Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

साऱ्या ‘इझम’च्या पलीकडचे नाते!
न.मा. जोशी

यवतमाळ आणि प्राचार्य राम शेवाळकर यांचे ऋणानुबंध अतुट आणि अविट आहेत. कारण, शेवाळकरांच्या ‘करिअर’ची सुरुवातच मुळी यवतमाळात झाली आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी यवतमाळच्या मातीशी असलेले ऋणानुबंध जोपासले. त्यामुळे त्यांच्या हृद्य आठवणींचा प्रचंड ग्रंथ निर्माण होऊ शकेल एवढय़ा आठवणी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्मठ शिक्षण महर्षी दिवंगत प्राचार्य बाबाजी दाते यांनी यवतमाळात सुरू केलेल्या वाणिज्य महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून शेवाळकरांनी त्यांचे ‘करिअर’ सुरू केले होते. यवतमाळातून वणीला लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळून त्यांनी विदर्भ-महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात लीलया संचार करीत असतानाही यवतमाळशी असलेली नाळ घट्ट केली.

माझी जिव्हायात्रा
प्रा. राम शेवाळकर यांच्या ‘पाणीयावरी मकरी’ या आत्मचरित्रातून संक्षिप्त केलेला लेख. केव्हातरी पहिले व्याखान दिले, आज त्याला चार तपे झाली. वडिलांकडून आलेला सभाधीटपणा नि वाणीचा हा वारसा वापरून पाहण्याचा पहिला जाहीर प्रयत्न मला वाटते वाशीमला केला. त्यात चांगलीच दमछाक झाली पण, पुढे आत्मविश्वास वाढत गेला. जे जाणवले, जे स्फुरले, जे सुचले वा वाचलेले जे आवडले ते सांगण्याचा मोह होऊ लागला. आस्वाद घेतानाच आपला आनंदानुभव सगळा श्रोत्यांसमोर साकार करण्याच्या धडपडीतून माझ्या वक्तृत्वाला आकार येत गेला.

कुणाला न दिसणारी आसवे गळाली..
अजय देशपांडे

प्राचार्य राम शेवाळकरांच्या निधनामुळे वणीच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींचा ऊर्जास्रोत कायमचा हिरावला गेला आहे. प्राचार्य शेवाळकरांच्या निधनामुळे वणीकरांना धक्का बसला. आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या वणीतील चहात्यांनी नागपूरकडे धाव घेतली. १ ऑगस्ट १९६५ रोजी प्राचार्य शेवाळकर वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रुजू झाले तेव्हापासून आजतागायत वणीच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक जीवनाशी त्यांचे ऋणानुबंध होते. १९६५ ते १९८८ या तेवीस वर्षांच्या काळात प्राचार्य शेवाळकरांच्या पुढाकाराने वणीचे सांस्कृतिक, साहित्यिक जीवन एवढे समृद्ध झाले की, या गावाला ‘विदर्भाचे पुणे’ अशा शब्दात महाराष्ट्र संबोधू लागला.

शब्दांची सलगी
मी शालेय विद्यार्थी असताना ‘प्रकाश’ नावाचे एक हस्तलिखित मासिक चालवत असे. ते बहुधा एकहाती व एकटाकीच असे. मी त्यावेळेला वाचनाची आवड असणाऱ्या उदयोन्मुखांची एक वाङ्मयसंस्थाही चालवत असे. जोडीला एक बाल-वाचनालयही असे. त्यावेळी ‘उंबराचे फूल’ हा माझा पहिला लेख ‘मुलांचे मासिक’ मध्ये छापून आला होता. ‘विकास’ नावाचे एक चांगले साप्ताहिक पौंगडावस्थेतील मुलांच्या मनोविकासासाठी त्यावेळी नागपूरहून चालवले जात असे. त्यातही माझे काही लेखन प्रकाशित झाले आहे.

दर्यापुरात धरणग्रस्त कृती समिती
दर्यापूर, ३ मे / वार्ताहर

बहुलघुपाटबंधारे योजनेंतर्गत होणाऱ्या धरणासंदर्भात न्याय मिळवण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी धरणग्रस्त कृती समिती स्थापन केली आहे. अरुण गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी सांगळुद, सामदा, कासमपूर व बाभळी गावातील १००-१५० शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत अरुण गावंडे, उस्मान पटेल, गोपाल अग्रवाल, डॉ. अभय गावंडे, राजकुमार गवई, विठ्ठलराव गावंडे, प्रदीप ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धरणग्रस्त कृती समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अभय गावंडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गोपाल अग्रवाल, सचिव प्रमोद ठाकूर, सहसचिव विठ्ठल परसराम नवलकार, सदस्य मधुकर गावंडे सुरेश काळे, उस्मान पटेल, विठ्ठल गावंडे, सोपान नवलकार, अनंत तराळ, दीपक रायबोले, सुभाष गावंडे, सुधीर गावंडे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. या बैठकीस गजानन गावंडे, गणेश गावंडे, राजेंद्र गावंडे, सारंग गावंडे, पांडुरंग चव्हाण, अरुण नवलकार, उमेश रायबोले, किशोर गावंडे, श्रीपंत आठवले, विनोद गावंडे, मनोहर गावंडे, ज्ञानेश्वर पवार, उमेश काळे, अजाब दुधंडे, वासुदेव गावंडे, बंडू कोडापे, सदाशिव गावंडे, अनिल गावंडे उपस्थित होते.

‘व्होकेशनल टिचर्स असोसिएशन’ची आमसभा
वर्धा, ३ मे / प्रतिनिधी

शिक्षक मतदारांच्या जोरावर मोठे होणारे नेते याच शिक्षकांबाबत अन्यायकारक भूमिका घेत असल्याने अशा नेत्यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असा इशारा व्यावसायिक शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. ‘एमसीव्हीसी’ शिक्षकांच्या ‘व्होकेशनल टिचर्स असोसिएशन’ या संघटनेची आमसभा बोरगावच्या मेघे क निष्ठ महाविद्यालयात नुकतीच झाली. या आमसभेत शिक्षक नेत्यांनी व्यावसायिक शाखेच्या शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत पोटतिडकीने मते मांडली. संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. युगलू रामलू यांनी शिक्षक नेत्यांच्या दुटप्पी वागणुकीवर कोरडे ओढले. शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षकांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने संघटित बळावरच हे प्रश्न आता सोडवावे लागतील, असे मत प्रा. संदीप रेवतकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. गुणवंत मानमोडे, प्रा. सतीश काळे, सी.जी. भोजवाणी, संजय विसपुते व प्रा. राजीव डहाके यांनीही मते मांडली. संचालन प्रा. सतीश काळे यांनी केले तर प्रा. मनीष देशमुख यांनी आभार मानले.या आमसभेत वर्धा जिल्ह्य़ाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष - दिनेश लकडे , सचिव - गुणवंत मानमोडे (आष्टी), सदस्य-संजय बुले (आर्वी), अविनाश काळे (गिरोली), शशिकांत डेहनकर (वर्धा), दीपक वालदे (समुद्रपूर), राजीव डहाके (वर्धा), संजय गांडोळे (तळेगाव) व मेघा जवदंड यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

ओबीसी सेवा संघाची खुबाळ्यात सभा
सावनेर, ३ मे / वार्ताहर

ओबीसी सेवा संघाची महत्त्वपूर्ण सभा जिल्हाध्यक्ष दिनेश शिरभाते यांच्या उपस्थित सावनेर तालुक्यातील खुबाळाच्या समाजभवनात पार पडली. यावेळी प्रा. महेंद्र धावडे यांनी मार्गदर्शन केले. याच बैठकीत योगेश ठाकरे यांची ओबीसी सेवा संघाच्या सावनेर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष दिनेश शिरभाते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. गजानन लांडगे, प्रकाश चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, चंद्रकांत खेडकर, संजय कातोडे, जगन ठाकरे, योगेश ठवकर, सुधीर मस्के, मोरेश्वर ठाकरे, रूपेश खुबलकर, योगेश उईके, धर्मराव आहाके, बाजन घाटे आदी उपस्थित होते.

कामठीत वाहतुकीची कोंडी
कामठी, ३ मे / वार्ताहर

येथील बसस्थानक चौकात अवैध प्रवासी वाहतूकदार भररस्त्यावर वाहने उभी करून अपघाताला आमंत्रण देत आहेत. अवैध वाहनांमुळे चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. हा सर्व प्रकार या चौकात उपस्थित असणाऱ्या वाहतूक शिपायांच्या नजरेसमोर घडतो; परंतु वाहतूक शिपाई याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे प्रवाशांना अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कोणीही खाजगी वाहन उभे करून प्रवासी वाहतूक करू नये, असा नियम असताना देखील या आदेशाला केराची टोपली दाखवून येथील सहा आसनी ऑटो खाजगी जीप गाडय़ांमार्फत प्रवाशी वाहतूक केली जाते. काही दिवसांपूर्वी नागपूर-कामठी मार्गावर धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी ऑटोचा अपघात होऊन आठ प्रवाशांना प्राणास मुकावे लागले होते. तरी सुद्धा वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या प्रकारामुळे एसटी महामंडळ सुद्धा लाखो रुपयाने तोटय़ात आहे. याबाबत बसस्थानक व्यवस्थापकांनी अनेकदा पोलिसात तक्रार देऊन त्यावर काहीच कारवाई झाली नाही.

निखिल शेंडे यांना समाजसेवक पुरस्कार
भंडारा, ३ मे / वार्ताहर

महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकार मित्र व समाजसेवक पुरस्कार लाखांदूर येथील निखील शेंडे यांना जाहीर झाला आहे. शेंडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय ज्येष्ठ समाजसेवक विजय मेश्राम यांना दिले आहे.या निवडीबद्दल अन्याय-भ्रष्टाचार निवारण समितीचे विदर्भ अध्यक्ष शेखर पाटील, नरेंद्र नागदेवे, महिला जिल्हाध्यक्ष निरू पेंदाम, जयगोपाल लांडगे,आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.