Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

जॉर्ज फर्नाडिस यांची सीबीआयकडून चौकशी
नवी दिल्ली, ५ मे/पीटीआय

१९९८ ते २००० या कालावधीत आर्मड् रिकव्हरी व्हेईकल्सच्या (एआरव्ही)

 

खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांची आज सीबीआयने चौकशी केली.
या गैरव्यवहारामध्ये जॉर्ज फर्नाडिस गुंतले असल्याचा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. उपमहानिरीक्षक तिलोत्तमा वर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयच्या पथकाने आज सकाळी फर्नाडिस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आर्मड् रिकव्हरी व्हेईकल्सच्या खरेदी गैरव्यवहारप्रकरणी सुमारे दीड तास चौकशी केली. झेकोस्लाव्हाकियामधील झेडटीएस मार्टिन या कंपनीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या युनिम्पेक्सची निविदा मंजूर करण्यात जॉर्ज फर्नाडिस यांनी नेमकी कोणती भूमिका बजावली याची चौकशी सीबीआय पथकाने त्यांच्याकडे केली.
यासंदर्भात फर्नाडिस यांचे वकील अभिजीत यांनी सांगितले की, एआरव्हीच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने पथकाने विचारलेल्या सर्व प्रश्नांना फर्नाडिस यांनी सविस्तर उत्तरे दिली. एआरव्ही खरेदी प्रकरण १० वर्षांपूर्वीचे आहे.
एआरव्ही खरेदी गैरव्यवहार प्रकरणी समता पक्षाचे माजी खजिनदार आर. के. जैन, शस्त्रास्त्र विक्रेता सुरेश नंदा व आणखी काही जणांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. चेकोस्लाव्हाकियामधील येथील पीएसपी बोहेमिया या कंपनीची निविदा मंजूर होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यासाठी सुरेश नंदा याने आर. के. जैन यांच्याशी संपर्क साधला होता. ८७ एआरव्ही खरेदी करण्यासाठी मागविलेल्या निविदांमध्ये पीएसपी बोहेमियाची निविदा सर्वात कमी किमतीची म्हणजे २४७. ५७ कोटी रुपयांची होती.