Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्वाईन फ्लू’चे विषाणू भारतातील डुकरांत नाहीत
पालिकेचा दावा
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी

जगातील अनेक देशात लागण झालेल्या ‘स्वाईन फ्लू’चे विषाणू भारतीय डुकरात नाहीत,

 

अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेने आज शहरातील खासगी इस्पितळातील डॉक्टरांची बैठक बोलावली होती. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनने ही माहिती दिली, असे सांगण्यात आले.
‘स्वाईन फ्लूू’चा प्रार्दूभाव मुंबईत झाला तर काय खबरदारी घ्यावी यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. शहरातील बडय़ा खासगी इस्पितळातील प्रमुखांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. परदेशी पर्यटक किंवा परदेशात जाऊन येणारे भारतीय बडय़ा इस्पितळात उपचार घेत असतात. ‘स्वाईन फ्लूू’चे संभाव्य रुग्ण आढळून आल्यास पालिकेला माहिती कळवावी, मात्र घाबरून न जाता अशा रुग्णांवर आधी खासगी इस्पितळात उपचार करावेत, एक आठवडय़ापेक्षा जास्त दिवस ताप उतरला नाही तर अशा रुग्णांना वेगळ्या विभागात ठेवण्यात यावे आणि गरज भासल्यास पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवावे, असे पालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त माधव सांगळे यांनी खासगी डॉक्टरांना बजावले.
या बैठकीत ‘स्वाईन फ्लूू’चा सामना करण्यासाठी पालिकेने काय उपाय योजना केली आहे, त्याची माहिती देण्यात आली. कस्तुरबा रुग्णालयात आता १०० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आधी फक्त २० खाटांच होत्या. शिवाय राज्य सरकारने मोठय़ा प्रमाणावर प्रतिबंधक औषधांचा साठा पाठविलेला आहे. तसेच पशुवैद्यकीय इस्पितळातील डॉक्टरांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे सांगळे यांनी सांगितले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. भारतातील डुकरांमध्ये ‘स्वाईन फ्लूू’चे विषाणू आढळून आलेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र खबरदारी म्हणून डुकरांच्या कत्तलीवर र्निबध आणण्यात आले आहेत. एखाद्या विभागात फिरणाऱ्या डुकरांबाबत कोणी तक्रार केल्यास अशा डुकरांना पकडून पालिकेच्या पशुवधगृहात पाठविण्यात येणार आहे, असेही सांगळे यांनी स्पष्ट केले. ‘स्वाईन फ्लूू’चा एकही रुग्ण भारतात सापडलेला नाही, त्यामुळे मुंबईकरांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.