Leading International Marathi News Daily
मंगळवार, ५ मे २००९

चेन्नई नंबर वन
इस्ट लंडन, ४ मे / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर फेकल्या गेलेल्या गतवेळच्या उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आज नवसंजीवनी लाभली. पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेल्या डेक्कन चार्जर्ससारख्या तगडय़ा संघाला नमवून विजयाची हॅट्ट्रिक चेन्नईने साधली आणि गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने केलेल्या १७८ धावांना प्रत्युत्तर देताना डेक्कन चार्जर्सचा संघ कसाबसा १०० धावापर्यंत पोहोचू शकला. महेंद्रसिंग धोनी (नाबाद ५८), मॅथ्यू हेडन (४३), मुरली विजय (३१), रैना (३२) यांनी चेन्नईला १७८ धावांपर्यंत मजल मारून दिली पण हे आव्हान डेक्कनला अजिबात पेलविले नाही. त्यांचे पहिले तीन फलंदाज केवळ एक धाव झालेली असतानाच माघारी परतले व संघावर पराभवाचे ढग जमा झाले. ड्वेन स्मिथने पाच षटकारांसह केलेली ४९ धावांची खेळी वगळता डेक्कनचे फलंदाज निष्प्रभ ठरले. चेन्नईच्या शादाब जकातीने पुन्हा एकदा चमक दाखविताना २२ धावांत ४ बळी घेतले.

नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा
काठमांडू, ४ मे/पीटीआय

नेपाळच्या माओवादी सरकारने हकालपट्टी केलेले लष्करप्रमुख जनरल रुक्मांगद कटवाल यांना त्या पदावर कायम राहाण्याचा आदेश अध्यक्ष रामबरन यादव यांनी दिल्याने त्या देशातील राजकीय मतभेद आणखी विकोपाला गेले. परिणामी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडींमुळे माओवादी बंडखोर पुन्हा उठाव करण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी आज दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. नेपाळमधील लोकशाही व शांतीच्या रक्षणासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नेपाळच्या पंतप्रधानपदी प्रचंड आठ महिन्यांपूर्वीच विराजमान झाले होते.

सात महिन्यांनंतर ‘सेन्सेक्स’ची पुन्हा १२ हजारापुढे मुसंडी
मुंबई, ४ मे/ व्यापार प्रतिनिधी
चार दिवसांच्या लांबलचक सुट्टीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजाराने आज धमाकेदार उसळी घेतली. शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने १२ हजाराची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडून गेल्या सात महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला. शिवाय ऑक्टोबर २००८ पासून प्रथमच दिवसांतील सर्वात मोठी उसळी म्हणजे तब्बल ७३१ अंशांची वाढही नोंदविली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ने १८० अंशांची वाढ नोंदवून, ३६५४ ची पातळी आज गाठली. शेअर बाजारात व्यवहार झालेल्या १३३ दिवसांनंतर सेन्सेक्स पुन्हा १२ हजार अंशांपल्याड गेला आहे. गेल्या आठ आठवडय़ांमध्ये दिसलेल्या निरंतर तेजीच्या परिणामी सेन्सेक्स तब्बल ४० टक्क्यांनी वधारला आहे. अनेक आघाडीच्या ‘लार्ज कॅप’ समभागांनी तर या काळात ५०-६० टक्क्यांची भाववाढ मिळविली आहे. ६ मार्च २००९ रोजी ८,०४७ अंशांच्या पातळीपासून घोडदौड सुरू करीत ‘सेन्सेक्स’ने आजचे १२ हजाराचे शिखर ओलांडले आहे.

जळगावचा अनिकेत मांडवगणे ‘यूपीएससी’मध्ये राज्यात पहिला
मुलींमध्ये नगरची शीतल उगले अव्वल ’ राष्ट्रीय गुणवत्ता यादीत राज्यातील ७० विद्यार्थी

पुणे, ४ मे/खास प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुख्य परीक्षेमध्ये राज्यात पहिला येण्याचा मान जळगावच्या अनिकेत मांडवगणे याने पटकाविला. राष्ट्रीय गुणवत्ता यादीत तो २९ वा आला. राज्यात मुलींमध्ये पहिली येण्याची कामगिरी अहमदनगरच्या शीतल शहाजीराव उगले हिने केली. राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ती ३७ वी आली. देशभरातून निवडण्यात आलेल्या ७९१ उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील ७० विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. गेल्या वर्षी राज्यातील ७८ विद्यार्थ्यांना ही कामगिरी करता आली होती.

दगडखाण ते यूपीएससी!
सोलापूर जिल्ह्य़ातील वडार समाजातील बालाजी मंजुळे याचा प्रवास दगडखाण ते यूपीएससीच्या राष्ट्रीय गुणवत्ता यादीत देशात ५६ वा असा आहे! सोलापूरमधील एका दगडफोडय़ाचा हा मुलगा. चाणक्य मंडलची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर पुण्यात कोर्स करण्यासाठी आला. त्यानंतर पुणे विद्यापीठातून ‘इतिहास’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर चाणक्य मंडलमध्येच मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत राज्य प्रशासकीय सेवा परीक्षेत (एमपीएससी) निवड झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करीत असताना आता २५ व्या वर्षी ‘यूपीएससी’साठी निवड झाली आहे.

मराठवाडय़ात उष्माघाताचे पाच बळी
लोहा, ४ मे/वार्ताहर

तालुक्यातील बोरगाव (आ) येथील आठ वर्षांच्य मुलाचा आज उष्माघाताने मृत्यू झाला. नारायण दत्ता सूरनर असे त्याचे नाव आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत जालना जिल्ह्य़ातील दोघांचा व परभणी जिल्ह्य़ातील दोन मुलांचा उष्माघाताने मृत्यू झाला. कडाक्याच्या उन्हाने गेल्या चार दिवसांत मराठवाडय़ातील तीन जिल्ह्य़ांमध्ये पाच जणांचे प्राण घेतले; त्यात तीन मुले आहेत. बोरगाव येथील नारायणला कालपासून ताप येत होता. अतिसार-उलटय़ाही झाल्या. आज सकाळी त्याला लोह्य़ाच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात येत असतानाच तो दगावला. याबाबत संपर्क साधल्यावर सरपंच मारुती पाटील बोरगावकर म्हणाले की, गावात शुद्ध पाणीपुरवठा होत आहे.

अंबानी हेलिकॉप्टर प्रकरण
एअर वर्क्‍सच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
युनियन-व्यवस्थापन वाद कारणीभूत
मुंबई, ४ मे / प्रतिनिधी
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीत सापडलेल्या चिखल आणि खडे प्रकरणाची उकल करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला अखेर यश आले असून याप्रकरणी ‘एअर वर्क्‍स इंडिया इंजिनिअरींग प्रा. लि.’ या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कंपनी व्यवस्थापन आणि युनियनमधील वादातून अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये असा प्रकार केला गेल्याचे तपासात उघड झाल्याचे सहआयुक्त राकेश मारिया यांनी आज सांगितले. या वादामुळे यापूर्वीही चारवेळा युनियनतर्फे असा घातपात घडविण्याचा प्रकार झाला होता.

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहीर
आर.पी. सिंगचे पुनरागमन; तर मुनाफ पटेल, कार्तिक आणि उथप्पाला वगळले
मुंबई, ४ मे/ क्री. प्र.
इग्लंडमध्ये ५ ते २१ जून दरम्यान होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या पंधरा सदस्यीय संघात डावखुरा वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग याचे पुनरागमन झाले असून मुनाफ पटेलला वगळण्यात आले आहे. आर.पी. सिंगबरोबरच प्रज्ञान ओझा आणि रवींद्र जडेजा या युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून गेल्या विश्वचषकामध्ये कर्णधार महेंद्र सिंग धोनीसाठी ‘लकी’ ठरलेल्या जोगिंदर शर्माला संघाबाहेर काढण्यात आले आहे. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी अन्य सदस्यांबरोबर ‘टेलिकॉन्फरन्स’ द्वारे सल्लामसलत करून आज ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पंधरा सदस्यीय संघ जाहीर केला.

२६/११ खटला
जम्मू-काश्मीर भारताचा भाग नसल्याचा फईमच्या वकिलांचा दावा
मुंबई, ४ मे / प्रतिनिधी
पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबविरुद्ध अभियोग पक्षाने सादर केलेल्या ३१२ प्रस्तावित आरोपांच्या मसुद्यावर आज कसाबचे वकील अब्बास काझ्मी यांनी उत्तर दाखल करण्यास नकार दिला. तसेच कसाबवर ठेवण्यात आलेले आरोप निश्चित करण्यास आपली काहीही हरकत नसल्याचेही विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांना सांगितले.

म्हाडा घरांसाठी १९ मे रोजी सोडत?
मुंबई, ४ मे / प्रतिनिधी

सामान्यांसाठी म्हाडाने उपलब्ध करून दिलेल्या तीन हजार ८६३ घरांसाठी सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून येत्या १९ मे रोजी सोडत काढली जाण्याची दाट शक्यता आहे. वांद्रे येथील रंगशारदा येथील सभागृहात वेगवेगळ्या कोडसाठी सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत यशस्वी ठरलेल्यांना म्हाडामार्फत लेखी पत्र पाठवून कळविले जाणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे सुमारे सव्वा चार लाख अर्ज प्राप्त झाले. वर्सोवा येथील आलिशान व मोठे फ्लॅट ते दहिसर, प्रतीक्षानगर, विक्रोळी येथील छोटे फ्लॅट आदींना भरघोस प्रतिसाद मिळाला. आता सोडतीतून या ग्राहकांचे भवितव्य उलगडणार आहे. कुठल्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये यासाठी ही संपूर्ण सोडतच म्हाडाने पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे ठरविले आहे. सोडत जाहीर झाल्यानंतर यशस्वी ग्राहकाला फ्लॅट क्रमांकासह घर वितरीत झाल्याचे पत्र देण्यात येणार आहे. यशस्वी ग्राहकाला कागदपत्रेदेखील एचडीएफसी बँकेतच सादर करावयाची आहेत. त्यानंतर त्यांना टोकन दिले जाणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही करावयाची आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी