Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९

 

पनवेल, ५ मे / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी भांडवलदारांच्या घशात घालू पाहणाऱ्या सेझ प्रकल्पाविरोधात मंगळवारी अखेर उद्रेक झाला. पनवेलजवळील टेंभुर्डे आणि वळवली गावात प्रस्तावित रिलायन्स सेझसाठीच्या संरक्षण भिंती उभारण्याचे काम ग्रामस्थांना विश्वासात न घेता सोमवारी सुरू झाले होते. मंगळवारी मात्र दोन ते तीन हजार ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. विशेष म्हणजे यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. ग्रामस्थांच्या रुद्रावतारामुळे सोमवारी सक्रिय असणारे रिलायन्सचे अधिकारी मंगळवारी गायब झाले होते.

राहुल‘निती’!
नवी दिल्ली, ५ मे/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए विरोधात बसणार नाही तर केंद्रात सरकार स्थापन करेल, असा दावा आज काँग्रेसचे तरुण सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज केला. विरोधात गेलेले डावे पक्ष आणि काँग्रेसच्या धोरणात अनेक समानता असल्याचे स्मरण करून देत निवडणुकांनंतर डावी आघाडी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारला पुन्हा पाठिंबा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येथील अशोका हॉटेलमध्ये दिल्लीतील पत्रकारांना प्रथमच पत्रकार परिषदेद्वारे सामोरे जाताना राहुल गांधी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीचा अतिशय आत्मविश्वासाने सामना केला. निवडणुकांनंतर नव्या पक्षांशी युतीसाठी मैदान खुले असल्याचे सांगताना त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या विकासाभिमुख दृष्टीकोनाची प्रशंसा केली. आम्ही विरोधात बसणार नाही व सरकार स्थापन करू, असे राहुल गांधी यांनी निसंदिग्धपणे स्पष्ट करून काँग्रेसने निकाल लागण्यापूर्वीच पराभव मान्य केल्याच्या भाजपकडून होत असलेल्या प्रचाराला उत्तर दिले. काँग्रेस किती जागाजिंकेल, हे आपण सांगू शकणार नाही. पण अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या बाजूने आपल्या सकारात्मक अंतर्प्रवाह जाणवला. त्यामुळे मागच्या लोकसभा निवडणुकांपेक्षा काँग्रेस अधिक सरस कामगिरी बजावेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जॉर्ज फर्नाडिस यांची सीबीआयकडून चौकशी
नवी दिल्ली, ५ मे/पीटीआय

१९९८ ते २००० या कालावधीत आर्मड् रिकव्हरी व्हेईकल्सच्या (एआरव्ही) खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांची आज सीबीआयने चौकशी केली. या गैरव्यवहारामध्ये जॉर्ज फर्नाडिस गुंतले असल्याचा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. उपमहानिरीक्षक तिलोत्तमा वर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयच्या पथकाने आज सकाळी फर्नाडिस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आर्मड् रिकव्हरी व्हेईकल्सच्या खरेदी गैरव्यवहारप्रकरणी सुमारे दीड तास चौकशी केली. झेकोस्लाव्हाकियामधील झेडटीएस मार्टिन या कंपनीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या युनिम्पेक्सची निविदा मंजूर करण्यात जॉर्ज फर्नाडिस यांनी नेमकी कोणती भूमिका बजावली याची चौकशी सीबीआय पथकाने त्यांच्याकडे केली.

‘स्वाईन फ्लू’चे विषाणू भारतातील डुकरांत नाहीत
पालिकेचा दावा

मुंबई, ५ मे / प्रतिनिधी
जगातील अनेक देशात लागण झालेल्या ‘स्वाईन फ्लूू’चे विषाणू भारतीय डुकरात नाहीत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेने आज शहरातील खासगी इस्पितळातील डॉक्टरांची बैठक बोलावली होती. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनने ही माहिती दिली, असे सांगण्यात आले. ‘स्वाईन फ्लू’चा प्रार्दूभाव मुंबईत झाला तर काय खबरदारी घ्यावी यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. शहरातील बडय़ा खासगी इस्पितळातील प्रमुखांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. परदेशी पर्यटक किंवा परदेशात जाऊन येणारे भारतीय बडय़ा इस्पितळात उपचार घेत असतात.

कृष्णा आली हो ‘माढय़ा’च्या अंगणी!
पुणे, ५ मे / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘माढय़ा’तून लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर या मतदारसंघात सिंचनसमृद्धी निर्माण करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे निम्म्याहून अधिक उच्चपदस्थ अधिकारी गेले दोन दिवस सोलापूर जिल्हय़ात ठाण मांडून आहेत. उजनी धरणाच्या कालव्यांच्या चाऱ्या-पोटचाऱ्यांपासून एकरूखसारख्या रखडलेल्या उपसा सिंचन योजनांसाठी एक हजार ते दीड हजार कोटींच्या खर्चाच्या योजना आकार घेत आहेत. केवळ ‘माढा’ मतदारसंघात पाण्याचा खळखळाट झाल्याचे चित्र उभे राहू नये यासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर मतदारसंघातही सिंचनसुविधा निर्माण करण्याचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यातील धरणांमधील पाण्याबरोबरच म्हैसाळच्या टप्पा पाचमधून थेट दुष्काळी सांगोला तालुक्यापर्यंत सिंचनासाठी पाणी कसे नेता येईल याचाही विचार केला जात आहे. बारामतीऐवजी सोलापूरमधील माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. ही निवडणूक लढताना बहुतांश तालुक्यांतून त्यांच्याकडे शेतीसाठी पाण्याची मागणी करण्यात आली. काही तालुक्यांत या मुद्दय़ावरून पवार यांना विरोधही केला गेला होता. शेतकऱ्यांची सिंचनाबाबतची तीव्रता लक्षात आल्यावर ‘माढा’ सिंचनसमृद्ध केला जाईल, असे आश्वासन प्रचारादरम्यान देण्यात आले होते.

चौथ्या टप्प्याचा प्रचार संपला
प्रणब मुखर्जी, राजनाथ, मुलायम यांचे भवितव्य ठरणार
नवी दिल्ली, ५ मे / पी.टी.आय.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव तसेच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यासहित सुमारे १३१५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य गुरूवारी यंत्रबंद होत आहे. दरम्यान निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उठलेला प्रचाराचा धुरळा आज सायंकाळी बसला. गुरूवारी होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये राजस्थानमधील २५, हरियाणा-१० दिल्ली-सात, उत्तर प्रदेश-१८, पश्चिम बंगाल-१७ पंजाब-४, बिहार-३ आणि जम्मू-काश्मीरमधील एका अशा एकून ८५ जागांसाठी मतदान होत आहे. अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, कॉँग्रेसचे कपिल सिबल, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा, शेखर सुमन, राष्ट्रीय लोक दलाचे अजित सिंग, भजनलाल तसेच कॉँग्रेसचे युवा उमेदवार सचिन पायलट यांचा समावेश असून या सर्वाच्या राजकीय भवितव्याचा फैसला मतदार गुरूवारी करतील. लोकसभा निवडणूकीचा शेवटचा टप्पा १३ मे रोजी होत असून १६ मे रोजी निकाल जाहीर होतील.

मतदारांचा पुन्हा निरुत्साह
कलिना ३२ टक्के ’ कुर्ला ४० टक्के
मुंबई, ५ मे/प्रतिनिधी

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील कलिना व कुर्ला येथील चार मतदानकेंद्रांवर आज फेरमतदान घेण्यात आले. कलिना येथील मतदानकेंद्र क्रमांक १८३ व १८५ येथे ३२ टक्के तर कुर्ला येथील मतदानकेंद्र क्रमांक २२९ व २३२ येथे ४० टक्के एवढे मतदान झाले. या मतदान केंद्रांवर ३० एप्रिल रोजी ९० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्यामुळे भाजपाने फेरमतदानाची मागणी केली होती. तसेच निवडणूक आयोगाने नेमलेल्या निरीक्षकांनी फेरमतदानाची शिफारस केली होती. त्यानुसार आज या चार मतदानकेंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे प्रिया दत्त, युतीतर्फे महेश जेठमलानी तर बसपातर्फे भाईजान हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी