईने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

‘पंक्चर’ बंगलोरला मिळाला ‘जॅक’चा आधार
मुंबईची सहाव्या स्थानावर घसरण
उथप्पासह अभेद्य शतकी भागीदारी

जोहान्सबर्ग, ३ मे / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला पराभूत करून गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर विराजमान होण्याची मुंबई इंडियन्सचे स्वप्न आज भंगले. एवढेच नव्हे तर बंगलोरच्या संघाने मुंबईला ९ विकेट्सनी पराभूत करून आठ गुणांसह गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सने ठेवलेले १५०धावांचे आव्हान पेलताना जॅक कॅलिस (६९) व रॉबिन उथप्पा (६६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १२६ धावांची नाबाद भागीदारी करीत बंगलोरचा विजय सहजसोपा केला.

कोलकाताचे जितबो नाहीच!
पंजाब किंग्ज इलेव्हनकडून पराभव

पोर्ट एलिझाबेथ, ३ मे, वृत्तसंस्था

महेला जयवर्धने आणि इरफान पठाण यांच्या झुंजार भागीदारीमुळे किंग्ज पंजाब इलेव्हन संघाने आज येथे झालेल्या रोमहर्षक लढतीत सहा गडी राखून विजय मिळविला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेली प्रयत्नांची शिकस्त जयवर्धने- इरफान या जोडीने मोडून काढली. ४१ चेंडूत ५२ धावा करुन किंग्ज पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महेला जयवर्धने याला सामन्याचा मानकरी घोषित करण्यात आले.

चेन्नई विजयाची हॅट्ट्रिक साकारेल ?
चेन्नई सुपर किंग्ज वि. डेक्कन चार्जर्स आज झुंज

इस्ट लंडन, ३ मे/ पीटीआय

गेल्या वर्षी गुणतालिकेत तळाला असलेल्या डेक्कन चार्जर्सच्या संघाने या हंगामाच्या सुरुवातीला चार पैकी चार सामने सामने जिंकून सर्वांनाच धक्का दिला असला तरी गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने उद्याच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्यांना विजय मिळवावाच लागेल, नाहीतर त्यांना अव्वल स्थान गमवावे लागेल. तर दुसरीकडे हंगामाच्या सुरुवातीला चांगल्या फॉर्मात नसलेला धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ गेले दोन सामने जिंकून ऐन भरात आलेला आहे. या सामन्याचा निकाल चेन्नईच्या बाजूने लागला तर त्यांची विजयाची हॅट्ट्रिक होईल डेक्कन चार्जर्सची मात्र पराभवाची हॅट्ट्रिक होईल.

धोनी म्हणतो
माझी फलंदाजी सुमार

जोहान्सबर्ग, ३ मे/ पीटीआय
गेले दोन सामने जिंकून चेन्नई सुपर किंग्जने दमदार पुनरागमन केलेले असले तरी धोबीपछाड देऊन गोलंदाजांची भंबेरी उडविणारा कर्णधार महेंद्र सिंग धोनी अजुनही फ्लॉपच ठरतोय. धोनीनेही ही गोष्ट मान्य केली असून यंदाच्या आयपीएलमध्ये माझ्या फलंदाजीला ग्रहण लागलेले दिसत असून ती कीव करण्याजोगीच आहे, असे त्याने म्हटले आहे. गेले दोन सामने जिंकून चेन्नईचा संघाला पुढे नेण्याचे काम धोनी उत्तमरीत्या करीत असला तरी त्याची फलंदाजी मात्र लौकिकाला साजेशी झालेली नाही.

वॉर्नरची ‘वॉर्निग’; दिल्लीपुढे सलामीचा पेच
जोहान्सबर्ग, ३ मे/वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याने इंडियन प्रीमियर लीगमधील पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघापुढे सलामीला कोणाला पाठवायचे असा पेच निर्माण झाला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात वॉर्नर याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत झुंजार अर्धशतक झळकावले. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग हा जखमी असल्याने शनिवारच्या लढतीत खेळू शकला नाही.

भारतीय हॉकीपटूंची शैली योग्यच - ब्रासा
नवी दिल्ली, ३ मे / पीटीआय

भारतीय हॉकीपटूंचा खेळ चांगलाच असून त्यांच्या सध्याच्या शैलीत कुठल्याही बदलाची गरज नसल्याचे स्पष्ट मत नवनियुक्त प्रशिक्षक जोस ब्रासा यांनी व्यक्त केले आहे. या नव्या पदाचा भार स्वीकारल्यानंतर लगेचच ब्रासा यांनी भारतीय हॉकीपटूंना बदलाची ग्वाही देत ब्लू प्रिंट तयार केली आहे. खेळाडूंची शैली, त्यांची क्षमता तसेच पारंपरिक खेळ चांगला असल्याचे ब्रासा यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेटलिफ्टर्सच्या यादीतून पुजारी, रेणुबाला यांच्यासह चार खेळाडूंना डच्चू
नवी दिल्ली, ३ मे / पीटीआय

२०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी निवडण्यात आलेल्या संभाव्य वेटलिफ्टर्समधून शैलजा पुजारी व रेणुबाला चानू, एस. यामिनी व सृष्टी सिंग यांना वगळण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ६० प्रमुख वेटलिफ्टर्समध्ये उपरोक्त खेळाडूंना स्थान देण्यात येणार नाही. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर फेब्रुवारीत सुरू झाले असून या चारही खेळाडू पतियाळा येथे सुरू असलेल्या या शिबिरासाठी दिलेल्या वेळेत उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे.

मुंबईच्या सागर शहाकडून ग्रॅण्डमास्टर लॅडिमिर पराभूत
मुंबई महापौर चषक बुद्धिबळ

मुंबई, ३ मे/क्री.प्र.

दुसऱ्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुंबईच्या पोदार महाविद्यालयाच्या सागर शहाने (एलो २२७१) तिसऱ्या फेरीत तिसऱ्या मानांकित रशियाच्या ग्रॅण्डमास्टर बेलोव्ह लॅडिमिरचा पराभव केला. तसेच केरळच्या ओ. टी. अनिलकुमारने (एलो २७२३) कझगिस्तानचा ग्रॅण्डमास्टर कोस्टेन्को पेट्र (एलो २४९०) याला हरविले. ही ११ फेऱ्यांची भारतामधील सर्वात मोठय़ा बक्षिस रकमेची (एकूण रु. १२ लाख) स्पर्धा मालाड (प.) येथील गोरेगाव स्पोर्टस् क्लब येथे चालू आहे. स्पर्धा व्हिनस बुद्धिबळ अ‍ॅकेडमीने आयोजित केली असून मुंबई बुद्धिबळ संघटना तिचे संचलन करीत आहे.

कल्पेश कोळी क्रिकेट : हेगडे , जैसवाल यांची शतके
मुंबई, ३ मे/क्री.प्र.
न्यू हिंद स्पोर्टिग क्लब आयोजित आणि शिवाजी पार्क यंगस्टर क्रिकेट क्लब, आय.डी.बी.आय. बँक पुरस्कृत १९ व्या कल्पेश कोळी स्पर्धेच्या साखळीतील पहिल्या सामन्यात वाशी केंद्राने शिवाजी पार्क केंद्राविरुद्ध आणि चिंचणी केंद्राने विरार केंद्राविरुद्ध निर्णायक विजय मिळवला. सागर हेगडे, गोरेगाव केंद्र आणि शिवप्रकाश जैसवाल वांद्रे केंद्र हे शतकवीर ठरले.

पुलह दांडेकर, सोहम म्हात्रे अजिंक्य
मुंबई, ३ मे/क्री.प्र.
पुलह दांडेकर (यशवंत साळवी जलतरण तलाव) आणि सोहम म्हात्रेने (डॉल्फिन क्लब) २५ गुणांसह, आर्क ऑफ एन जलतरण तलाव आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ज्युनियर गटाच्या ठाणे जिल्हा निवड चाचणी जलतरण स्पर्धेत मुलांच्या दुसऱ्या गटाचे वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले.

एटीपी टेनिस स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात
नवी दिल्ली, ३ मे/पीटीआय

पायाच्या दुखापतीमुळे प्रकाश अमृतराजला उपांत्य सामन्यातून माघार घ्यावी लागल्याने एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताचे उरले-सुरले आव्हानही संपुष्टात आले आहे. उपांत्य सामन्यात जर्मनीच्या सातव्या मानांकित बेंजामिन बेकरविरुद्धचा सामन्यात प्रकाश अमृतराज १-६, २-४ अशा पिछाडीवर होता. पण त्यानंतर पायाचे दुखणे असह्य़ झाल्याने त्याला हा सामना अर्धवट सोडाव लागला.

परदेशी प्रशिक्षकाची गरज नाही- आझम
भोपाळ, ३ मे/पीटीआय

भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपद भारतीय व्यक्तीकडेच सोपवायला हवे, अशा शब्दांत भोपाळ हॉकी संघटनेचे अध्यक्ष गुरफान ए. आझम यांनी नवनियुक्त प्रशिक्षक जोस ब्रासा यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. क्रीडा मंत्रालयाने ब्रासा यांची नुकतीच भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आझम यांच्या टीकेने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एखादे मूल त्याच्या पालकांच्या देखरेखीखालीच मोठे होत असते. त्याला परक्याच्या मार्गदर्शनाची गरज नसते. त्याचप्रमाणे भारतीय हॉकीला चांगले दिवस आणण्यासाठी परकियांच्या मार्गदर्शनाची गरज नसल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय खेळ असूनही आम्हाला हॉकीसाठी परदेशी प्रशिक्षक नेमावा लागतो, ही खेदजनक बाब असल्याचे आझम म्हणाले.

बिपिन आंतर केंद्र फुटबॉल स्पर्धा ८ व ९ मे रोजी
साखळी व बाद पद्धतीने स्पर्धा होणार
मुंबई, ३ मे/क्री.प्र.

बिपिन आंतर केंद्र फुटबॉल स्पर्धा ८ व ९ मे रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून आझाद मैदान येथील मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या मैदानावर होणार आहे. बोरिवली, भांडुप, नायगाव-वसई, अंधेरी, चर्चगेट व कल्याण अशा सहा केंद्रांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून विजेत्यांना चषक व आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात येईल. बिपिन स्मृती असोसिएशनतर्फे गेले दोन तप दिवाळी व उन्हाळी सुट्टय़ांमध्ये १६ वर्षांखालील मुला-मुलींसाठी फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरातील मुलांसाठी त्यानंतर फुटबॉल स्पर्धाही घेतली जाते. मुलांबरोबरच मुलींचीही स्पर्धा होणार असून बिपिन पूर्व वि. बिपिन पश्चिम अशा दोन संघांमध्ये लढत होईल.
साखळी व बाद पद्धतीने ही स्पर्धा होणार असून प्रत्येक संघातील सर्वोत्तम खेळाडूची निवड माजी ऑलिम्पियन एस. एस. नारायणन, माजी राज्य खेळाडू कल्याणी मित्रा व भारताच्या ज्युनियर संघाचे माजी खेळाडू रत्नाकर शेट्टी करणार आहेत.