Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

विनापरवाना बॉक्साईट वाहतुकीला आळा घालण्यासाठी सेनेचा मोर्चा
कोल्हापूर, ५ मे / विशेष प्रतिनिधी

जिल्ह्य़ात विनापरवाना चालकाद्वारे सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, नियमापेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या गाडय़ा व खणीकर्म कंपन्यांवर फौजदारी कारवाई करावी आणि हप्ते बांधण्यात आलेल्या भ्रष्ट यंत्रणेचे समूळ उच्चाटन करावे या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेने येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा नेला होता. या मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले.

बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने सोलापुरात बेमुदत उपोषण सुरू
सोलापूर, ५ मे/प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील कामती येथील परमेश्वर आश्रमशाळेतील कायम सेवेत असलेल्या १७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सेवेत कायम असणाऱ्या या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेले वेतन मिळावे, त्यांच्या सेवेला संरक्षण मिळावे, सर्वच आश्रमशाळांतील शिक्षक-शिक्षकेतरांना नेमणूक आदेशाच्या प्रती, वैयक्तिक मान्यतेच्या प्रती, सेवापुस्तिकेच्या दुय्यम प्रती त्वरित देण्यात याव्यात,

सांगली पाणीयोजनेच्या खासगीकरणाचा डाव
सांगली, ५ मे / प्रतिनिधी

सांगली महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जीवन प्राधिकरण विभागाकडे हस्तांतरित करून त्याचे खासगीकरण करण्याचा डाव राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रचला आहे. त्याला सत्ताधारी विकास महाआघाडीची साथ असून या विरोधात नागरिक हक्क संघटनेच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारून हा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा संघटनेचे कार्यवाह, माजी नगरसेवक वि. द. बर्वे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत पवार व माजी आमदार नितीन शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिला.

पळविलेल्या नवजात अर्भकाचा मृतदेह सापडला
पंढरपूर, ५ मे/वार्ताहर

पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे मनीषा पोपट कोंडुभैरी ही आपल्या २२ दिवसांच्या नवजात बाळास घेऊन झोपली असता त्या बाळास अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. त्या नवजात अर्भकाचे शव घाडगे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी तालुका पोलीस स्टेशनला निनावी दूरध्वनी आला. त्यावरून संजय नामदेव घाडगे याचे शेतातील विहिरीत लहान मुलाचे शव तरंगत असल्याची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी रांझणी येथे त्वरित जावून घटनास्थळी पाहणी केली, तेव्हा ते तरंगणारे प्रेत २२ दिवसांच्या नवजात अर्भकाचे असल्याचे लक्षात आले.

पालिका कामगारप्रश्नी लवकरच संयुक्त बैठक
सांगली, ५ मे/प्रतिनिधी

सांगली महापालिकेतील कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत लवकरच कामगार युनियनसमवेत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी मंगळवारी दिले. कामगार युनियनचे अध्यक्ष शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती सुमन पुजारी, महादेव कांबळे, नासर शेख, तानाजी पाटील, शिवाजी जावीर, सीताबाई नाटेकर, मंगल हाट्टे व अन्य कामगारांच्या एका शिष्टमंडळाने आज दत्तात्रय मेतके यांची भेट घेऊन निवेदन दिले. महापालिकेकडील कामगारांना घरे देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून, कामगारांच्या पदोन्नतीची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल. कामगारांना संपूर्ण युनिफॉर्म, सहाव्या वेतन आयोगाची कार्यवाही, सुट्टीदिवशी काम करणाऱ्या कामगारांना जादा वेतन द्यावे, आदी मागण्या कामगार युनियनच्या वतीने करण्यात आल्या.

सांगलीत मलेरियाची साथ?
सांगली, ५ मे / प्रतिनिधी

सांगली शहरात आता गॅस्ट्रोपाठोपाठ मलेरियाचेही रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डास मुक्त शहराची घोषणा महापालिका निवडणुकीत चांगलीच गाजली होती. पण वास्तवात शहरात डासांचे प्रमाण वाढल्याचेच चित्र सर्वत्र दिसत आहे. हरिपूर रस्त्यावरील पाटणे प्लॉटमधील सुरेश सोपटे (वय २८) व दिनकर दादोबा कांबळे (वय २६) या दोघांना मलेरियासदृश्य आजार झाल्याने भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्याच आठवडय़ात संजयनगर परिसरात ३५ हून अधिकजणांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. कावीळ व अन्य साथीचे रोग तर सांगलीकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. अशातच मलेरियाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ट्रकचालकाला लुटणाऱ्या दोघांना मिरजेत अटक
मिरज, ५ मे / वार्ताहर

हरयाणातील ट्रकचालकास जीवे मारण्याची धमकी देऊन २५ हजार रुपयांना लुटणाऱ्या दोघांना मिरज शहर पोलिसांनी दहा तासांच्या आत अटक केली. हे दोघेही आरोपी अट्टल गुन्हेगार असून एकावर खुनाचा गुन्हाही दाखल आहे. मालट्रक (क्रमांक एचआर ६३-३८) हा घेऊन ट्रकचालक लियाकत खान आयुब खान (रा. हरयाणा) हा मिरज शासकीय दूध डेअरीतून दिल्लीसाठी दूध पावडर घेऊन जाण्यासाठी कोल्हापूरहून आला होता. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मिरज बसस्थानकासमोर दूध डेअरीचा पत्ता विचारत असताना भरत अण्णासाहेब पाटील (रा. म्हैसाळ) व ईनहाज लालासाहेब शेख (रा. कृष्णाघाट, मिरज) हे दोघे रिक्षा (क्रमांक एमएच १०- एस ९३२१) मधून आले व त्यांनी ट्रकचा दुसरा चालक अहमद इर्शाद महंमद हसन यास जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल व मिळालेले भाडे २४ हजार असा २६ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी फिर्याद दाखल होताच शहर पोलिसांनी रिक्षासह या दोघांना अटक केली असून १४ हजार रुपये हस्तगत केले आहेत. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

चंद्रकांत ढाणे यांना पी. जी. पाटील पुरस्कार
सातारा, ५ मे / प्रतिनिधी

येथील कलावंत, चित्रकार चंद्रकांत आबासाहेब ढाणे यांना सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवासंघाच्या वतीने बॅरिस्टर पी. जी. पाटील व प्राचार्या सुमतीबाई पाटील गुणवंत अध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु दिवंगत बॅरिस्टर पी. जी. पाटील व त्यांच्या पत्नी प्राचार्य सुमतीबाई पाटील यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण ऑक्टोबरमध्ये खास समारंभात होणार आहे.
चंद्रकांत ढाणे यांना संकेत कला, क्रीडा प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने आदर्श कला शिक्षक पुरस्कार यापूर्वी जाहीर झाला असून त्याचे वितरण १२ मे रोजी कोथरुड येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. चंद्रकांत ढाणे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई येथील कन्या शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बाळे येथे घरफोडी;दीड लाखांचा ऐवज लांबविला
सोलापूर, ५ मे/प्रतिनिधी

बाळे गावच्या हद्दीतील शिवाजीनगरमधील जागृती शिक्षक सोसायटीत राहणाऱ्या दीपक नरहर काळे यांची घरफोडी होऊन चोरटय़ांनी सोने-चांदीचे दागिने व रोकडसह सुमारे एक लाख ३३ हजारांचा ऐवज लांबविला. गेल्या ३ मे रोजी श्री. काळे हे लग्नकार्यासाठी घराला कुलूप लावून परगावी गेले होते. ही संधी साधून चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील आठ तोळे सोन्याचे दागिने, पाच तोळे चांदीचे दागिने, मोबाइल संच आणि साठ हजार रोकड असा एकूण एक लाख ३३ हजार ८०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी तपास करीत आहेत. घरगुती गॅसचा गैरवापर धोत्रीकर वस्तीजवळील सुप्रभात गॅरेजच्या मागे एका रिक्षामध्ये घरगुती गॅस भरत असताना छापा टाकून पोलिसांनी गॅस सिलेंडरची टाकी, इलेक्ट्रिक मोटार, रेग्युलेटर, वजन काटा व रिक्षासह ६९ हजार ३०० रूपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी सलीम बाशा मुल्ला (रा. मड्डी वस्ती) यास अटक केली असून यातील रिक्षाचालक सैफन हमीद मुर्गानूर (रा. मड्डी वस्ती) हा फरारी आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना मिळालेल्या माहितीनंतर आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक अनिल नलावडे व त्यांच्या सहकार्यानी हा छापा घातला.

‘मुक्ती’ च्या शववाहिकेसाठी अर्थसाह्य़ करण्याचे आवाहन
सोलापूर, ५ मे/प्रतिनिधी

बेवारस मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे कार्य करणाऱ्या मुक्ती सेवाभावी संघटनेच्या तपपूर्तीनिमित्त स्वतच्या मालकीची शववाहिका खरेदी करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित वडगावकर यांनी दिली. येत्या १६ मे रोजी संघटनेस बारा वर्षे पूर्ण होत आहेत. संघटनेच्यावतीने आतापर्यंत १७५० बेवारस मृतदेहांना सन्मानाने ‘मुक्ती’ देण्यात आली. कोणतेही सरकारी अनुदान नसताना देणगीदारांच्या आधारावर आणि स्वबळावर संघटना हे कार्य करीत आहे. संघटनेच्यावतीने शासकीय रूग्णालयापासून मोदी स्मशानभूमीपर्यंत मृतदेह नेला जातो. बेवारस मृतदेह ज्या ठिकाणी पडला आहे तेथून तो शासकीय रूग्णालयात हलविण्यासाठी अनेक अडचणी येतात. म्हणून घटनास्थळापासून शासकीय रूग्णालयापर्यंत मृतदेह नेणे आणि तेथून स्मशानभूमीपर्यंत पार्थिवास नेण्यासाठी स्वतच्या मालकीची शववाहिका खरेदी करण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या कार्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी अथवा संस्थांनी अर्थसाह्य़ करण्यासाठी ९४२२४६०५८८ अथवा २७२४५००० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. वडगावकर यांनी केले आहे.