Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

व्यक्तिवेध

नाव : अरविंद दाते, व्यवसाय : टेक्स्टाइल इंजिनिअर, आवड : गायन, वय : पंच्याहत्तर. एखाद्या व्यक्तीचा एवढा परिचय पुरेसा नसतो. पण ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ किंवा ‘शुक्रतारा मंदवारा’, किंवा ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ किंवा ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, अशा फक्त गाण्यांच्या ओळी आठवल्या तरीही हे नाव सहजपणे तोंडी येते. मूळ नाव अरविंद दाते, पण भावगीतांच्या दुनियेतील पदार्पणात नजरचुकीने झालेले नामकरण पुढे आयुष्यभर खऱ्या नोंदीत नावापेक्षा सर्वार्थाने जास्त मोठे झाले. संगीताच्या दुनियेत या नावाला स्वत:चा एक ठसा मिळाला आणि तो जगभरातल्या मराठी माणसांच्या मनात कोरला गेला. अरुण दाते यांची

 

पंच्याहत्तरी ही केवळ वयापुरतीच मर्यादित आहे. कारण त्यांचे गाणे आजही तेवढेच तरुण, ताजेतवाने आहे, जेवढे ते १९६३ सालच्या पहिल्या ‘शुक्र तारा मंद वारा’ या ध्वनिमुद्रणाच्या वेळी होते. दातेंना संगीताचा वारसा मिळाला तो त्यांच्या वडिलांकडून. म्हणजे इंदौरच्या रामूभैया दाते यांच्याकडून. रसिकाग्रणी असे हे व्यक्तिमत्त्व. कलावंतांवर पोटच्या मुलांप्रमाणे, कधीकधी त्याहूनही जास्त प्रेम आणि माया करणाऱ्या रामूभैयांनी कलावंतांच्या माध्यमातून संगीतकलेवर एवढे प्रेम केले, की त्या प्रेमाचीच एक सुरेख दंतकथा बनून गेली. घरात कलावंतांचे सतत येणे-जाणे. सारे घरच स्वरांनी सदा बहरलेले! बेगम अख्तरपासून कुमार गंधर्वापर्यंत त्या काळच्या सगळय़ा दिग्गज कलावंतांचे हक्काचे घर म्हणजे रामूभैया दाते यांचे निवासस्थान! अरुण दातेंच्या लहानपणापासून कानावर जे पडत होते, ते सारे दिव्यत्वाची प्रचीती देणारे. कलेच्या प्रांतात रामूभैयांची दाद मिळविण्याची धडपड करणारे अनेक जाने-माने कलावंत अरुण दातेंच्या घरात सहजपणे गाणे करत असत. एखाद्या स्वरशत्रूलाही अभिजात गायनाची गोडी लागावी, असे हे वातावरण स्वरांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या अरुण आणि त्यांचे बंधू रवि यांना लाभल, हे त्यांचे भाग्य! आपला मुलगा गातो हे रामूभैयांना कळले ते कुमारजींकडून. कुमारजींनी शिकवलेली एक गझल अरुण दाते यांनी पहिल्यांदा गायली तेव्हा पहिले श्रोते होते पु. ल. देशपांडे. कलावंत म्हणून जन्माला येणाऱ्या कुणाच्याच वाटय़ाला असे योग आल्याचे ऐकिवात नाही. आकाशवाणीवरून हिंदी गझल गाणारे ‘ए. आर. दाते’ श्रोत्यांना माहीत होते. इंदौरला रामराम करून मुंबईच्या व्हीजेटीआयमध्ये आल्यानंतरही ए. आर. दाते यांचे गाणे सुरूच होते. तेव्हा के. महावीर यांच्याकडे गायनाचे शिक्षण सुरू झाले. त्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये उच्चपदावर स्थानापन्न होत असतानाही त्यांनी आपला गळा मात्र नेहमी गाता ठेवला. रेडिओवर त्यांचे गाणे ऐकून खूश झालेले श्रीनिवास खळे यांनी त्यांच्याकडून पहिले मराठी गीत गाऊन घेतले. ते होते ‘शुक्र तारा मंद वारा’. लहानपणापासून ‘अरुभैया’ असे खास इंदौरी नाव धारण केलेल्या दातेंचे नाव ध्वनिमुद्रिकेवर छापण्याच्या वेळी खळेंनी अरुण असे नाव सांगितले आणि तेव्हापासून सारा महाराष्ट्र त्यांना त्याच नावाने ओळखतो आहे. पदार्पणातच लोकप्रियतेच्या शिखरावर जाण्याचे भाग्य फार थोडय़ा कलावंतांना मिळते. असे भाग्य मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी त्याहूनही अवघड. दातेंनी ती आजवर पेलली आणि आपल्या आवाजाला खास व्यक्तिमत्त्व मिळवून दिले. आवाज तलत महमूदच्या आवाजाशी साधम्र्य सांगणारा. पण त्यातील मराठीपणा अगदी अस्सल! मराठीतील नामवंत कवींच्या कविता आणि ग्रेट संगीतकारांच्या रचना त्यांच्या वाटय़ाला आल्या. त्या सगळय़ा कविता आणि संगीतरचनांचे त्यांनी सोने केले आणि मराठी भावगीतांच्या दालनात स्वत:चे स्थान पक्के केले. त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता त्यांच्या ध्वनिफितींच्या विक्रमी खपांनी अधोरेखित झाली आहे. ‘शुक्र तारा’ या त्यांच्या कार्यक्रमाचे सुमारे दोन हजार प्रयोग झाले, यावरूनही रसिकांच्या मनातले त्यांचे स्थान लक्षात येते. ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘अखेरचे येतील माझ्या’, ‘सखी शेजारिणी’ अशी कितीतरी गाणी त्यांची सतत आठवण करून देणारी आहेत. अमृतमहोत्सवी वर्षांतही आपला आवाज तसाच जपणाऱ्या अरुण दाते यांचे मन:पूर्वक अभीष्टचिंतन!