Leading International Marathi News Daily
सोमवार , ४ मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

‘पंक्चर’ बंगलोरला मिळाला ‘जॅक’चा आधार
मुंबईची सहाव्या स्थानावर घसरण
उथप्पासह अभेद्य शतकी भागीदारी
जोहान्सबर्ग, ३ मे / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला पराभूत

 

करून गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर विराजमान होण्याची मुंबई इंडियन्सचे स्वप्न आज भंगले. एवढेच नव्हे तर बंगलोरच्या संघाने मुंबईला ९ विकेट्सनी पराभूत करून आठ गुणांसह गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सने ठेवलेले १५०धावांचे आव्हान पेलताना जॅक कॅलिस (६९) व रॉबिन उथप्पा (६६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १२६ धावांची नाबाद भागीदारी करीत बंगलोरचा विजय सहजसोपा केला. जॅक कॅलिसलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब मिळाला. अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली बंगलोरने मिळविलेला हा सलग दुसरा विजय ठरला.
आजचा दिवस मुंबई इंडियन्सचा नव्हता. नाणेफेकीचा कौल वगळता सर्वकाही मुंबईच्या विरुद्धच घडले. प्रथम फलंदाजीत त्यांना अपेक्षित सुरुवात करता आली नाही. जयसूर्याने ५२ धावांची खेळी केली खरी पण १५ व्या षटकापर्यंत मुंबईचे धावांचे शतकही धावफलकावर लागले नव्हते. डिलन प्रीझने ३२ धावांत तीन बळी घेत मुंबईला योग्यवेळी हादरे दिले. तरीही ब्राव्होच्या ४० चेंडूंतील ५० धावा व अभिषेक नायरची झुंजार २९ धावा यामुळे मुंबईने १४९ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सामना वाचविण्याची आशा मुंबईला वाटत होती. सलामीवीर वासिम जाफरला (७) झटपट माघारी धाडल्यानंतर मुंबईचा आत्मविश्वास दुणावला, मात्र जॅक कॅलिस व उथप्पा यांनी फारशी संधी न देता बंगलोरला विजयपथावर नेले. मुंबईचे खराब क्षेत्ररक्षण व बोथट गोलंदाजी हीदेखील बंगलोरच्या पथ्यावर पडली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स ४ बाद १४९ (जयसूर्या ५२, ब्राव्हो ५०, नायर २९, प्रीझ ३२-३) पराभूत वि. बंगलोर रॉयस चॅलेंजर्स १ बाद १५० (कॅलिस नाबाद ६९, उथप्पा नाबाद ६६).