Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

भेगाळलेली जमीन अन् थकलेली पावले.. ओढ आहे पाण्याचीच!
संपूर्ण मराठवाडय़ात उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईही वाढते आहे. हंडाभर पाण्यासाठी बायाबापडय़ांना दूर-दूरवर पायपीट करावी लागते.

आयुक्त विरुद्ध नगरसेवक
आयुक्त आणि नगरसेवक ही शहराच्या विकासाच्या रथाचे दोन चाके आहेत, असे म्हटले जाते. त्यामुळे विकासाच्या रथाच्या या दोन्ही चाकांनी समन्वयाने आणि एकविचाराने काम करणे अपेक्षित आहे. आयुक्त आणि नगरसेवक यांच्यामध्ये समन्वय असेल आणि एकमेकांबद्दल आदराची भावना असेल तरच शहराच्या विकासाचा रथ योग्य दिशेने आणि वेगाने धावेल. तथापि, राज्यातील बहुतेक नगरपालिकांमध्ये आयुक्त आणि नगरसेवक यांच्यामध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असल्याचे जाणवते, तशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमातून वाचावयास मिळतात. आयुक्त आणि नगरसेवक हे दोघेही जनसेवक (Public Servant) आहेत. त्यांच्यापैकी कोणीही मालक नाही. खरे मालक शहराची जनता आहे. त्यामुळे दोन सेवकांनी आपसात भांडण्याचे कोणतेही कारण नाही.

नांदेडच्या सरकारी रुग्णालयात गॅस्ट्रोचे ३५ रुग्ण दाखल
नांदेड, ५ मे/वार्ताहर
जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात होणारा दूषित पाणीपुरवठा, शिळे व उघडय़ावरचे अन्न खाण्याची पद्धत या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गुरू गोविंदसिंग रुग्णालयात ३५ ते ४० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आज मिळाली. नांदेडच्या वेगवेगळ्या भागांत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

कलम अकराचा धसका कायम!
सुहास सरदेशमुख, उस्मानाबाद, ५ मे

नात्यागोत्यांच्या मंडळींना कर्जवाटप करून वैयक्तिक कर्जाच्या रकमा संचालक आणि पुढाऱ्यांनीच न भरल्याने जिल्हा सहकारी बँकेभोवतीचा ‘कलम अकरा’चा फेरा आजही कायम आहे. वारंवार तगादा लावूनही संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुमारे दोन कोटी रुपये भरले नाहीत. विशेष म्हणजे यात राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर यांच्याही संस्था आहेत. जिल्हा सहकारी बँकेतील ‘होमट्रेड घोटाळा’ व ८८ कलमान्वये संचालकांची ५२ कोटी ७२ लाख रुपयांची वसुली ही प्रकरणे वेगळीच आहेत.

प्रवेशाची पळापळ;
‘खिसेकापूंची’ धावपळ!
प्रदीप नणंदकर, लातूर, ५ मे

महाराष्ट्र दिनी विविध शाळांमधील परीक्षांचे निकाल जाहीर झाले आणि अधिकृत सुट्टीस प्रारंभ झाला. संस्थाचालक मात्र नवीन वर्षांच्या प्रवेशासाठी तरतूद करण्यात मग्न आहेत.
लातूर शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जात असल्यामुळे दर वर्षी विद्यार्थ्यांचा नवा लोंढा शहराकडे येत असतो. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची ओढ वाढत आहे.

संजय जगताप नवे विरोधी पक्षनेते
महापालिकेमध्ये चार वर्षांत पाचवी नियुक्ती
औरंगाबाद, ५ मे/प्रतिनिधी
महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसच्या सदस्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून कायम वाद चालू आहेत. गेल्याच महिन्यात मेहरुन्निसा बेगम उर्फ मोठेभाभी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. श्री. संजय जगताप यांनी दावा केल्याने महापौर विजया रहाटकर यांनी आज त्यांची नवे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली!

विलासरावांच्या वाढदिवसानिमित्त
लोहय़ात २१ रोजी सामूहिक विवाह
आमदार चिखलीकर यांचे चिरंजीव चतुर्भुज होणार
नांदेड, ५ मे/वार्ताहर
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही २१ मे रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा लोहा येथे आयोजित करण्यात आला आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात यंदा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. प्रमोद पाटील चिखलीकर यांचा विवाह डॉ. माया हणमंतराव कदम हिच्याशी होणार आहे. त्यांनीच आज ही माहिती पत्रकारांना दिली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून
उस्मानाबाद, ५ मे/वार्ताहर

तालुक्यातील कौडगाव येथे सहा वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून दगडाने ठेचून खून करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. नाईकवाडी यांच्या शेतात आज सकाळी त्या मुलीचा मृतदेह आढळून आला. कौडगाव येथील अण्णा थोरात यांच्या घरी विवाह सोहळ्यानिमित्त प्रमोद कोंडारे पत्नी व तीन मुलांसह आले होते. लग्नघरी अंगणात झोपलेल्या या मुलीला काल रात्री कोणी तरी उचलून नेले. नाईकवाडी यांच्या शेतात बलात्कार केल्यानंतर त्या नराधमाने तिचा दगडाने ठेचून खून केला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. घटनास्थळास पोलीस उपविभागीय अधिकारी माधव कारभारी यांनी भेट दिली.

पी.एस.कच्छवे यांना विशेष पोलीस पदक
लोहा, ५ मे/वार्ताहर

पोलीस उपनिरीक्षक पी. एस. कच्छवे यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांचे विशेष पोलीस पदक देऊन महाराष्ट्रदिनी गौरविण्यात आले.सामाजिक सौहार्द निर्माण करणारे अधिकारी अशी ओळख असलेले श्री. पंडित कच्छवे यांना त्यांच्या १५ वर्षांच्या पोलीस दलातील सेवेत वेगवेगळ्या उल्लेखनीय कामासाठी आतापर्यंत ७४२ पुरस्कार मिळाले आहेत. तंटामुक्ती अभियानात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष सेवा पदक देऊन त्यांचा महाराष्ट्रदिनी गौरव करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी वामनराव खरात, पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, सहायक निरीक्षक उडते, उपनिरीक्षक बी. टी. शिंदे व पोलीस कर्मचारी, मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जवळाबाजार येथे भोंदू साध्वीला अटक
हिंगोली, ५ मे/वार्ताहर

औंढा तालुक्यातील जवळाबाजार येथे एका भोंदू साध्वीने एका रिक्षाचालकास ५१ रुपये वर्गणी मागितली. त्याने नकार दिल्यावर ‘वर्गणी नाही तर प्रसाद घे,’ असे म्हणून तिने त्याच्या हातावर पांढऱ्या रंगाची भुकटी टाकून त्यावर पाणी टाकले. त्यानंतर त्याचा हात भाजला. त्याने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी साध्वीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली. जवळाबाजार बसस्थानकावर शनिवारी भोंदू साध्वी संगीता शिवगिरी आली. तिने रिक्षाचालक रमेश जाधव याला वर्गणी मागितली. नकार दिल्यावर तिने प्रसाद म्हणून रमेशच्या हातावर पांढरी भुकटी ठेवून त्यावर पाणी टाकले. त्याबरोबर त्याचा हात भाजला. रमेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिला अटक केली.

मोटारीची धडक बसून मुलाचा मृत्यू
हिंगोली, ५ मे/वार्ताहर

वेगातील मोटारीची धडक बसून आठ वर्षांचा मुलगा आज ठार झाला. सुरेगाव पाटीवर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गजानन मोतीराम थिटे (वडहिवरा, सेनगाव) असे त्याचे नाव आहे. आत्येबहिणीच्या लग्नानिमित्त तो औंढा तालुक्यातील लुकेपिंपरी येथे आला होता. दुपारी तो सुरेगाव पाटीवर उतरला. औंढा नागनाथकडून आलेल्या मोटारीची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. हिंगोली येथील रुग्णालयात औषधोपचारासाठी घेऊन जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

लग्नासाठी आलेल्या पाहुण्याचा खून
नांदेड, ५ मे/वार्ताहर

लग्नसमारंभासाठी आलेल्या पाहुण्याचा खून केल्याच्या आरोपावरून नायगाव पोलिसांनी एकास अटक केली. आज दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, नायगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे अशोक कदम यांच्या मुला-मुलीचा विवाह आज झाला. लग्न लागल्यानंतर जेवण करून शिवाजी नांदूरकर (वय ४५, हनुमाननगर टेकडी, वाशी, नवी मुंबई) व मारुती नारायण कदम (वय ४५, ढोलगल्ली, अहमदपूर) मंडपाबाहेर बसले होते. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. शिवाजीने रागाच्या भरात मारुती कदम यांच्या डोक्यात लाकूड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवाजीला त्यांनी अटक केली.

नवविवाहितेची आत्महत्या
जिंतूर, ५ मे/वार्ताहर

तालुक्यातील सोरजा येथील नवविवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्या केली. सोरजा येथील तुकाराम विश्वनाथ कवडे व औंढा तालुक्यातील मेथा येथील श्रावण तुकाराम लोंढे यांची मुलगी विमल यांचा विवाह गेल्या वर्षी झाला. हुंडय़ातील राहिलेले २५ हजार व मोटारसायकलसाठी २५ हजार आणावेत, यासाठी विमलचा सासरी छळ सुरू झाला. या त्रासाला कंटाळून विमलने आत्महत्या केली. तिचे वडील श्रावण लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती तुकाराम विश्वनाथ कवडे, सासू धारूबाई विश्वनाथ कवडे, सासरा विश्वनाथ कवडे, दीर मधुकर कवडे व जाऊ मीरा कवडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वाहन चोराकडून पाच दुचाकी जप्त
औरंगाबाद, ५ मे/प्रतिनिधी

शेख अखिल शेख मुस्ताफा (२३, मोगलाई गल्ली, धुळे) या वाहनचोरास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. क्रांती चौक पोलिसांनी ही कारवाई केली. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणातून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन अखिल यास धुळे येथून अटक केली. त्याने शहरातून चोरलेल्या आणखी चार दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. यात हिरो होंडा कंपनीच्या चार तर सुझुकी कंपनीच्या एका दुचाकीचा समावेश आहे.

शंभू महादेव कारखान्याकडून उसाचे पैसे देण्यास टाळाटाळ
कळंब, ५ मे/वार्ताहर
तालुक्यातील हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून उसाचे बिल न दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पंधरा दिवसांच्या आत बील न दिल्यास कन्हेरवाडी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शंभू महादेव कारखान्याला २००८ ते २००९ या गळीत हंगामामध्ये ऊस घातलेला आहे. तीन महिने झाले तरी उसाचे बील देण्यात आलेले नाही. बाजार पेठेमध्ये उसाच्या बिलावर शेतकऱ्यांनी उधारी तसेच खासगी सावकाराकडून पैसे घेतलेले आहेत.