Leading International Marathi News Daily

सोमवार , ४ मे २००९

विविध

जयललिता बाजी मारण्याची चिन्हे
श्रीकांत ना. कुलकर्णी

लोकसभा निवडणुकीच्या गदारोळात संपूर्ण देशात काही विशिष्ट मुद्यांवर चर्चा होत असताना तामिळनाडूत मात्र लोकसभा निवडणुकीत यावेळी एकच प्रमुख प्रश्न चर्चिला जात आहे तो म्हणजे, ‘स्वतंत्र तामिळी एलम’चा. श्रीलंका सरकारने ‘लिट्टे’ चा बंडखोर नेता प्रभाकरन याला पकडण्यासाठी जे शेवटचे युद्ध सुरू केले आहे. त्यामुळे तेथील हजारो तामिळी नागरिक बेघर झाले आहेत. या निर्वासितांना पाठिंबा देऊन तामिळनाडूतील जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी सध्या विविध राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे. सत्तारूढ द्रमुकचे सर्वेसर्वा व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी श्रीलंकेतील तामिळी जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ एक दिवसाच्या उपोषणाचे नाटक केले तर त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी त्याच्याही पुढे जाऊन स्वतंत्र तामिळ एलमची घोषणाच केली.

नितीशकुमार ‘संपुआ’मध्ये प्रवेश करण्याचे संकेत
शीला दीक्षित यांचा दावा

नवी दिल्ली, ३ मे/ पी. टी. आय.

निवडणुकीनंतर नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दल काँग्रेस आघाडीशी सहकार्य करण्याची शक्यता दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी व्यक्त केली. एका खाजगी दूरचित्रवाहिनीशी त्या बोलत होत्या. नितीश कुमार यांनी काँग्रेसशी हातमिळवणीचे संकेत दिले आहेत, मात्र त्यांनी त्याबद्दल निश्चित काही सांगितले नसल्याचे स्पष्ट करून शीला दीक्षित म्हणाल्या की, निवडणुकीचे निकाल काय लागतात व त्यानुसार त्यांनी कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे, ते ठरविण्यासाठी नितीशकुमार प्रतीक्षेत आहेत.

टीव्हीवर गाणे म्हटल्यामुळे पाकिस्तानी गायिकेची भावांकडून हत्या
लंडन, ३ मे/पी.टी.आय.
टीव्हीवर गायिका म्हणून लोकप्रिय झालेल्या आपल्या बहिणीचा तिच्या दोन भावांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना पेशावरमध्ये नुकतीच घडली आहे. यामुळे मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांकडून महिलांच्या स्वातंत्र्यावर होणाऱ्या आक्रमणाचा मुद्दा भेसूरपणे समोर आला आहे. अयमान उदास नावाच्या या अवघ्या तिशीतल्या गायिकेच्या हत्येमुळे पेशावरमधील सांस्कृतिक वर्तुळाला जबर धक्का बसला असल्याचे ‘संडे टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.

पाकमधील शिखांचे रक्षण करण्यात केंद्राला अपयश
नरेंद्र मोदींची पंतप्रधानांवर टीका

अंबाला (हरयाणा), ३ मे / पी.टी.आय.

पाकिस्तानातील शीख कुटुंबांना तालिबानी दहशतवादी लक्ष्य बनवत असताना त्यांच्या संरक्षणासाठी भारत सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र खेद व्यक्त केला असून यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जबाबदार असल्याची टीका केली आहे. स्वत: शीख असूनही डॉ. मनमोहन सिंग यांनी शीखांच्या संरक्षणासाठी हालचाली केल्या नाहीत, असा आरोप करून मोदी म्हणाले, पाकिस्तानात राहणाऱ्या शीख कुटुंबांना जाझया कर द्यावा लागतो.

भजनलाल म्हणतात, अभी तो मैं जवान हूँ!
नवी दिल्ली, ३ मे/ पी.टी.आय.
हरयाणाच्या राजकारणात उभी हयात घालवून तिसऱ्यांदा खासदारकीची वस्त्रे चढविण्यास सज्ज झालेल्या भजनलाल यांच्या विरोधकांनी ते आता थकले असल्याचा प्रचार चालविला असला, तरी ७८ वर्षीय भजनलाल म्हणतात, ‘निवडणूक जिंकण्याएवढा मी नक्कीच तरुण आहे!’ ‘माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे. मी मुळीच म्हातारा झालो नाही. निवडणूक जिंकून खासदार होण्याइतपत तरुण तर नक्कीच आहे,’ असे भजनलाल यांनी पी.टी.आय.ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

पाकिस्तानी जहाजाचे अपहरण
मोगादिशु, ३ मे / ए.एफ.पी.

पाकिस्तानच्या मालकीच्या एका मालवाहू जहाजाचे अपहरण केल्याचे आज सोमालिया समुद्र चाच्यांकडून सांगण्यात येत असतानाच फ्रान्स आणि सीसेल्स देशांकडून या चाच्यांना पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली असून त्याअंतर्गत १४ जणांना पकडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या मालकीच्या अल-मिसान या मालवाहू जहाजाचे आपण अपहरण केले असल्याचे अहमद अब्दी या स्वयंघोषित कमांडरने सांगितले. साखर, इंधन आदी साहित्य घेऊन जाणाऱ्या दोनपैकी एका जहाजाचे आम्ही अपहरण केले असून ते सोडण्यासाठी बोलणी करण्यास तयार असल्याचे अब्दी याने ‘वृत्तसंस्थेशी’ दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. अपहरण केलेले जहाज ज्या कंपनीचे आहे त्यामध्ये सोमालियातील एका उद्योगपतीचे समभाग असल्याने त्यांनी चाच्यांशी बोलणी सुरू केल्याचे सांगण्यात आले.

युरोपातील देशांमध्ये आढळले ‘स्वाईन फ्लू’चे आणखी रुग्ण
मेक्सिको सिटी, ३ मे /पी.टी.आय.
जगभरासाठी संकट बनलेल्या ‘स्वाईन फ्लू’ या विषाणूचे स्पेन, जर्मनी,ब्रिटन आणि इटली या युरोपातील देशांमध्ये आज आणखी काही रुग्ण आढळले आहेत. स्पेनमध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून कॅनडामधील बाधित रुग्णांची आरोग्य तज्ज्ञांकडून कसून तपासणी केली जात आहे. हाँगकाँगमध्ये या विषाणूने बाधित झालेल्या ३५० नागरिकांना , विषाणूचा आशियातील देशांमध्ये प्रसार होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मेक्सिकोमध्ये आज १९ जणांचा मृत्यू झाला असून अमेरिकेत विषाणूने बाधित असलेले १८ रुग्ण सापडले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. भारतात हैदराबादमध्ये या विषाणूने बाधित असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ती व्यक्ती ‘स्वाईन फ्लू’बाधित झाली नसल्याचा निकाल आला .

इम्रानखानवर लाहोरमध्ये प्रवेशबंदी
लाहोर, ३ मे / पी. टी. आय.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान याच्या तेहरिक ए इन्साफ या पक्षाच्या मेळाव्यांचे आयोजन करण्याचे त्याने घोषित केले असतानाच लाहोरमध्ये प्रवेश करण्यास त्याच्यावर अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. सिंध प्रांतात कराचीमध्ये मेळावा घेण्याचे त्याने आजच घोषित केले खरे परंतु, सिंध सरकारने सिंध प्रांतातही महिन्याभरासाठी त्याच्यावर प्रवेशबंदी जारी केली. इम्रान खान याची उपस्थिती कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू शकेल, या पाश्र्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. कराचीमध्ये ९ मे २००७ रोजी वांशिक हिंसाचार झाला होता. त्यावेळी इम्रान खान याच्यावर पहिल्यांदा प्रवेशबंदी जारी करण्यात आली होती. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचा बालेकिल्ला असलेल्या कराचीमध्ये त्याच्यावर ही बंदी जारी केली होती. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आपण ही बंदी न जुमानता सिंधमध्ये पोहोचू. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या संघटनेविषयी बोलताना ही दहशतवादी संघटना असून तिच्यावर बंदी आणली जावी, अशीही मागणी त्याने यावेळी केली. सिंधमधील सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीवर टीका करताना सत्ताधारी मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटच्या दबावापुढे मान तुकवीत असल्याचे इम्रान खान याने सांगितले.

उच्च पैलूचा लेखक आणि मार्गदर्शक गमावला-राष्ट्रपती
नवी दिल्ली, ३ मे/खास प्रतिनिधी

‘वक्ता दश सहस्त्रेशु’ म्हणून ओळखले जाणारे, प्रा. राम शेवाळकर हे एक चांगले लेखकच नव्हे, तर विदर्भाचा गौरव होते. त्यांनी वाङमयीन जगामध्ये लिखाणाला उच्च कोटीला नेऊन पोहोचविले. त्यांच्या निधनाने असा एक उच्च पैलूचा लेखक आणि मागदर्शक आपण गमावला आहे, असे त्या म्हणाल्या.
साहित्य जगतातील अग्रदूत हरपला-क्रांती शहा
मुंबई/प्रतिनिधी : राम शेवाळकर हे साहित्याच्या जगतातील अग्रदूत आणि धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक होते. साहित्य विश्वातील हा तारा आज हरपला. युवक बिरादरीची त्यांना श्रद्धांजली.
शेवाळकरांच्या निधनाने अतीव दु:ख- डॉ. अरविंद गोडबोले
मुंबई/प्रतिनिधी : प्रा. राम शेवाळकर पु. भा. भावे स्मृती समितीचे अध्यक्ष होते. यंदा पु. भा. भावे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त नागपूर होणाऱ्या कार्यक्रमाचे काम त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या निधनाने पु. भा. भावे स्मृती समितीला अतीव दु:ख होत आहे.