Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

व्यापार - उद्योग

एव्हिटेल पोस्ट स्टुडिओज्चे रु. १५० कोटींच्या ऑर्डर्ससह अॅनिमेशन व्यवसायात पदार्पण
व्यापार प्रतिनिधी: निर्मिती पश्चात सेवा क्षेत्रात कार्यरत भारतातील पहिली आणि आघाडीची एकात्मिक कंपनी ‘एव्हिटेल पोस्ट स्टुडिओज् लि.’ या तब्बल १५० दशलक्ष अमेरिकी डॉलरची मालमत्ता असलेल्या कंपनीने रु. १५० कोटीद्यच्या ऑर्डर्स मिळवून अॅनिमेशन व्यवसायात पदार्पण करीत असल्याची घोषणा केली आहे. ब्रिटनस्थित चित्रपट निर्मिती कंपनी पर्पल पॅशन प्रॉडक्शन लि.कडून कंपनीने ‘द फायनल गोल’ हा आपला पहिला प्रकल्प हस्तगत केला आहे. सबंध भारतीय अॅनिमेशन उद्योगाच्या दृष्टीने ही एक मोठी मुसंडी असून, संकल्पना ते निर्मिती अशी सर्वागीण सर्जनशील सेवा कोणा आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी प्रदान करणारी ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली आहे.

जिओजित फायनान्शिअल सव्र्हिसेस बनली ‘जिओजित बीएनपी परिबा’
व्यापार प्रतिनिधी:
भारतातील एक आघाडीची ब्रोकिंग कंपनी असलेल्या जिओजित फिनान्शिअल सव्र्हिसेस लि.मध्ये सर्वाधिक हिस्सा बीएनपी परिबाने घेतला आहे. जिओजितने या कराराला यंदा फेब्रुवारीमध्ये अंतिम स्वरूप दिले असून त्यामुळे जिओजितचे नामकरण आता जिओजित बीएनपी परिबा फिनान्शिअल सव्र्हिसेस लि. झाले आहे. जिओजित बीएनपी परिबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. जे. जॉर्ज म्हणाले की, बीएनपी पॅरिबससोबत करार केल्यामुळे जिओजितला आपल्या सेवा अनिवासी भारतीयांनाही देणे शक्य होणार आहे. समूहाकडील तंत्रज्ञान, कस्टमर रिलेशन्स, टूल्स आदी बाबतीतील तज्ज्ञांचा फायदा कंपनीलाही होईल.

व्यापार संक्षिप्त
‘मायक्रो टेक्नॉलॉजीज’चे तिमाही उत्पन्न रु. ७७.५४ कोटींवर

व्यापार प्रतिनिधी:
सिक्युरिटी सोल्यूशन्स क्षेत्रातील जागतिक कंपनी मायक्रो टेक्नॉलॉजीज (इंडिया) लिमिटेडने ३१ मार्च २००९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीसाठी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. कंपनीची या तिमाहीसाठी प्रति शेअर मिळकत (ईपीएस) रु. १६.०२ वर गेली आहे. तर ३१ मार्च २००९ अखेर संपलेल्या वित्तीय वर्षांसाठी एकत्रित महसुली उत्पन्न हे गेल्या वर्षांच्या तुलनेत ५३.७६ टक्क्यांनी वाढून रु. २८९.९८ कोटींवर गेले आहे. तर एकत्रित निव्वळ नफाही या आर्थिक वर्षांत रु. ७०.८४ कोटींवर गेला आहे, जो मागील वर्षांतील एकत्रित निव्वळ नफ्याच्या तुलनेत ३०.३१ टक्क्यांनी वाढला आहे. चौथ्या तिमाहीसाठी एकत्रित महसुली उत्पन्न हे मागील वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत २९.६४ टक्क्यांनी वाढून रु. ७७.५४ कोटींवर गेले आहे, तर एकत्रित निव्वळ नफा रु. १७.५८ कोटींवर गेला आहे. स्वतंत्र स्वरूपात या तिमाहीसाठी कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न मागील तुलनेत ७ टक्क्यांनी वाढून रु. ५४.९१ कोटींवर गेले आहे, तर निव्वळ नफा रु. १३.२१ कोटींवर गेला आहे. स्वतंत्र स्वरूपात संपूर्ण वित्तीय वर्षांसाठी एकूण उत्पन्न ३३.७८ टक्क्यांनी वाढून २३०.०७ कोटींवर गेले आहे.

मान इंडस्ट्रीजला आखाती प्रदेशातून रु. १३४० कोटींची ऑर्डर
व्यापार प्रतिनिधी:
मोठय़ा व्यासाच्या लोखंडी पाईपनिर्मिती क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मान इंडस्ट्रीजला नव्या वित्तीय वर्षांत आखाती राष्ट्रातून रु. १३४० कोटींच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. पराकोटीच्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक स्पर्धेला तोंड देऊन भारतीय कंपनीने ही ऑर्डर पटकावली आहे. ही ऑर्डर कंपनीला चालू वित्तीय वर्षांतच पूर्ण करावयाची आहे. या ऑर्डरव्यतिरिक्त देश-विदेशातील एकूण रु. ११०० कोटींच्या ऑर्डरसाठी कंपनीने सर्वात कमी बोली लावली असून लवकरच या ऑर्डर कंपनीच्या नावे होतील, असा विश्वास मान इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मनसुखानी यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रु. ५००० कोटींच्या ऑर्डरसाठी कंपनी बोली लावण्याच्या तयारीत आहे. सध्या मान इंडस्ट्रीजजवळील एकूण ऑर्डरचे प्रमाण रु. २००० कोटी झाले आहे. कंपनीचा अंजार (गुजरात) मधील कारखाना सुरळीतपणे सुरू झाला आहे.

फायनान्शियल टेक्नॉलॉजीज समूहाचा शिक्षण क्षेत्रात ‘इग्नू’च्या सहकार्याने पुढाकार
व्यापार प्रतिनिधी:
वित्तीय बाजारपेठेची आवश्यकता लक्षात घेऊन फायनान्शियल टेक्नॉलॉजीज (इंडिया) लिमिटेड या कंपनीने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू)च्या सहकार्याने संपूर्ण देशभरात वित्तीय बाजारपेठेविषयक शिक्षणाच्या प्रसारासाठी सामंजस्याचा करार केला आहे. यासाठी कंपनीची शिक्षण क्षेत्राला वाहिलेली ‘फाइनान्शियल टेक्नॉलॉजीज नॉलेज मॅनमेजमेंट’ या उपकंपनीने पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमातून ‘इग्नू’च्या दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत एका पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सची आखणी केली गेली आहे. या डिप्लोमा कोर्समध्ये भांडवली बाजार (इक्विटी), डेरिव्हेटिव्हज्, कमॉडिटीज्, करन्सी आणि बॉण्ड्स अशा विषयांचा समावेश केला गेला आहे. अभ्यासक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला गेवा असून, विद्यार्थ्यांमधून वित्तीय बाजारपेठेसाठी व्यावसायिक घडविले जावेत हे पाहिले जाणार आहे. फाइनान्शियल टेक्नॉलॉजीज नॉलेज मॅनमेजमेंट, इग्नू, इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्शियल मार्केट रिसर्च (चेन्नई), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (बंगळुरू), रेलिगेअर सिक्युरिटीज् आणि काही स्वतंत्र व्यावसायिकांच्या समूहाने या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे.