Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९
(सविस्तर वृत्त)
पनवेल, ५ मे / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी भांडवलदारांच्या घशात घालू पाहणाऱ्या सेझ प्रकल्पाविरोधात मंगळवारी अखेर उद्रेक झाला. पनवेलजवळील टेंभुर्डे आणि वळवली गावात प्रस्तावित

 

रिलायन्स सेझसाठीच्या संरक्षण भिंती उभारण्याचे काम ग्रामस्थांना विश्वासात न घेता सोमवारी सुरू झाले होते. मंगळवारी मात्र दोन ते तीन हजार ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. विशेष म्हणजे यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. ग्रामस्थांच्या रुद्रावतारामुळे सोमवारी सक्रिय असणारे रिलायन्सचे अधिकारी मंगळवारी गायब झाले होते.
टेंभुर्डे आणि वळवली या गावातील प्रस्तावित सेझला ग्रामस्थांचा पहिल्यापासून विरोध आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांचा निवासी संकुल उभारणीसाठी उपयोग न करता त्या भांडवलदारांना विकण्याचा सिडकोचा डाव असल्याचा आरोप टेंभुर्डे-वळवली प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी केला. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सेझचे काम सुरू होणार नाही, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मिळाल्यानंतरही सोमवारी रिलायन्सतर्फे संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरू झाले. या कामाला विरोध करणाऱ्या ५०-६० ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने गावातील वातावरण तापले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी हे काम बंद पाडण्याचा इशारा दिला. त्यानुसार मंगळवारी सकाळी शेकापचे आमदार विवेक पाटील, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, राष्ट्रवादीचे नेते आर.सी. घरत, काँग्रेसचे अरुण भगत यांच्या नेतृत्वाखाली अडीच हजारांचा जमाव जमला. या जमावाने संरक्षक भिंती उभारण्यासाठी केलेले खड्डे बुजवून टाकले. यावेळी पोलीसही मोठय़ा प्रमाणात होते, मात्र एवढय़ा मोठय़ा जमावासमोर ते निष्प्रभ ठरले. ग्रामस्थांनी सेझची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून उद्रेक व्यक्त केला. या पाश्र्वभूमीवर ग्रामस्थांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी ११ मे रोजी दुपारी ३ वाजता सिडको कार्यालयात बैठक बोलाविली असून, त्यात ग्रामस्थ, सिडको-रिलायन्सचे अधिकारी आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले असून, त्यांच्या समस्या न सुटल्यास पुढील मोर्चा सिडकोवर नेण्याचा इशारा दिला आहे.