Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

जयललिता, पटनायक, नीतिशकुमार, पीएमके, तेलंगण राष्ट्र समिती व प्रजाराज्यम् रडारवर
काँग्रेसच्या १६ मे नंतरच्या रणनितीचे राहुल गांधींकडून सूतोवाच

नवी दिल्ली, ५ मे/खास प्रतिनिधी

मायावती, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव आणि शक्य झाल्यास डाव्या आघाडीच्या मदतीशिवाय केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार कसे स्थापन करता येईल, याची गेल्या दोन-तीन आठवडय़ांपासून रणनिती आखण्यात गुंतलेल्या काँग्रेसश्रेष्ठींचे १६ मे नंतरच्या डावपेचांचे आज पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधींच्या मुखातून संकेत मिळाले.

कार्पोरेट फंडिंगची ‘भगवी श्रीमंती’
देणगीदारांचा भाजपवर सर्वाधिक वर्षांव,
काँग्रेससह अन्य नऊ पक्षांकडे ओघ कमी

नवी दिल्ली, ५ मे / एक्सप्रेस वृत्तसेवा

कार्पोरेट्स फंड आणि वैयक्तिक देणग्या प्राप्त करणाऱ्या १० प्रमुख राजकीय पक्षांच्या यादीत भारतीय जनता पक्षाने गेल्या वर्षी अन्य नऊ प्रमुख राजकीय पक्षांवर कुरघोडी केल्याचे २००७-२००८ या काळातील प्राप्त माहितीवरून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील जनसंवाद अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अफ्रोज आलम याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती संकलित करून इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाला उपलब्ध करून दिली.
भाजपला गेल्या वर्षी २४ कोटी ९६ लाख रुपयांचा फंड कार्पोरेट जगत आणि वैयक्तिक देणग्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला.

आझमखान सपा सोडणार नाहीत, मात्र कल्याण सिंह यांच्यासमवेत प्रचारास नकार
लखनौ, ५ मे/पी.टी.आय.

समाजवादी पार्टीचा ‘मुस्लीम चेहरा’ म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेशातील आघाडीचे नेते आझमखान यांनी पक्ष सोडणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र, पक्षात दाखल झालेले भाजपचे माजी नेते कल्याण सिंह यांच्यासमवेत आपण प्रचारास जाणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राहुल गांधींच्या विधानांवर भाजप, डाव्यांची टीका
नवी दिल्ली, ५ मे/खास प्रतिनिधी

निश्चित वाटणारा पराभव पाहून काँग्रेस रालोआतील घटक पक्षांना चुचकारण्याच्या मागे लागला असला तरी काँग्रेसच्या नादी लागण्याइतपत रालोआतील पक्ष भोळे नाहीत, अशा शब्दात भाजपचे सरचिटणीस अरुण जेटली यांनी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या विधानांचा समाचार घेतला. राहुल गांधींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची प्रशंसा केल्यामुळे काँग्रेसविरोधी आघाडय़ांमध्ये संभ्रम पसरला आहे.

काँग्रेसचा आरोप चुकीचा; राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
मुंबई, ५ मे / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात काम केल्याच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आरोपाचा राष्ट्रवादीने इन्कार केला असून, याउलट काँग्रेसच्याच काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचा प्रतिआरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केल्याचा आरोप करणाऱ्या माणिकराव ठाकरे यांनी आधी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या कारवायांकडे लक्ष द्यावे, असे राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना सूचविण्यात आले आहे.

अझरुद्दिनच्या प्रचारासाठी राहुलची ‘बॅटिंग’
लखनऊ, ५ मे / पी.टी.आय.
लोकसभा निवडणुकीपेक्षा सध्या मतदारांना दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या २०-२० क्रिकेटने भुरळ घातली असली तरी राजकीय आखाडय़ाच्या मैदानावर राहुल गांधी यांनी सध्या धडाकेबाज फलंदाजी करण्याचे ठरविले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि कॉँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेल्या अझरुद्दिनच्या प्रचारासाठी राहुल गांधी गुरूवारी येथे येत आहेत. राहुल गांधी यांचा हा प्रचार दौरा दोन दिवसांचा असून त्यामध्ये ते अझरसाठी मोरादाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत. राजकीय आखाढय़ात उतरलेल्या अझरसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने येथे प्रचाराची राळ उठविण्यात आली आहे. राहुल गांधी यांना बोलावून अझरने त्यांच्याकडे प्रचाराची फलंदाजी दिल्याचे मानले जाते. राहुल गांधी यांची सभा त्यादृष्टीने महत्वाची मानली जाते. राहुल गांधी हे दोन दिवसामध्ये तीन सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशातील हे मतदारसंघ कॉँग्रेसच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने येथे जादा लक्ष देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.