Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

विशेष लेख

आनंदयात्री!

प्राचार्य राम शेवाळकर हा आमचा मित्र एक विदग्ध वृत्तीचा माणूस होता. आमचा गेल्या तीन तपांचा स्नेह होता. राम शेवाळकर नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये १९५७ मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या निवडीसाठी कॉलेजने जी निवड समिती नेमली होती, त्या समितीचे नरहर कुरुंदकर हे एक सदस्य होते. नरहर कुरुंदकर या सुमारास नांदेडच्या प्रतिभा निकेतन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करीत होते. त्यांच्याकडे साधी बी.ए.ची पदवीही तेव्हा नव्हती. परंतु व्यासंग, विद्वत्ता, पुरोगामित्व, परखडपणा या कुरुंदकरांच्या ठिकाणी वसलेल्या गुणवैशिष्टय़ांमुळे ते अवघ्या नांदेडकरांच्या गळ्यातले ताईत झालेले होते. शेवाळकरांच्या रूपानं खरं म्हणजे एक प्रतिस्पर्धी नांदेडला आला होता. स्वत: कुरुंदकरांनीच त्यांची आवर्जून निवड केली होती; परंतु शेवाळकर त्यांनाही समजायच्या आत कुरुंदकरांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभराचे प्रेमी झाले. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाला कुरुंदकरांनी पुढील शब्दांत दाद दिली होता ‘आधी निर्माण झालेले लोकप्रियतेचे सर्व उच्चांक शेवाळकरांनी मोडून टाकले.’
नरहर कुरुंदकर व राम शेवाळकर दोघेही पट्टीचे वक्ते. खरं म्हणजे एका म्यानात या दोन

 

तलवारी एकत्रित आल्या व आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही तलवारी नुसत्याच गुण्यागोविंदाने नांदत नव्हत्या तर जिवाभावाचे नाते जोपासत होत्या. राम शेवाळकर नांदेडला आले, त्या सुमारास ‘छंद’मधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. माझीही कविता ‘छंद’मध्ये प्रसिद्ध झाली होती. आपला एक समन्वयक कविमित्र नांदेडला रुजू झाल्याचे समजताच त्या सुमारास नांदेडला ज्या वेळी मी गेलो तेव्हा त्यांना त्यांच्या घरीच जाऊन भेटलो.
‘शेवाळकर हा मस्त कलंदर व्यक्तिमत्वाचा माणूस आहे व दिसायला खडबडीत असला तरी मिठ्ठास वाणीचा कवी आहे.’ असं त्यांचं वर्णन कुरुंदकरांनी केलेलं होतं. मी घरी जाताच, माझं नाव सांगितलं व रामभाऊंनी उराउरी भेटूनच स्वागत केलं. शेवाळकरांची ‘हो म्हटले तू आणि मिळाले लाख नभाचे मजला आंदण, आता त्रलोक्याने यावे- दीनपणे मज मागाया ऋण’ ही कविता ‘छंद’च्या जाने.-फेब्रु. १९५७ च्या अंकात आली होती.
काळ्या-सावळ्या रंगाचे, बुटक्या बांध्याचे, भव्य कपाळ व पाणीदार डोळ्यांचे शेवाळकर मलाही खूप आवडले. शेवाळकरांचा बोलघेवडा स्वभाव व अगत्यशीलता यांनी मी भारावून गेलो. एक नवा स्नेहसंबंध जुळला व उत्तरोत्तर तो अधिकच घनिष्ठ होत गेला. ‘रंज की जब गुफ्तगू होने लगी ,आपसे तुम, तुमसे तू होने लगी’ हे स्थित्यंतर केव्हा घडले हे समजलेदेखील नाही.
राम शेवाळकरांच्या वक्तृत्वाचे किस्से कानावर येऊ लागले. त्यांना पहिल्यांदा ऐकण्याचा योगही औरंगाबादमध्येच आला. तेथील मंडळींनी शेवाळकरांना ‘महाभारता’वर व्याख्यानासाठी बोलावलं. तेव्हाचे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. वा. ल. कुलकर्णी, अनंतराव भालेराव, सुधीर रसाळ, चंद्रकांत भालेराव, स्वत: मी श्रोतृवंृदात होतो. राम शेवाळकरांवर प्रारंभी थोडंसं दडपण जाणवत होतं; परंतु ते व्याख्यानाच्या विषयात शिरले व त्यांची वाणी धो धो करत बरसायला लागली. ‘महाभारता’चं त्यांचं म्हणून जे आकलन होतं ते अत्यंत मुद्देसूदपणे व प्रत्ययकारी शैलीत त्यांनी मांडलं होतं. त्या व्याख्यानात अनेकदा आलेला ‘अकुतोऽभय’ हा शब्द पुढेही कित्येक वर्षे आमच्या स्मरणात राहिला.
शेवाळकरांचं औरंगाबादमधील महिला महाविद्यालयात एका भरदुपारी झालेलं व्याख्यान ऐकायचा योग मला आला. शेवाळकर हलकंफुलकं काहीतरी बोलतील असा माझा अंदाज होता. प्रत्यक्षात शेवाळकरांनी ‘विद्यार्थीवर्गाची आजच्या शिक्षणासंबंधी अनास्था’ असा गंभीर विषय घेऊन ‘प्राध्यापकांचं वर्गातील अध्यापन विद्यार्थ्यांना कालबाह्य वाटत आहे व या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून शिकण्यासारखं काही आढळत नसल्यामुळे प्राध्यापकांचं वर्गातलं व पर्यायाने महाव्यिालयातलं अस्तित्त्व हे अनावश्यक झालेलं आहे’ असा प्राध्यापकांना अंतर्मुख करायला लावणारा विचार त्यांनी गंभीरपणे मांडला होता. शेवाळकर मोठय़ा तळमळीने बोलले होते. शिक्षकी पेशाविषयीची त्यांची बांधिलकीही मी त्यावेळी अनुभवली होती.
आमचे मित्र नरहर कुरुंदकर जबरदस्त वक्ते होते. त्यांची वाणीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली होती. राम शेवाळकरांच्या वक्तृत्वाचा बाज हरदासी पद्धतीचा होता. त्यांचं घराणं शास्त्र्यांचं होतं. कीर्तनाची परंपरा होती. त्यांचं मूळ शेवाळा हे गाव परभणी जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आहे. माझं गाव डोंगरकडा हेही कळमनुरी तालुक्यातीलच. आम्ही तिघंही मित्र एकाच पंचक्रोशीतले. ऋणानुबंध दृढ होण्यामागे हेही एक कारण होतं. कुरुंदकरांचे वक्तृत्वही प्रवाही होतं शब्दांची किंवा वाक्यार्थाची पुनरावृत्ती करण्याची त्यांनाही सवय होती, परंतु दोघांच्या वक्तृत्वाचा ढंग वेगळा होता. कुरुंदकरांची तर्कशुद्ध मांडणी श्रोत्यांच्या बुद्धीला आव्हान करायची, तर शेवाळकर श्रोत्यांच्या भावनांना हात घालायचे. लोकप्रियता त्यांना अधिक लाभायचं हेही एक कारण असावं. खुद्द कुरुंदकरांनीच हे मान्य केलं होतं.
अनेकदा विचार करताना आता वाटतं की हे आमचे दोन्हीही मित्र आपापल्या परीने श्रेष्ठ होते. अब्दुल करीमखाँसाहेब व बडे गुलाम अली किंवा पं. भीमसेन जोशी व पं. कुमार गंधर्व या श्रेष्ठ गायक कलावंतांची एकमेकांशी तुलना कशी करता येईल ? दोघेही श्रेष्ठच. तसेच कुरुंदकर- शेवाळकर दोघेही श्रेष्ठ वक्ते. एकाच मैफिलीत दोघांनाही ऐकण्याचा प्रसंग येणारच. अशी जुगलबंदी योगायोगानेच ऐकायला मिळणं हे भाग्यच मानलं पाहिजे. कुरुंदकर- शेवाळकर मी एकाच व्यासपीठावर बोलताना ऐकलं आहे, आनंदाचा तो ठेवा, माझी श्रीमंती वाढवून गेला आहे.
राम शेवाळकरांच्या मुलुख मैदानी वक्तृत्वानं त्यांच्यातील कवीवर, साहित्यिकावर काहीसं आक्रमण केलं, हे त्यांच्या अनेक मित्रांप्रमाणं माझंही मत बनलं. मात्र साहित्यिक म्हणूनही त्यांचं पारडं जडच आहे. त्यांच्या नावावर विपुल ग्रंथसंपदा आहे. असोशी, रेघा, अंगारा हे तीन कवितासंग्रह त्रिदल, अग्निमित्र, रुचिभेद, सारस्वताचे झाड, आकाशाचा कोंब, साहित्याचे अक्षरलेणे हे सहा वाङमय समीक्षात्मक ग्रंथ, अमृतझरी, पूर्वेची प्रभा, देवाचे दिवे, उजेडाची झाडे, तारकांचे गाणे, देशविदेश, माहेरयात्रा ही सात ललितगद्याची पुस्तके. शिक्षणयात्रा व मराठी व्याकरण व लेखन ही शिक्षण विषयावरील प्रकाशने चौदा संपादित ग्रंथ असा राम शेवाळकरांचा प्रचंड ग्रंथसंभार आहे. त्यांची व्याख्याने ऐकणारे श्रोते प्रत्यक्ष वाचकांच्या संख्येपेक्षा अधिक आहेत आणि म्हणूनच की काय राम शेवाळकरांच्या साहित्याचा विचार मराठी समीक्षकांनी विशेषत्वाने केलेला नाही.
‘अग्निमित्र’ या त्यांच्या पुस्तकात भास या संस्कृत नाटककाराच्या सर्व नाटय़कृतींचा जसा रसग्रहणात्मक आढावा आहे, तसाच त्या नाटय़कृती भासाच्या कशा आहेत, यासंबंधी संशोधनात्मक विवेचनही आहे. त्यांचं समीक्षात्मक लेखनसुद्धा विद्वज्जड व दुबरेध नाही. संस्कृत व मराठी दोन्ही विषयात एम. ए.च्या दोन स्वतंत्र पदव्या व सुवर्णपदक मिळवणारा आमचा हा मित्र खरोखरच भाषाप्रभू होता. विदर्भात व मराठवाडा या त्यांच्या माहेरता ते जसे लोकप्रिय होते तसेच मुंबई, पुणे व पश्चिम महाराष्ट्रातही लोकप्रिय होते. नरहर कुरुंदकरांचे व माझे ते जसे घनिष्ठ मित्र होते, तेवढेच ते पु. भा. भावे व ग. वा. बेहरे, गंगाधर गाडगीळ व माधवराव गडकरी यांचेही स्नेही होते. अशा स्नेहसंबंधासाठी मन विशाल व अंत:करण प्रेमाद्र्र असावं लागतं. राम शेवाळकरांना निसर्गाने असं विशाल मन दिलेलं होतं. आमचा हा कविमित्र खरं म्हणजे एक आनंदयात्रीच होता!
कुबेर येईल आता दारी
हाती घेऊन झोळी काठी,
परमात्मा होईल भुकेला
माझ्या आशीर्वादासाठी.
राम शेवाळकरांचा हा आशावाद भोळसटपणातून आलेला नव्हता, तो त्यांच्या कर्तृत्वातून निर्माण झाला होता.
(‘शेवाळकर नावाचा माणूस’ या संग्रहातील संपादित भाग.)
प्रा. तु. शं. कुळकर्णी
नांदेड