Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

राहुल‘निती’!
नवी दिल्ली, ५ मे/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए विरोधात बसणार नाही तर

 

केंद्रात सरकार स्थापन करेल, असा दावा आज काँग्रेसचे तरुण सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज केला. विरोधात गेलेले डावे पक्ष आणि काँग्रेसच्या धोरणात अनेक समानता असल्याचे स्मरण करून देत निवडणुकांनंतर डावी आघाडी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारला पुन्हा पाठिंबा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील अशोका हॉटेलमध्ये दिल्लीतील पत्रकारांना प्रथमच पत्रकार परिषदेद्वारे सामोरे जाताना राहुल गांधी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीचा अतिशय आत्मविश्वासाने सामना केला. निवडणुकांनंतर नव्या पक्षांशी युतीसाठी मैदान खुले असल्याचे सांगताना त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या विकासाभिमुख दृष्टीकोनाची प्रशंसा केली. आम्ही विरोधात बसणार नाही व सरकार स्थापन करू, असे राहुल गांधी यांनी निसंदिग्धपणे स्पष्ट करून काँग्रेसने निकाल लागण्यापूर्वीच पराभव मान्य केल्याच्या भाजपकडून होत असलेल्या प्रचाराला उत्तर दिले. काँग्रेस किती जागाजिंकेल, हे आपण सांगू शकणार नाही. पण अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या बाजूने आपल्या सकारात्मक अंतर्प्रवाह जाणवला. त्यामुळे मागच्या लोकसभा निवडणुकांपेक्षा काँग्रेस अधिक सरस कामगिरी बजावेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
रालोआ आताकेवळ भाजप नेतृत्वाच्या मनातच उरली आहे. प्रत्यक्ष जमिनीवर रालोआचे अस्तित्वही राहिलेले नाही. रालोआ या निवडणुकीतजिंकणार नाही, असे भाजपच्या बहुतांश समविचारी पक्षांसह चंद्राबाबू नायडू आणि जयललितांनाही वाटत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हरयाणा, पश्चिम बंगालमध्ये रालोआ संपलेली आहे. त्याचाही काँग्रेसला फायदा मिळतो आहे. रालोआतून काही पक्ष बाहेर गेल्याने वेगवेगळे लढण्याने भाजपला नुकसान होत आहे. आमचेच सरकार येणार, असे उसने अवसान भाजप आणत आहे. अर्थात अशा अवस्थेत काँग्रेस पक्ष असता तर आम्हीही तेच म्हटले असते. पण लोकसभा निवडणुकांची लढत भाजपच्या हातून निसटली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
भाजपप्रमाणेच राहुल गांधी यांनी डाव्यांचाही समाचार घेतला. जग बदलत असताना डाव्यांची विचारसरणी मात्र जुनाटच आहेत, असे सांगून ते म्हणाले, अणुकराराविषयी डाव्यांच्या कल्पना २० ते ३० वर्षे जुन्या आहेत. जग बदलत चालल्याचे त्यांना मान्य करावेच लागेल, असाही दावा त्यांनी केला. सर्वासमावेशक विकासावर भर देताना ते म्हणाले की, भारताचा विकास आणि गरीबी यात संबंध जोडणे आवश्यकच आहे. भरघोस विकासाच्या माध्यमातूनच गरीबीवर मात करणे शक्य आहे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. डाव्यांनाही गरीबीवर मात करायची आहे. पण त्याचवेळी त्यांचा विकासाला विरोध आहे. भाजप नुसताच विकासाच्या मागे धावणारा पक्ष असून गरीब भारताची त्यांना पर्वा नाही, असे ते म्हणाले. डाव्यांच्या जुनाट विचारसरणीवर टीका करताना काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये गरीबी, शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार अशा अनेक मुद्यांवर वैचारिक सहमती असल्याचे त्यांनी सांगितले. डाव्यांनी १८०-१९० जागाजिंकल्या तर त्यांच्या सरकारला सर्वप्रथमच आपण समर्थन जाहीर करू, असा चिमटाही त्यांनी काढला.
‘.. तर पवारांचा पंतप्रधानपदाचा पर्याय खुला!’
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागाजिंकून राष्ट्रवादी काँग्रेस देशातला सर्वात मोठा पक्ष बनला तर पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचा पर्याय ‘खुला’ असेल, असा उपरोधिक टोला राहुल गांधी यांनी लगावला. काँग्रेसशी युती असूनही महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्याऐवजी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्याच नावाचा प्रचार केला, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी असे उत्तर देत त्यांनी पवारांची अनपेक्षितपणे दांडी उडविली. पवार पंतप्रधान झाले नाही तर मनमोहन सिंगच पंतप्रधान होतील. मनमोहन सिंग हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे असे ते ठामपणे म्हणाले.

निश्चित वाटणारा पराभव पाहून काँग्रेस रालोआतील घटक पक्षांना चुचकारण्याच्या मागे लागला असला तरी काँग्रेसच्या नादी लागण्याइतपत रालोआतील पक्ष भोळे नाहीत.
- अरुण जेटली
केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ उभे करता येणार नाही याची कल्पना आलेल्या काँग्रेसला आपल्या विजयाविषयी शंका वाटत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला डावी आघाडी समर्थन देणार नाही.
- सीताराम येचुरी
यापूर्वी छोटय़ा पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानपद भूषविले होते. चंद्रशेखर, चौधरी चरणसिंग, देवेगौडा व गुजराल यांची पंतप्रधानपदी निवड झाली तेव्हा त्यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष नव्हता. त्यामुळे सर्वात जास्त जागाजिंकणाऱ्या पक्षाकडे पंतप्रधानपद असायला हवे हा निकष होऊ शकत नाही.
- आर. आर. पाटील