Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

कृष्णा आली हो ‘माढय़ा’च्या अंगणी!
पुणे, ५ मे / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘माढय़ा’तून लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर या मतदारसंघात सिंचनसमृद्धी निर्माण करण्यासाठी कृष्णा खोरे विकास

 

महामंडळाचे निम्म्याहून अधिक उच्चपदस्थ अधिकारी गेले दोन दिवस सोलापूर जिल्हय़ात ठाण मांडून आहेत. उजनी धरणाच्या कालव्यांच्या चाऱ्या-पोटचाऱ्यांपासून एकरूखसारख्या रखडलेल्या उपसा सिंचन योजनांसाठी एक हजार ते दीड हजार कोटींच्या खर्चाच्या योजना आकार घेत आहेत.
केवळ ‘माढा’ मतदारसंघात पाण्याचा खळखळाट झाल्याचे चित्र उभे राहू नये यासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर मतदारसंघातही सिंचनसुविधा निर्माण करण्याचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यातील धरणांमधील पाण्याबरोबरच म्हैसाळच्या टप्पा पाचमधून थेट दुष्काळी सांगोला तालुक्यापर्यंत सिंचनासाठी पाणी कसे नेता येईल याचाही विचार केला जात आहे. बारामतीऐवजी सोलापूरमधील माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. ही निवडणूक लढताना बहुतांश तालुक्यांतून त्यांच्याकडे शेतीसाठी पाण्याची मागणी करण्यात आली. काही तालुक्यांत या मुद्दय़ावरून पवार यांना विरोधही केला गेला होता. शेतकऱ्यांची सिंचनाबाबतची तीव्रता लक्षात आल्यावर ‘माढा’ सिंचनसमृद्ध केला जाईल, असे आश्वासन प्रचारादरम्यान देण्यात आले होते.
राज्याचे पर्यटनमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बैठकीसाठी सोलापुरात बोलावून घेतले आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या या बैठकीत संपूर्ण सोलापूर जिल्हय़ात कशा पद्धतीने सिंचनसोयी करता येतील, यावर ऊहापोह करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हय़ाचा पाण्याचा मुख्य स्रोत उजनी धरण आहे. या धरणातून निघालेल्या कालव्यांच्या चाऱ्या-पोटचाऱ्यांची कामे गेली तीस वर्षे रखडली आहेत. ही कामे कशा पद्धतीने हाती घेता येतील, याचा आराखडा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एकरूख योजनेतून दक्षिण सोलापूर व अक्कलकोटमध्ये खोरे बदल करून पाणी कसे नेता येईल याचा आराखडा तयार आहे. उजनी धरणाच्या कळंब कालव्यातून एकरूख योजनेत पाणी आणायचे आणि ते बोरी धरणात सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय बार्शी, शिरापूर व आष्टी या रखडलेल्या उपसा योजनांना निधी देऊन पाणी बांधापर्यंत कसे पोहोचवता येईल व याचा अपेक्षित खर्च सादर करण्याविषयी बैठकीत चर्चा झाली. या योजना सध्या ‘डेडस्टॉक’ झाल्या आहेत. भूसंपादनापासून पंपहाऊसच्या पायाभरणीपर्यंतची कामे अर्धवट स्थितीत आहेत.
‘माढा’ मतदारसंघात साताऱ्यातील खटाव व माण हे तालुके येतात. या तालुक्यांतही पाणी कसे खळाळेल, त्यासाठी किती निधीची गरज आहे, याची इत्थंभूत माहिती घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्प्यातून सांगोला तालुक्यात पाणी आणण्यात येणार आहे. या योजनांसाठी साधारणत: दीड हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद किती करावी लागेल, राज्यपालांच्या अनुशेषातून काही हाती लागेल का, याचा आढावा घेण्याबाबतही चर्चा झाली.
‘माढय़ा’च्या सिंचनसुविधांचा आढावा खुद्द शरद पवार घेणार आहेत. त्यासाठी या अधिकाऱ्यांची येत्या ११ व १२ मे रोजी सोलापूरला बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकांपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर यातील काही योजना अंशत: पूर्ण करण्याशिवाय पर्याय नसल्याने खुद्द पवार यांनी यात लक्ष घातल्याचे समजते.